रत्नागिरी : अखिल भारतीय साहित्य परिषद आणि येथील स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत सोमवारी (दि. ३ जुलै) व्यास पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय स्तरावर सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धीसाठी राष्ट्रीय विचार घेऊन अखिल भारतीय साहित्य परिषद १९६६ पासून सर्व भारतीय भाषांमध्ये कार्यरत आहे. परिषदेची महाराष्ट्र आणि कोकणासह विविध प्रांतांचीही कार्यकारिणी आहे. परिषदेतर्फे वर्षभरात वसंत पंचमी, व्यास पौर्णिमा, वाल्मीकी जयंती, वर्ष प्रतिपदा आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. रत्नागिरीत येत्या सोमवारी व्यास पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाच्या सहकार्याने ग्रंथालयात (674 ब, श्रीरामनगर (विनम्रनगर) नाचणे, रत्नागिरी) हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि संगीत नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरीतील मराठी, उर्दू, हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्ये लेखन करणारे लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अ. भा. साहित्य परिषद तसेच स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण साबणे आणि अध्यक्ष विश्वनाथ बापट यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

