रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे चिपळूण, खेडमधील पूरग्रस्तांसाठी प्रशासनाचे मदत आणि बचावकार्य सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. प्रामुख्याने चिपळूण शहराच्या विविध भागांमध्ये पाच हजाराहून अधिक लोक अडकून पडले आहेत.
याबाबतच्या सायंकाळी पावणेसहा वाजता दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोळकेवाडी (ता. चिपळूण) धरणक्षेत्र आणि वाशिष्ठी नदी पाणलोट क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्राबाहेर गेल्या २४ तासांत २०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याने कोळकेवाडी धरणाच्या चार दरवाजांमधून १ हजार क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग चालू आहे. हवाई मार्गाने बचावकार्य चालू आहे. बचाव कार्यासाठी सद्यःस्थितीत खासगी-६, कस्टम-१, पोलीस-१, चिपळूण पालिका २, तहसीलदार कार्यालय- ५ अशा बोटी मदत करीत आहेत. एनडीआरएफचे ५ बोटींसह २३ जणांचे पथक चिपळूण येथे पोहोचत आहे. एनडीआरएफचे ४ बोटींसह २३ जणांचे पथक पुण्याहून खेड तालुक्याकडे रवाना झाले आहे. हे पथक एक तासात खेड येथे पोहोचेल. रस्ता अनुकूल नसल्याने त्यांना उशीर होत आहे. नौदल विभागाला विनंती करण्यात आली असून त्यांचे पथक लवकरात लवकर पोहोचत आहे. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तैनात असून हवामान अनुकूल झाल्यास हेलिकॉप्टरद्वारे तत्काळ बचावकार्य करण्यात येणार आहे. ट्रकद्वारे रत्नागिरीहून २, दापोलीहून २, गुहागरमधून २ बोटी चिपळूणकडे बचावकार्यासाठी रवाना झाल्या आहेत.
रत्नागिरीतून रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे १२ जणांचे पथक रश्शी, लाइफ जॅकेटसह बचावकार्यासाठी चिपळूण येथे हजर आहे. देवरूख येथील राजू काकडे हेल्प फाउंडेशनचे १० जणांचे पथक खेड आणि चिपळूण येथे पोहोचत आहे. रत्नागिरीतील जिद्दी माऊंटेनिअर्सचे पथकही बचावकार्यासाठी पोहोचत आहे.
आतापर्यंत पुरामध्ये अडकलेल्या सुमारे १०० नागरिकांची सुटका करण्यात आली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी चिपळूण आणि सावर्डे येथील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
चिपळूणच्या आजूबाजूची ७ गावे पुराच्या पाण्याखाली असून त्या गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ आणि बचाव पथकाद्वारे सुरु आहे.
सद्यःस्थितीमध्ये चिपळूण आणि खेड तालुक्याात कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. परशुराम घाट तसेच मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
खारेपाटण येथील रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सध्या ओहोटी सुरू झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली असल्याने बचावकार्यास मदत होत आहे. मात्र पुढील भरती साधारण रात्री ११ वाजता सुरू होणार असल्याने तूर्त पुराखाली नसलेल्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरपरिस्थितीतून सुटका करण्यात आलेल्या नागरिकांकरिता अन्न, निवारा तसेच औषधे आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. निवारा व्यवस्थेच्या ठिकाणी शिवभोजन थाळीद्वारे अन्नपुरवठा, पिण्याचे पाणी तसेच ५०० बेडशीट्सचा पुरवठा करण्यात आला आहे.
कोकण विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

