सिंधुदुर्गनगरी : करोना महामारीपासून आपला बचाव करण्यासाठी कोणताही एक मार्ग पुरेसा नाही. योग्य आहार, व्यायाम, मानसिक संतुलन, योग्य औषधोपचार आणि पूर्वदक्षता या पंचसूत्रीला पर्याय नाही, असे मत मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ प्रशिक्षक विनयकुमार आवटे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र ग्राहक पंचायत कोकण विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने गूगल मीटद्वारे “नैसर्गिक आपत्ती आणि करोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीची पूर्वतयारी” या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात श्री.आवटे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते म्हणाले, करोना महामारी ही नैसर्गिक की मानवनिर्मित आपत्ती हा वादाचा मुद्दा आहे. करोनाची पहिली लाट संपून दुसरी लाट संपत असतानाच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्येक लाटेच्या वेळी करोनाचा विषाणू आपले रूप बदलत असून त्यावर हमखास औषध आणि उपचार पद्धती नाही. त्यामुळे करोनापासून बचाव करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, मानसिक संतुलन, योग्य औषधोपचार आणि करोनापूर्व दक्षता या पंचसूत्रीचा वापर केल्यास करोनापासून बचाव करणे शक्य आहे.
आयुष मंत्रालयाने करोनाबाबत योग्य मार्गदर्शन आणि औषधे यांची मोफत माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. होमिओपॅथी उपचार पद्धतीने अनेक रुग्णांना स्वतः बरे केल्याचे श्री. आवटे यांनी सांगितले. कोणत्याही आपत्तीला न घाबरता तोंड दिले पाहिजे. कारण अशा प्रकारच्या आपत्ती होत्या, आज आहेत आणि भविष्यामध्ये राहणार आहेत.
करोनारूपी महामारीपासून बचाव करण्यासाठी काही पथ्ये पाळून नियमांचे पालन केले पाहिजे. ग्राहक पंचायतीच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने या महामारीच्या काळात प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असे अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय लाड यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे, आयुष मंत्रालयाच्या प्रतिनिधी श्रीमती शर्मा यांनी योग्य वेळी योग्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
या व्याख्यानाला संस्थेचे राज्य संघटक सर्जेराव जाधव, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. ज्ञानचंद्र पाटील, मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक श्री. गंगावणे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गावडे, पत्रकार संजय खानविलकर, जिल्हा शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक सीताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि पाहुण्यांची ओळख जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी करून दिली. सचिव संदेश तुळसणकर यांनी आभार मानले.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
