रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी कार्यभार स्वीकारला आहे. नव्याने रुजू झाल्याबद्दल होणारे स्वागताचे हार-तुरे स्वीकारतानाच पाटील यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पूर्णपणे वेगळ्या वातावरणाच्या आणि वेगळ्या स्वरूपाच्या जिल्ह्यात ते रुजू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची माहिती घ्यायला त्यांनी प्रत्यक्ष भेटींमधून सुरुवात केली आहे. तो त्यांच्या कामाचा भाग आहे. प्रथमच पत्रकारांशी झालेल्या संवादात आधी करोनाची दुसरी लाट थांबविणे आणि तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाचा सध्याचा काळ लक्षात घेता त्यांचे हे उद्दिष्ट नक्कीच योग्य आहे. दररोजच्या करोनाविषयक चाचण्या वाढविणे, संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेणे, त्यांच्या चाचण्या करणे, आवश्यक त्या सुविधा पुरविणे इत्यादींमध्ये आपण लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाप्रतिबंधक लसीकरणाचा मोठा घोळ जिल्ह्यात आहे. लस घेऊ इच्छिणाऱ्यांना पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. अजूनही घोळ कमी झालेला नाही. नियोजनाचा अभाव सामान्य नागरिकांना त्रासदायक ठरतो आहे. त्याकडे आधी लक्ष पुरवावे लागणार आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागातील रिकाम्या राहिलेल्या पदांचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना प्राधान्याने सोडवावा लागेल. त्याकडे ते कसे लक्ष देतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील प्रशासन ढिसाळ झाले होते. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव हे त्यातील महत्त्वाचे कारण असले तरी राजकीय वर्चस्वामुळेही आधीच्या प्रशासन प्रमुखांची घुसमट झाली नसेलच, असे सांगता येणार नाही. नव्या जिल्हाधिकाऱ्यांना ते आव्हान प्रामुख्याने पेलावे लागणार आहे. प्रशासनावर लोकप्रतिनिधींची जशी पकड आवश्यक असते, त्याच पद्धतीने प्रशासनानेही लोकप्रतिनिधींवर आपल्या कामाचा प्रभाव पाडणे आवश्यक असते. त्यात यशस्वी होण्यासाठी डॉ. पाटील यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. राजकारणचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र असलेल्या जळगावसारख्या ठिकाणाहून बदली होऊन आले असल्यामुळे आणि त्यातही तेथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद त्यांनी सांभाळले असल्यामुळे राजकारण्यांच्या थेट प्रभावाखाली आल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास त्यांना असेलच. त्या अनुभवाचा उपयोग आता त्यांना जिल्हाधिकारी म्हणून रत्नागिरीत करावा लागणार आहे.
भैरी हे रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत आहे. डॉ. पाटील यांनी रुजू झाल्यानंतर भैरीचे दर्शन घेऊन आपण स्थानिकांशी कसे जुळवून घेणार आहोत, आपण स्थानिक कसे होणार आहोत, याची एक झलक दाखवली आहे. त्याच पद्धतीने त्यांनी करोनाशिवाय इतर अनेक प्रश्नांकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. जळगावमध्ये त्यांनी जलसंधारणाचे काम केल्याबद्दल उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. येथे प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे जिल्ह्याच्या जवळजवळ प्रमुख सर्व शहरांमध्ये निर्माण होणारी पूरस्थिती आणि दुसरीकडे उन्हाळ्यात भासणारी तीव्र पाणीटंचाई या दोन्हींचा एकत्रित विचार करावा लागेल. कोकणातील सच्छिद्र जमिनीमुळे पाणी साठवण्याची जमिनीची किमान क्षमता लक्षात घेऊन पाणी कसे साठविता येईल, याचे काही मॉडेल तयार करता आल्यास त्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. अनेक तज्ज्ञांनी यापूर्वी तयार केलेल्या मॉडेलचा उपयोग कसा करता येऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष दिले, तरी खूप काही साध्य होऊ शकेल. माझी वसुंधरा अभियानातील कामाबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कार मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठीही अशा तऱ्हेचे वेगळे काही काम उभे करता येते का, याचा अभ्यास त्यांनी करायला हवा आणि त्याची अंमलबजावणी करायला हवी. तरच डॉ. पाटील यांच्या कामाचा जिल्ह्यावर ठसा उमटेल. त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी. रत्नागिरी जिल्ह्यातील मुळात समजून घेतले जावेत असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जावेत याच अपेक्षा.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २३ जुलै २०२१)
(साप्ताहिक कोकण मीडियाचा २३ जुलैचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – २३ जुलै २०२१ चा अंक

या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा : कोकणचा शेतकरी ट्रॅक बदलतोय – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख
संपादकीय : नव्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा https://kokanmedia.in/2021/07/23/skmeditorial23july/
चंदनाचा परिमळ आम्हा काय त्याचे? – करोना योद्धा जयवंत तावडे यांच्या कार्याची विवेक परब यांनी करून दिलेली ओळख
आठवणीतल्या गोष्टी : उपकाराची जाणीव – सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांचा लेख
का रे भुललासी वरलिया रंगा : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख
निरलस प्रेम करणारा मित्र हरवला! – रत्नागिरीतील संकल्प कला मंचाचे संस्थापक रवींद्र साळुंखे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे बालपणीचे मित्र सुभाष लाड यांनी लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख

