भक्तिरंगांत बहरली रत्नागिरीकरांची आषाढी एकादशीची संध्या…

रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या संध्याकाळी (२९ जून २०२३) युवा गायक अभिषेक काळे आणि गायिका सृष्टी कुलकर्णी यांच्या बहारदार आणि भक्तिरसपूर्ण गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यंदाचे नववे वर्ष होते. (कार्यक्रमाचे काही अंश असलेला व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहाच्या सभागृहात ही मैफल झाली. सुरुवातीला श्रीमती उषा काळे आणि एस. कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन आणि पांडुरंगाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक केले. त्या वेळी कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. अविनाश काळे यांनी श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन कलाकारांना सन्मानित केले. मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.

जय जय रामकृष्ण हरी या गजराने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर दोन्ही युवा गायकांनी सादर केलेले एकाहून एक सरस अभंग आणि भक्तिगीतांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. सृष्टी कुलकर्णी यांनी विष्णुमय जग, भेटी लागी जीवा, नाम गाऊ नाम घेऊ , रूप पाहता लोचनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी आदी गीते सादर केली. अभिषेक काळे यांनी विसावा विठ्ठल, माझे माहेर पंढरी, विठ्ठल विठ्ठल, जोहार मायबाप आदी गीते सादर केली. भैरवी सादर करताना परब्रह्म भेटी लागी, कैवल्याच्या चांदण्याला आणि अगा वैकुंठीच्या राया ही तीन गीते गुंफली.

निखिल रानडे (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज), निरंजन गोडबोले (संवादिनी), संतोष आठवले, पं. विश्वनाथ कान्हेरे (ऑर्गन) आणि सुहास सोहनी (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. वामन जोग यांनी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन केले.

गायक कलाकारांची ओळख
गायक अभिषेक काळे
यांनी आठ वर्षे पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन घेतले असून, सध्या ते सांगलीचे पं. शरद बापट यांच्याकडून गायनाची तालीम घेत आहेत. आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. गंगूबाई हनगल फाउंडेशनतर्फे (हुबळी-कर्नाटक) त्यांना गौरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मंदारमाला, बिलासखानी तोडी, संशयकल्लोळ, मेघमल्हार आदी संगीत नाटकांतून त्यांनी उत्कृष्ट गायक नटाची भूमिका करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत. म्हैसूर, बेळगाव, पुणे, नांदेड, मिरज, ग्वाल्हेर, सिंगापूर आदी ठिकाणच्या नामवंत संगीत महोत्सवांत त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. संगीतकार अशोक पत्की, मंगेश पाडगावकर, पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर आदी मान्यवरांसोबत त्यांनी गायनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. विदुषी गंगुबाई हनगल, बालगंधर्व युवा, कुमार गंधर्व, जयवंत कुलकर्णी, संगीत भास्कर, इंदिराबाई खाडिलकर आदी पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला आहे.

गायिका सृष्टी कुलकर्णी आठ वर्षे पं. सुरेश बापट यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही परीक्षा त्या उत्तीर्ण असून, विदुषी मंजूषाताई पाटील व डॉ. स्वप्नील चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एमएम (संगीत) ही परीक्षा त्या देणार आहेत. खल्वायन, कल्याण गायन समाज, पं. केशवराव राजहंस स्मृती समारोह, नागपूर, अभिजात संगीत सभा, षड्ज पंचम आदी ठिकाणी त्यांचे शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. आकाशवाणीची शास्त्रीय ख्याल गायन व नाट्यसंगीत गायनाची त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. अनेक नामवंत ठिकाणच्या शास्त्रीय ख्याल गायन व नाट्यसंगीत, गायन स्पर्धेत त्यांनी पारितोषिके मिळवली आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply