रत्नागिरी : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदारांचे संमेलन आणि रत्नागिरी जिल्हयातील निर्यात होणारी उत्पादने तसेच सेवांविषयीचे प्रदर्शन येत्या शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रत्नागिरीत होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या अल्पबचत सभागृहात शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे उद्घाटन होईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकाच दिवशी एकाच वेळी २४ सप्टेंबरला निर्यात दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने संमेलन आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी होणाऱ्या चर्चासत्रात आजादी का अमृत महोत्सव संकल्पना, निर्यात प्रचालन उपक्रमांचे महत्त्व, निर्यातीसंबंधी विविध टप्पे, प्रक्रिया या अनुषंगाने मार्गदर्शन, जिल्हा निर्यात हब म्हणून विकसित होण्याबाबतची चर्चा, अनुभवकथन, निर्यातवाढीसाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना, प्रोत्साहने, निर्यात प्रचालन परिषदांबाबत मार्गदर्शन, निर्यातीअंतर्गत वित्तीय संस्था, बँकांची भूमिका, सहाय्य, केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्यात सहाय्यभूत संस्थांचे सादरीकरण तसेच निर्यातदारांना असणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने चर्चा तसेच तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन होणार आहे.
कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था, संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, कृषीप्रक्रिया आणि उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. पी. कोलते यांनी केले आहे.

