विकास योजना राबविताना राज्यात कोकण अग्रेसर – विभागीय आयुक्त

नवी मुंबई : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकास योजना राबविताना सुसंवादाचे वातावरण ठेवले, तर मोठे कार्य उभे राहते. म्हणूनच कोकण विभाग शासकीय विकास योजना राबविताना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो, असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त विलास पाटील यांनी केले.

ग्रामीण महाआवास अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि कामगिरीबाबत मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना आज कोकण भवन येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना श्री. पाटील म्हणाले की, कोकण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक ऊर्जा ठेवून यापूर्वीही काम केले आहे. अशीच ऊर्जा पुढेही ठेवावी. कोकण विभाग नेहमीच शासकीय योजना राबविण्याबाबत आघाडीवर असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातील आदर्श आणि सुंदर गावे आहेत. कोकणाला नेहमीच स्वच्छतेची आवड आहे. विकास कामे करताना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महसूल विभागातील पदाधिकाऱ्यांना मोठ्या आवाहनाला सामोरे जावे लागते. लोकप्रतिनिधींनी सर्व पक्षभेद, जातीपाती विसरून एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. आगामी गणेशोत्सव लक्षात ठेवून करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी जागरूक राहून शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी तळागाळापर्यंत करोनाबाबत जनजागृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पुरस्कार अध्यक्ष संजना सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी स्वीकारले.

आज प्रदान करण्यात आलेले पुरस्कार असे – प्रधानमंत्री आवास योजना – (गुणानुक्रमे) ठाणे जिल्हा परिषद, रत्नागिरी जिल्हा परिषद, रायगड जिल्हा परिषद. सर्वोत्कृष्ट पंचायत समिती – म्हसळा (रायगड), दापोली (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग). सवोत्कृष्ट ग्रामपंचायत – वाडोस, कुडाळ, सिंधुदुर्ग, आखवणे भोम, वैभववाडी, सिंधुदुर्ग, सडुरे शिराळे, वैभववाडी, सिंधुदुर्ग. सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था उमेद, जव्हार, पालघर, उमेद, वाडा, जि. पालघर, उमेद- डहाणू, पालघर. शासकीय जागा उपलब्धता- तहसीलदार, कल्याण, ठाणे, तहसीलदार, शहापूर, ठाणे. राज्य पुरस्कृत आवास योजना – सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे. सर्वोत्कृष्ट पंचायत समिती- मोखाडा, पालघर, तलासरी, पालघर, वैभववाडी, सिंधुदुर्ग. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत – अणाव, कुडाळ, सिंधुदुर्ग, मांगवली, वैभववाडी, सिंधुदुर्ग, उमरोली, मंडणगड, रत्नागिरी.

कार्यक्रमास गिरीश भालेराव उपआयुक्त (विकास), मनोज रानडे, उपआयुक्त (सामान्य), मकरंद देशमुख, उपआयुक्त (महसूल), रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, सिंधुदुर्गचे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर तसेच ठाणे, पालघर आणि रायगडचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्यातील काही क्षण

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply