देवरूख : येथील मातृमंदिरच्या गोकुळ बालिकाश्रमातील मुलींनी दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त साकारलेले आकाशकंदील आणि इतर आकर्षक, उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वनाझचे विनय पानवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
बालिकाश्रमातील मुलींच्या कलागुणांना वाव मिळून त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मातृमंदिरच्या साम्यकुलमध्ये दरवर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते.
मुलींनी आकाशकंदील, पणत्या, विविध भेटवस्तू, तोरणे, पेनस्टँड असे विविध कलाप्रकार तयार केले आहेत. नागरिकांनी या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन मातृमंदिरचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री यांनी केले आहे.
उद्घाटन प्रसंगी सतीश शिर्के, वनाझचे वैभव शिंदे, शशांक शिंदे, डॉ. सायली कासार, प्रतीक पानवळकर, स्वरा शिर्के, सौ.आदिती शिर्के, अपना बँक शाखाधिकारी संतोष केसरकर आदी उपस्थित होते. वैभव शिंदे, शशांक शिंदे यांनी वनाझतर्फे मुलींना विविध वस्तू भेट दिल्या.