रत्नागिरीच्या इन्फिगो आय हॉस्पिटलमध्ये वर्षभरात ५० लाखाचे मोफत उपचार

रत्नागिरी : गेल्या वर्षी सुरू झालेल्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने वर्षभरात सामाजिक बांधिलकी म्हणून ५० लाखाहून अधिक खर्च गरीब रुग्णांवर किंवा ज्येष्ठ नागरिकांवर मोफत उपचार करून केला, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थाकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी दिली.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठे डोळ्यांचे हॉस्पिटल नेटवर्क असलेल्या इन्फिगो ग्रुपने रत्नागिरीत गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी अत्याधुनिक निदान यंत्रणांनी सुसज्ज डोळ्यांचे हॉस्पिटल सुरू केले. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. ठाकूर बोलत होते. ते म्हणाले की, वर्षभरात अनेक व्यक्तींना रोगमुक्ती मिळाली, दृष्टीलाभ झाला, याचे समाधान तर आहेच परंतु काही व्यक्ती असमाधानी राहिल्या असतील, त्यांच्यावरच्या उपचारांना यश मिळाले नाही याची खंत आणि जाणीवही आहे.

रुग्णालयात अमेरिकन आणि जर्मन तंत्रज्ञानाची अत्याधुनिक यंत्रणा, कॉर्निया, ग्लुकोमा, रेटिना आणि मोतीबिंदू तसेच लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार या नेत्रविज्ञानातील विशेष शाखांचे उच्च शिक्षित तज्ज्ञ डॉक्टर पूर्ण वेळ रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत. डोळ्यांच्या चारही शाखांमधील चार सुपरस्पेशालिस्ट एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे कोकणातील हे एकमेव हॉस्पिटल आहे. वर्षभरात ३० हजाराहून हून अधिक रुग्णांची नेत्रतपासणी रुग्णालयात झाली. त्यापैकी १८ हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली. संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांच्या अंतर्भागातील विविध गावे, वाडीवस्त्यांमध्ये २५० मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली. त्यामधून ३०० रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

डॉ. ठाकूर म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात ४० ते ९० या वयोगटांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण साधारणतः १३ टक्के, तर काचबिंदूचे प्रमाण ४ टक्के आणि मधुमेहामुळे होणाऱ्या दृष्टिहानीचे प्रमाण ७ टक्के आहे. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास असले तरी रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील भागांमध्ये दृष्टिदोष असलेल्या रुग्णांचे प्रमाण ३५ टक्के या राष्ट्रीय सरासरीपेक्षा ५ टक्के अधिक आढळले. गेल्या वर्षभरातील अधिकतर काळ करोनाप्रतिबंधक लॉकडुनचा असल्याने दैनंदिन जीवनशैलीत झालेला बदल तसेच वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण व त्यामुळे वाढलेला अधिक स्क्रीनटाइम यामुळे ७ ते ४० या वयोगटात दृष्टिदोष आणि चष्मा लागण्याचे प्रमाण सुमारे ७ ते ८ टक्के इतक्या लक्षणीय प्रमाणात वाढलेले आढळून आले.

सर्वसाधारणपणे ३ व्यक्तींना चष्मा असतो. लॉकडाउनच्या काळात हेच प्रमाण ४.५ टक्के होते. चष्मा आणि दृष्टिदोषांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कॉम्प्युटरवर अधिकाधिक करावे लागणारे काम यामुळे निर्माण होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या आणि कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोमवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आधुनिक विभाग उघडण्यात आला. चष्याचा अत्यंत अचूक नंबर काढणारे अतिप्रगत जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेले फोरप्टोर हे उपकरण बसवण्यात आले. त्यामुळे अनेकांना अचूक चष्मे आणि दृष्टींचे समाधान मिळाले. मुंबईतही बहुतेक ठिकाणी फोरप्टोर हे उपकरण उपलब्ध नाही, असे डॉ. ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले.

ते पुढे म्हणाले, मोतीबिंदूच्या अनेक शस्त्रक्रिया आणि पडद्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. चेन्नईतील शंकर नेत्रालयातील विशेष प्रशिक्षित आणि इन्फिगो ग्रुपचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद कामत यांनी ४००० हून अधिक रुग्णांच्या किचकट अशा पडद्यांच्या आजारांचे निदान व उपचार केले. जिल्ह्यात रेटिना तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने आणि इन्फिगोमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने डॉ. कामत यांनी रेटिनाच्या ४०० हून अधिक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या. मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी इन्फिगोचा सुसज्ज रेटिना विभाग पडद्यावरील उपचारांसाठी खूपच मोठा आधार बनला आहे.

हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद या विख्यात आय इन्स्टिट्यूटमधून काचबिंदू या विषयात उच्च प्रशिक्षित डॉ. लिसिका गवस या कोकणातील एकमेव काचबिंदू तज्ज्ञ इन्फिगोमध्ये पूर्णवेळ उपलब्ध आहेत. त्यांनी सुमारे ८०० हून अधिक रुग्णांच्या काचबिंदूचे निदान केले. त्यांची दृष्टी वाचवता आली, अशी माहिती देऊन डॉ. ठाकूर म्हणाले, काचबिंदू हा अत्यंत धोकादायक आजार असून त्यामुळे हळूहळू दृष्टिनाश होतो. नष्ट झालेली दृष्टी कधीच परत येत नाही. त्यामुळे त्याचे वेळीच निदान होणे आणि योग्य त्या तपासण्या करून उपचार सुरू करणे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यामुळे उरलेली दृष्टी वाचवता येते. इन्फिगोने ही सुविधा रत्नागिरीत उपलब्ध करून मोलाचे काम केले आहे.

लॉकडाउनच्या काळात वयोवृद्ध व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळल्याने ज्यांना मोतीबिंदू होता, त्यांचा मोतीबिंदू अधिक कडक व कठीण झाल्याने तो काढण्याचे काम डॉक्टरांसाठी कौशल्याचे बनले. अशा आव्हानात्मक शस्त्रक्रिया इन्फिगोने काळजीपूर्वक पार पाडल्या. इन्फिगोमध्ये केली जाणारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यंत सूक्ष्म पद्धतीने बिनटाक्याची, भूल न देता व रक्तस्राव न होता पार पाडली जाते. लहान मुलांच्या डोळ्यांतील व्यंग तसेच तिरळेपणा यावर इन्फिगोमध्ये सुसज्ज बालनेत्ररोग विभाग असून या संबंधित शस्त्रक्रिया करून काही बालकांच्या आणि प्रौढ व्यक्तींच्या डोळ्यांतील व्यंग दूर करण्यात आले.

डॉ. ठाकूर यांचे शाळा-महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यात झाले. त्यांनी संपूर्ण देशात २७० हून अधिक विविध प्रकारची हॉस्पिटल सुरू केली आहेत. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते महाग वाटू नये व श्रीमंत किंवा गरीब व्यक्तीला एकाच प्रकारची उत्तम दर्जाची सेवा अल्पदरात उपलब्ध व्हावी, लोकांचा मुंबई-पुणे- कोल्हापूर-सांगली येथे जाण्यासाठी लागणार वेळ, श्रम आणि पैसा वाचावा व मुख्य म्हणजे दिरंगाईमुळे होणारी दृष्टीची हानी टाळावी, हा उद्देश रत्नागिरीत येथे स्पिटल सुरू करण्यामागे होता. तो बऱ्याच अंशी साध्य झाल्याचे समाधान एक वर्षाच्या कालावधीत लाभले, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये असणारा विश्वसनीय संवाद हा अचूक उपचारांचा सर्वांत मोठा पाया असतो. त्यातून निर्माण होणारा परस्परांविषयीचा आदर कोणत्याही उपचारांमध्ये सर्वांत महत्त्वाचा असतो. तो कायम टिकून राहण्याच्या दृष्टीने इन्फिगोमधील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील राहतील, अशी खात्री डॉ. ठाकूर यांनी दिली. या प्रवासात रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने दाखवलेला विश्वास प्रेरणादायी आहे, असे त्यांनी सांगितले.

इन्फिगो ग्रुपची मुंबईसह महाराष्ट्रात १५ हॉस्पिटल असून पुढील वर्षी मार्चपर्यंत आणखी १० हॉस्पिटल सुरू केली जाणार आहेत. २०२४ पर्यंत इन्फिगोची महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महत्वाच्या गावांमध्ये मिळून एकूण ५० हॉस्पिटल असतील, अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पत्रकार परिषदेला सीईओ युनूस खत्री, डॉ. प्रसाद कामत, डॉ. लिसिका गवस, डॉ. वरुण गुप्ता उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply