हाहाकाराची भीषण उंची गाठणारा चिपळूणचा महापूर

चिपळूण : चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा वेढा दरवर्षीच पडत असल्याने चिपळूणला महापूर नवीन नाही. मात्र यावर्षीच्या २२ जुलैच्या महापुराने चिपळूणमध्ये हाहाकाराची नवी भीषण उंची गाठली.

चिपळूणचे नागरिक साखरझोपेत असताना शहरात भरलेल्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली. चिपळूणला नेहमीच पुराचा वेढा देणाऱ्या वाशिष्ठी नदीने आतापर्यंत ५ मीटरपर्यंतची धोक्याची पातळी गाठली होती. आज नदी सर्वोच्च ७.५ मीटर इतक्या धोकादायक उंचीवरून वाहत होती. वाशिष्ठी नदीवरील कोकण रेल्वेच्या पुलापर्यंत आतापर्यंत कधीच पाणी पोहोचले नव्हते. यावर्षी पुराने या पुलालाही स्पर्श केला. मुसळधार पावसामुळे अनेकांची चारचाकी आणि दुचाकी वाहने वाहून गेली. संपर्क यंत्रणा ठप्प असल्यामुळे जीवितहानीचा अंदाज येऊ शकला नाही. मात्र कोट्यवधीची वित्तहानी झाली आहे. दोन महिलांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

शहरातील कावीळतळी, बहादूर शेख नाका, बुरूमतळी, पाग, पॉवर हाऊस परिसर यावर्षी प्रथमच १० ते १२ फूट पाण्याखाली गेला. या भागात आतापर्यंत कधीच पाणी साचत नव्हते. शहरातील रावतळे भागासह मुंबई-गोवा महामार्गावरील नाले तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे रूप आले होते. शहरातील इमारतींच्या तळमजल्यावरील वाहने, दुकाने, सदनिका, शो रूम, खासगी कार्यालय पाण्याखाली गेली. पहिल्या आणि तळमजल्यावरील सदनिकांमध्ये पाणी साचल्याने जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी इमारतींच्या गच्चीवर धाव घेतली. काहींनी आपली गुरेही गच्चीवर नेली. शहरातील खाटीक आळी, जुना बसस्थानक परिसर, गांधी चौक, रंगोबा साबळे मार्ग, गुहागर नाका, शिवाजी चौक, नगरपालिका परिसर, भाजी मंडई परिसर, मार्कंडी भाग रात्रभर पाण्यात होता. बहादूर शेख नाका येथील वाशिष्ठी पूल बंद केल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गुहागर-विजापूर मार्ग ही बंद करण्यात आला.

किर्र अंधाऱ्या रात्री वाशिष्ठी नदीने रौद्र रूप धारण केले. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंबे पुरात अडकली. मदतीसाठी धावा करूनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीण प्रसंगी पालिकेतील कर्मचारी आणि विविध पक्षांचे तरुण कार्यकर्ते धावून आले. पालिकेच्या आवारात पाणी शिरल्याने मुख्य अधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी पोलीस ठाण्यात गेले. तेथून त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे यांनी दूरध्वनीवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लोकांना शक्य ती मदत करण्याची सूचना केली. माजी खासदार नीलेश राणे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून चिपळूणला आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली.

पालिकेने स्थापन केलेल्या आपत्कालीन विभागातील कर्मचारी आज सकाळपासून शक्य त्या लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्न करत होते. जेथे पाण्याचा प्रवाह कमी आहे, त्या भागातील शेकडो पूरग्रस्तांना त्यांनी सुरक्षितस्थळी हलविले. मुख्याधिकारी वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, आरोग्य निरीक्षक वैभव निवाते आणि पालिकेतील कर्मचारी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी प्रयत्न करत होते. शिवसेनेच्या युवा शाखेचे शहरप्रमुख निहार कोवळे आणि त्यांचे पथक तसेच राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे अक्षय केदारी आणि त्यांचे सहकारी पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. घरातील वृद्ध व्यक्तींना आणि लहान मुलांना अक्षरशः कंबरभर पाण्यातून त्यांनी उचलून आणले. सुरक्षेच्या साधनांचा अभाव असतानाही पुरातून त्यांनी अनेकांना बाहेर काढले. माजी नगरसेविका सौ. रिहाना बिजले, माजी नगरसेवक बाळा कदम, नगरसेविका सौ. फैरोजा मोडक, सिद्धेश लाड, सीमा रानडे, बिलाल पालकर, शहानवाज शहा, पराग वडके, सौ. रसिका देवळेकर, नितीन गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचण्यासाठी पुढाकार घेतला. खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख उमेश खताते, ग्रामपंचायत सदस्य शुभम खताते यांनी खेर्डी परिसरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले. वाशिष्ठी आणि शिव नदीलाही आलेल्या पुराने चिपळूण शहरात २००५ सालापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटी झाल्यामुळे २६ जुलै २००५ रोजी चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. तेव्हा कोट्यवधीचीं हानी झाली होती. त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती यावर्षी निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम आहे. ज्या भागात गेल्या ३० वर्षांत कधीच पाणी भरले नव्हते, तो भाग तब्बल १२ ते १३ फूट पाण्याखाली गेला. सायंकाळी ५ नंतर समुद्राला भरती सुरू झाली. त्यामुळे शहरातील पाणी आज कमी होण्याची शक्यता नाही. दुपारी शहरातील पाणी एक फुटाने कमी झाले होते. पण सायंकाळी ४ नंतर पुन्हा पाणी वाढू लागले.

शासनाकडून मदत मिळाली असली तरी पुराच्या पाण्यात हजारो लोक अडकले आहेत. त्यांना रात्रही जीव मुठीत धरून काढावी लागणार आहे. अनेकांना इमारतींच्या गच्चीवरच थांबावे लागणार आहे. सकाळपासून मुसळधार पावसाला सुरवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना केल्या होत्या. मात्र पाणी शिरल्याने दुकानातील फर्निचर आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. पहाटेपासून पाणी भरण्यास सुरवात झाली. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे कापसाळपासून पुढे कामथे घाटापर्यंत आणि कळंबस्तेपासून पुढे परशुराम घाटापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले. पुरामुळे शहरातील लोकांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. केवळ पुराचे पाणी नव्हे तर साप, मगरीसुद्धा पाण्यातून घरात येत आहेत. त्यामुळे पुराबरोबर साप आणि मगरींचे नागरिकांसमोर संकट आहे. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले. दरम्यान, एनडीआरएफचे पथक सायंकाळी ५ वाजता शहरात दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केले.

खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्येसुद्धा प्रथमच पाणी भरले आहे. निवासी वसाहत आणि औद्योगिक कारखाने असलेल्या ठिकाणी पाणी साचले आहे. तेथील दूध संकलन केंद्रात सायंकाळपर्यंत पाच कर्मचारी अडकले होते. औद्योगिक वसाहतीकडे जाणारे सर्व मार्ग बंद असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. निवासी वसाहत परिसरात सुमारे चार फूट पाणी होते. या भागात प्रथमच पाणी भरल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अरबी समुद्राला आलेली भरती मुसळधार पाऊस कोळकेवाडी धरणातून पहाटे सुरू झालेला विसर्ग यामुळे चिपळूण शहरात अचानक चिपळूण शहर आणि परिसरात पाणी वाढले . चिपळूणत वाशिष्टी नदीत मगरींचे प्रमाण खूप असून पुरासोबत या मगरी लोकांच्या घरात शिरत आहेत. काही ठिकाणी साप सुद्धा घरात आले आहेत. अनेक घरातील गॅस, सिलेंडर पासून अनेक जीवनावश्यक गोष्टी वाहून गेल्या आहेत.

वाशिष्टी नदीने पाण्याची धोक्याची पातळी ओलांडली त्यानंतर चिपळूण शहरात वाशिष्ठीचे पाणी शिरले. अरबी समुद्राला भरती आली. चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणावर अपार्टमेंट होत आहेत. सखल भागात मातीचा भराव टाकून इमारती उभ्या केल्या जात आहेत. बैठी घरे तोडून तेथे उंच इमारती बांधल्या जात आहेत. इमारतींच्या भोवती संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत. नाल्यांची रुंदी आणि खोली कमी झाली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याला जाण्यासाठी मार्ग नाही. शहरातील पाण्याचा निचरा होत नाही. अशा विविध कारणांमुळे आज चिपळूण शहराला महापुराचा अभूतपूर्व वेढा बसला. त्यातून लवकरात लवकर सुटका होण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply