रत्नागिरी : ‘व्हॉइस ऑफ महाराष्ट्र’ या ऑनलाइन हिंदी-मराठी गीतगायन स्पर्धेत पहिल्या गटात येथील आदित्य आनंद पंडित याने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धा १५ ते ३५, ३६ ते ५५ आणि ५६ वर्षांवरील अशा तीन गटांमध्ये झाली. निवड फेरीकरिता आदित्यने शंकरसुत गणेश हे गीत सादर केले होते. त्यातून उपान्त्य फेरीसाठी निवडलेल्या सुमारे ७0 स्पर्धकांमध्ये आदित्यची निवड झाली. तेथे त्याने कानडा राजा पंढरीचा हे भक्तिगीत सादर केले. त्यामधून ४० जणांची अंतिम फेरीत निवड झाली. त्यातही आदित्यने बाजी मारली. अंतिम फेरीकरिता आदित्यने सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सादर केला. या गीतांकरिता आदित्यला केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज), मंगेश मोरे (हार्मोनियम) आणि अद्वैत मोरे (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली.
स्वराभिषेक संस्थेत सौ. विनया परब यांच्याकडे आदित्य गेली पाच वर्षे शास्त्रीय गायनाचे धडे घेत आहे. सध्या तो अकरावीत शिकत आहे. अनेक शास्त्रीय आणि सुगम गायन स्पर्धांमधून त्याने उज्ज्वल यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड