कलांगणच्या इंद्रायणी काठी मैफलीला रसिकांची दाद

संगमेश्वर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षानिमित्ताने संगमेश्वर तालुक्यातील कलांगण परिवारातर्फे इंद्रायणी काठी या सुरेल मैफिलीचे आयोजन कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते. मैफलीला रसिकांची उत्तम दाद मिळाली.

ही मैफल धामणी येथील हॉटेल ड्राइव्ह इनच्या लॉनवर झाली. चिपळूणचे प्रख्यात गायक राजाभाऊ शेंबेकर यांनी ही मैफल आपल्या सुरेल गायकीने रंगविली.

मैफिलीची सुरवात ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी..’ या अभंगाने झाली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू, तुज सगुण म्हणू की निर्गुण रे, देव म्हणे नाम्या पाहे, योगी पावन मनाचा आदी भक्तिगीतांनी श्रोत्यांची वाहवा मिळवली. राजाभाऊंनी आळविलेला ‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव….’ हा अभंग लक्षवेधी ठरला. त्यानंतर त्यांनी सखा माझा ज्ञानेश्वर, पैल मेरूचे शिखरी, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला आदी एकाहून एक बहारदार गाणी सादर केली. रसिकांनी प्रत्येक वेळी टाळ्यांचा गजरात उत्स्फूर्त दाद दिली. मैफिलीची सांगता ‘संतांचे संगती मनोमार्ग गती’ या भैरवीने केली.

मैफिलीत सुप्रसिद्ध व्याख्याते आणि प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी निरूपण करून मैफल ओघवती ठेवली. दोन अभंगांच्या मध्यंतरात त्यांनी निरुपणातून संत ज्ञानेश्वरांच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. त्यालाही उपस्थितांनी दाद दिली.

मैफिलीत तबलासाथ हेरंब जोगळेकर, संवादिनी साथ पटवर्धन, पखवाज मिलिंद लिंगायत, झांजसाथ किरण लिंगायत यांनी दिली.मैफिलीपूर्वीचे सूत्रसंचालन समता कोळवणकर यांनी केले. कलांगणचे निबंध कानिटकर यांनी आभार मानले. मैफिलीला ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, कोकण रेल्वेचे महेश पेंडसे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply