संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया

करोनाची दुसरी लाट जरा कमी होताना दिसत आहे. तरीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत त्यामध्ये विशेष फरक पडलाय, असं मानण्यासारखी परिस्थिती अजूनही नाही. तरीही गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे ७२ विशेष गाड्या सोडणार आणि एसटी महामंडळ गणपतीसाठी २२०० जादा बसेस सोडणार या दोन बातम्या अस्वस्थ करून गेल्या. गणपतीच्यावेळी उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती ही लसीकरण झालेलीच असावी, यासाठी प्रयत्नपूर्वक अभियान राबविणं गरजेचं आहे.
………
अजून आषाढी एकादशी व्हायची आहे आणि एवढ्यातच मला गणपतीचे वेध लागले की काय, अशी शंका तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण मंडळी, माझ्या मनात असा विचार येण्याचं कारण गणपतीचे वेध हे नसून गेल्या काही दिवसांतल्या दोन-तीन बातम्या हे आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे ७२ विशेष गाड्या सोडणार आणि एसटी महामंडळ गणपतीसाठी २२०० जादा बसेस सोडणार या त्या दोन बातम्या…

करोनाची दुसरी लाट आत्ता कुठे जरा कमी होताना दिसत आहे, तरीही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत त्यामध्ये विशेष असा काही फरक पडला आहे, असं मानण्यासारखी परिस्थिती अजूनही नाही. रत्नागिरी जिल्हा तर रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि नेमक्या वरील दोन्ही बातम्या या दोन्ही जिल्ह्यांना प्रत्यक्ष प्रभावित करणाऱ्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि दरवर्षी चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी मोठ्या संख्येने कोकणात येतात. ते स्वाभाविकही आहे. वर्षभर पोटासाठी दाही दिशा फिरणाऱ्या व्यक्तीला ओढ लागते आपल्या गावी जाऊन बाप्पाच दर्शन घेण्याची, त्यांचे आशीर्वाद घेण्याची.

या दोन्ही बातम्यांमधील प्रवासाची सोय आणि त्यातून येऊ शकणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेतली तर ती अडीच लाखाच्या घरात जाते. याशिवाय नियमित गाड्या असतल्या त्या वेगळ्या आणि शिवाय खासगी वाहनातून येत असलेले अजूनच वेगळेच. तात्पर्य अशा प्रकारे लाखो लोकांच्या येण्याची व्यवस्था अगोदरच करुन ठेवलेली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी कोकणात येऊ नये का? जरूर यावं… त्यांचा तो अधिकार आहे. गेल्या वर्षी यातल्या खूपसे लोक करोना निर्बंधामुळे गावी येऊ शकले नसतल्या.

पण आपल्याला आठवत असेल, तर करोनाच्या पहिल्या लाटेत आपल्याकडे रुग्णसंख्या खूपच कमी होती, म्हणजे अगदी नगण्य होती, असं म्हटलं तरी चालेल. मात्र दुसऱ्या लाटेत ती संख्या अचानक प्रचंड वाढली आणि त्यामुळे जास्तीचे निर्बंध प्रसंगी कंटेन्मेंट झोन वगैरे प्रसंगांना कोकणी माणसाला सामोरं जावं लागलं. याला मुख्यत्वेकरून कारण ठरला गणपतीइतकाच आपल्याकडे समाजप्रिय असलेला शिमगा हा सण. कारण या सणामध्ये आपण नियम पाळले नाहीत, बेलगामपणे वागलो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागले.

असं असलं तरी लोकांनी गणपतीला कोकणात येऊ नये हे सांगण्याचा या लेखाचा हेतू नाही. परंतु येताना आणि आल्यावरही काळजी घेतली पाहिजे, हे मला यातून अधोरेखित करायचं आहे. आता करोनाप्रतिबंधक लसीकरण सर्व ठिकाणी सुरू झालं आहे. कोकणातल्या प्रत्येक वाडीची मुंबईत ग्रामविकास मंडळं आहेत. या लोकांकडे गावातल्या लोकांनी आत्तापासून हट्ट धरला पाहिजे की, ज्यांना गणपतीला गावी यायचं आहे त्यांचे लसीकरण पूर्ण झालं असलं पाहिजे. हे करत असताना गावात राहत असलेल्या सर्वांचं लसीकरण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपल्यावर असेल हेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे त्या त्या गावात गणपतीच्यावेळी उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती ही लसीकरण झालेलीच असावी, यासाठी प्रयत्नपूर्वक अभियान राबविणं गरजेचं आहे. आपल्या एखाद्या बांधवाला करोनाची कोणतीही लक्षणं असतल्या तर त्याने गणपतीसाठी गावी येणं टाळलं पाहिजे. लसीकरण झालेलं असलं तरी गणेशोत्सव साजरा करताना त्रिसूत्रीचं पालन सगळ्यांनी करणं हेसुद्धा अपरिहार्य आहे. म्हणजे, मास्क लावणं, वारंवार हात स्वच्छ धुणं आणि सामाजिक अंतर राखणं या गोष्टी झाल्याच पाहिजेत. हे सर्व करण्यासाठी त्या त्या गावातल्या त्या त्या वाडीतल्या प्रमुख लोकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे.

यामध्ये शासन आणि प्रशासन काही करील यावर अवलंबून राहू नका. उद्या आपल्यावर आलेल्या प्रसंगाला आपल्यालाच तोंड द्यावं लागणार आहे. दुर्दैवाने आज शासकीय नियमावली ही राजकीय हेतूने प्रेरित झालेली आहे.

गणपतीमध्ये फार गर्दी करुन आरत्या करणं, विसर्जन मिरवणूक काढणं, गणपतीमध्ये होणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी एकमेकांकडे मोठ्या संख्येने जाणं या गोष्टी टाळता येऊ शकतात. गणपतीच्या खरेदीसाठीसुद्धा वैयक्तिक प्रत्येकाने बाजारात गर्दी न करता समूहाची खरेदी एका व्यक्तीने केली तर आपोआप बाजारातली गर्दी कमी होण्यास मदत होईल. क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींना वाडीतल्या बाकीची माणसे आवश्यक वस्तू आणून देत होती तसाच हा प्रकार. गेल्या वर्षी १४ दिवस क्वारंटाइन व्हावं लागेल, या भीतीने बरेच जण आलेच नव्हते. यंदा ती अट शासनाने घातली नसली तरी सर्व प्रकारची काळजी घेणं हा आपणच आपल्याला क्वारंनटाइन करून घेण्यासारखंच आहे. या सर्व गोष्टी आपण केल्या तर येणारा गणेशोत्सव आपण निर्विघ्नपणे पार पाडूच, पण त्यानंतरही आपल्यावर करोनारुपी संकट पुन्हा येणार नाही, याचीही दक्षता घेऊ. कारण ही सर्व हौस-मौज हे साधन आहे, साध्य नाही, ही मानसिकता एकदा तयार केली की त्रास होणार नाही. मी इथे Micro Management असा शब्द वापरणं जाणीवपूर्वक टाळलं आहे. कारण फार अवजड शब्दांनी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता असते. पण वर उल्लेख केलेल्या गोष्टी या त्याचाच भाग आहेत.

आत्तापर्यंतच्या सर्व विवेचनामध्ये मी RT-PCR चा उल्लेख टाळला आहे. या महिन्यात संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात ज्या संसद सदस्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, त्यांना RT-PCR बंधनकारक नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की संसद सदस्य जेवढ्या बायो बबलमध्ये वावरत असतो, तसा सामान्य माणूस राहू शकत नाही. त्यामुळे थोडी जरी शंका असेल, तरी लगेच टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. लस घेतल्यावर लगेच टेस्ट केली तर पॉझिटिव्ह येते, असा एक गैरसमज अनेकांमध्ये दिसून येतो. परंतु तसं काहीही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. लसीकरण झाल्यावरसुद्धा करोनाची लक्षणं दिसू शकतात, मात्र या केसमध्ये रुग्णाला धोका कमी होतो.

गावातल्या लसीकरणाबद्दल यापूर्वी मी लसस्वी भव या लेखात लिहिलं आहे. परंतु सद्यःपरिस्थितीतल्या गावातल्या लसीकरणाविषयी स्वतंत्र लेखात चर्चा करू, पण तोपर्यंत…

बुद्धीच्या देवतेच्या उत्सवामध्ये वरील सर्व गोष्टी लक्षात न घेता आपण निर्बुद्धपणे वागलो तर तो बुद्धिदाताही आपल्याला क्षमा करणार नाही.

  • निबंध कानिटकर, संगमेश्वर
    (संपर्क – ९४२२३७६३२७)
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply