रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली. त्यांच्या जागी डॉ. पाटील यांची बदली झाली आहे. डॉ. पाटील २०१४ च्या महाराष्ट्र आयएएस केडरचे अधिकारी आहेत.
डॉ. पाटील यांची जळगावची कारकीर्द गौरवपूर्ण होती. डॉ. पाटील यांनी करोनाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेची प्रशासकीय सूत्रे उत्तम रीत्या सांभाळली. तेथे अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली रत्नागिरीला जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
डॉ. पाटील यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत ऑनलाइन संगणकीकरण काम केले. जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ऑनलाइन हजेरी प्रणाली लागू करण्यात आली. ज्या गावांना पाणीपुरवठ्याची सोय नव्हती, अशा गावांना पाणीपुरवठा सुरळितपणे सुरू करण्यात त्यांना यश आले.
डॉ. पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे स्वच्छता अभियानाअंतर्गत जलश्री मंत्रालयाचा पुरस्कार, जिल्हा परिषदेत पेपरलेस काम केल्यामुळे कोच पुरस्कार, अमळनेर तालुक्यातील अनोरे येथे केलेल्या कामामुळे जलसंधारण पुरस्कार, माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या कामामुळे महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार मिळाला. अशा विविध प्रकारे त्यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामगिरी केली.

