सिंधुदुर्गात नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे.

आज, ३० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५०३ आणि एकूण ३५ हजार १८४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे ३४१ करोनाबाधित आढळले.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या १० जणांसह ३४१ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३५, दोडामार्ग – १७, कणकवली – ३७, कुडाळ – ८३, मालवण – ६४, सावंतवाडी – ३४, वैभववाडी – १७, वेंगुर्ले – ४४. एकूण करोनाबाधितांची संख्या ४१ हजार ६३२ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५५१, दोडामार्ग २१२, कणकवली ९८७, कुडाळ ११७२, मालवण ९६०, सावंतवाडी ६५२, वैभववाडी २६२, वेंगुर्ले ५७६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २२. सक्रिय रुग्णांपैकी २६७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०५२ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, मालवण ३, वैभववाडी १, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३७, दोडामार्ग – ३२, कणकवली – २१२, कुडाळ – १६१, मालवण – २१०, सावंतवाडी – १४४, वैभववाडी – ७०, वेंगुर्ले – ८०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.
…….

दिलासादायक वृत्त

जिल्हा रुग्णालयातील उत्तम उपचारांमुळे आमचा करोनाबाधित रुग्ण ठणठणीत

ऑक्सिजनची पातळी ७३ पर्यंत कमी झालेली. श्वास घेण्यास त्रास होत होता. धाप लागलेली, अशा परिस्थितीत आम्ही आमच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उत्तम उपचार मिळाल्यानेच आमचा करोनाबाधित रुग्ण ठणठणीत झाल्याची भावना व्यक्त केली आहे, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावातील करोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांनी.

थकवा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कलंबिस्त येथील ६० वर्षीय महिलेला सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखवले होते. तेथे करोनाची चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून १०८ रुग्णवाहिकेची सोयही करण्यात आली. दाखल केले तेव्हा त्यांची ऑक्सिजनची पातळी ७३ पर्यंत खाली आली होती. पण योग्य उपचार, डॉक्टर्स, नर्स यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य यामुळे आज ही ६० वर्षीय महिला ठणठणीत बरी होऊन नातेवाईकांमध्ये परतली.

या काळात रुग्णालयातील अनुभवाविषयी त्यांचे नातेवाईक सांगतात, जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना तातडीने दाखल करून घेत उपचार सुरू केले. नियमितपणे सर्व तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टर्स दररोज रुग्णांची विचारपूस करण्यासाठी येत होते. नर्सही वेळेवर औषधे देण्यासाठी तत्पर असत. ऑक्सिजन पातळी कमी असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनच्या आधारावर ठेवले होते. काही दिवस व्हेंटिलेटरही लावण्यात आला. सतत २८ दिवस त्यांच्यावर उपचार जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू होते. त्यांना प्रकृतीचे आणखी काही त्रासही होते. त्यामुळे डॉक्टर्स विशेष लक्ष देत होते. मानसिकता टिवण्यासाठी समुपदेशनही करण्यात आले. या संपूर्ण काळात त्यांना चांगले जेवणही मिळत होते. डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम उपचार केले. त्यामुळेच त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षाही चांगली झाली आहे. त्या आता ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. जिल्हा रुग्णालयामुळेच हे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply