Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

संरक्षणाचे अलिखित बंधन – रक्षाबंधन

Advertisements

हिंदू परंपरेप्रमाणे काही विशिष्ट सामाजिक, आरोग्यहित लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी वर्षभर होणारे अनेक सण, दिनवार इत्यादींची योजना केलेली आहे. त्यातीलच एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन.

………………………..

परंपरेने आदर, श्रद्धा भावनेने हिंदू धर्मातील विविध उपक्रम अनुसरत आलो आहोत. हिंदू धर्मानुसार प्रत्येक वर्षाचा आठवा महिना म्हणजे ‘’श्रावण मास’’. हा महिना अधिक धार्मिक, पवित्र समजला जातो.त्यातही सर्वत्र बराच पाऊस झाल्याने हिरवीगार वनस्पती, पीकपाणी इत्यादींनी संपन्न झालेला असतो. साहजिकच अनेक व्रते, उपासतापास इत्यादी गोष्टी या महिन्यात केल्या जातात. श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा ही तिथी आपले विशिष्ट महत्त्व राखून असते.

पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सुमारे २ ते २.५ महिने वरुणराजाकडून जलवर्षाव होत असल्याने समुद्र चांगलाच खवळलेला असतो. कोळी बांधव मासेमारीसाठी पावसाळ्यात समुद्रात जाऊ शकत नाहीत.. सागरातील एरवी चालणारी भयंकर वादळे वारे, उंचच्या उंच लाटा ही त्याची कारणे आहेत. समुद्र शांत होऊन मासेमारी पुन्हा सुरू व्हावी, व्यवसाय सुरळित व्हावा म्हणून कोळी बांधव सागराला विनंती करताना श्रद्धेने नारळ वाहतात. भक्तिभावाने सागराची पूजा करून नारळ अर्पण करतात.

नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन असेही म्हणतात. या शुभदिनी बहीण भावाला ओवाळते. भावाच्या मनगटावर राखी बांधते. त्याच्या कपाळाला कुंकुमतिलक लावते. नारळ-खोबऱ्याचे गोड पदार्थ भरवते. ओवाळणीनंतर बहिणीला काही भेटवस्तू देण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. मात्र रक्षाबंधनाची आठवण ठेवून बहिणीच्या सदैव रक्षणाची जबाबदारी भावाने घेणे हीच खरी मोठी भेटवस्तू असते. बहीण-भाऊ दोघेही या प्रेमाच्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधन म्हणजे राखी बांधणे हा सोपा अर्थ. वास्तविक बाह्यस्वरूपी तो एक साधा असला (हल्ली मात्र हा धागा विविधतेने नटवलेला आणि बहुकिमतीदेखील असतो.] ते एक मोठे आपसातील प्रेमाचे बंधन असते. त्या धाग्यामध्ये भरपूर भावनिक शक्ती असते. त्यामध्ये विश्वास, प्रेमभावना असून सुख, शांती, अपेक्षापूर्ती, स्वप्नपूर्तीची आस पण असते. भावाने आपल्या बहिणीचे सर्व प्रकारे रक्षण करण्याचे अलिखित बंधन/वचन त्यामागे असते. रक्षाबंधन म्हणजे थोडक्यात भावाचा बहिणीच्या सर्वांगीण संरक्षण करण्याचा अलिखित प्रेमाचा वचननामा म्हणता येईल. ’’भैया मेरे राखीके बंधन को निभाना……’’ ही हिंदी चित्रपटगीतातील काव्यपंक्ती रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्याला बरेच काही सुचवून जाते.

जगातील अन्य कोणत्याही व्यावहारिक नात्यापेक्षा हे रक्षाबंधनाचे भावनिक नाते केव्हाही मंगलमयी आणि पवित्र असते, हे निःसंशय. यापुढे व्यवहारातील अन्य सारी नाती केव्हाच फिकी पडतात.

रक्षाबंधन या संकल्पनेला ऐतिहासिक आणि पौराणिक आधारही असल्याने आपल्या परंपरेतील त्याचे महत्त्व खचीतच वृद्धिंगत झाले आहे. वानगीदाखल काही संदर्भ पुरेसे आहेत. त्यापैकी श्रीकृष्ण-द्रौपदी नात्या. द्वापारयुगात एकदा भगवान कृष्णाच्या हाताला जखम झाली. त्यावेळी जखमेतून रक्त वाहत असल्याचे पाहिल्यावर द्रौपदीने त्वरित आपला भरजरी शेला फाडून भावाच्या जखमेवर बांधला. कृष्णाने द्रौपदीचे प्रत्येक वेळी रक्षण करून बंधुप्रेमाचे वचन अर्थातच निभावले आहे. आणखी एक ऐतिहासिक संदर्भही रक्षबंधनाला लाभला आहे. पूर्वी राजपूत आणि मुसलमान यांच्यात बऱ्याच वेळेला संघर्ष होत असत. चित्तोडगडच्या राजाची विधवा पत्नी राणी कर्णावती हिने गुजरातचा सुलतान बहाद्दर शहाकडून प्रजेचे रक्षण करण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने तिने हुमायूनला राखी पाठवली. तिने बांधलेल्या राखीचे एक प्रेमाचे प्रतीक आणि बंधन म्हणून हुमायूनने मानलेल्या बहिणीचा मोठा आदर केला. सिकंदर आणि हिंदू शत्रू पुरू यांच्यात युद्ध चालले होते. सिकंदर पत्नीने पुरूला राखी बांधली आणि तिने आपल्या पतीच्या रक्षणाची विनंती केली. त्यावेळी तिच्या राखीचा आदर करून सिकंदरला पुरूने जीवदान दिले.

असे पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बंधुभगिनींच्या दरम्यान असलेले पावित्र्य, प्रेम, सुरक्षा, आनंद, सुख, समाधान यांचा विचार करतानाच दुसऱ्या अंगानेही विचार करण्याची आता नक्की वेळ आली आहे. बहीण-भाऊ म्हणजे स्त्री-पुरुषच आहेत. कायद्याने पुरुष–स्त्री समानता असल्याने स्त्रीला प्रगतीच्या बऱ्याच संधी हल्ली मिळाल्याने बहुतांशी सर्व क्षेत्रात स्त्री समर्थपणे आघाडीवर आहे. पण इतके असूनही सर्व क्षेत्रात सक्षम असलेली स्त्री, महिला कुठेही तन, मनाने सुरक्षित नाही, हेदेखील तितकेच कटु सत्य आहे. स्त्रीची शारीरिक निसर्गनिर्मित विशिष्ट रचना आणि त्यानुसार तिच्यावर असलेली प्रजोत्पादन, बालसंगोपनाची महत्त्वाची जबाबदारी हेच त्यामागे चिंतनाचे मोठे कारण आहे. स्त्रियांवरील अनन्वित अत्याचार, गर्भपात, हल्ले, हिंसा, बलात्कार, असभ्य वर्तन इत्यादी गोष्टी काय दर्शवितात? दूरदर्शन, वर्तमानपत्रे इत्यादी सर्वच प्रसारमाध्यमांवर रोज प्रसारित होत असलेल्या यासंबंधीच्या बातम्यांमधून स्त्रियांच्या असुरक्षिततेची दाहकता सहजी लक्षात येते. ती केव्हाही विसरता येणार नाही. समाजाची स्त्रीविषयीची हिडीस मानसिकता काय दाखवते? संत महात्म्यांनी ‘’परस्त्री मातेसमान‘’ ही शिकवण आपण केवळ स्वार्थासाठीच विसरलो का? स्त्रीकडे पुरुषाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारच नसेल तर अशी ही महिला सुरक्षेची अलिखित वचने काय कामाची? सण, वार, दिवस इत्यादींमधून समाजाने योग्य शिकवण घेऊन त्याप्रमाणे सदाचरण, सद्वर्तन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी संरक्षणाचे अलिखित बंधन असलेले रक्षाबंधन साजरे करायला हवे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version