शिवराय समजावून सांगणारा शाहीर

पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज, १५ नोव्हेंबर २०२१ (कार्तिकी एकादशी) रोजी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी जुलै महिन्यात त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या आठवणी जागवणारा हा लेख..
….
ते १९८० साल होतं. मी पत्रकारितेत आणि मुंबईतही तसा नवखाच होतो. तेव्हा मी डोंबिवलीला राहायला होतो. ‘मुंबई सकाळ’मध्ये काम करत होतो. त्यावर्षी ‘मुंबई सकाळ’ने ‘मुंबई संध्या’ नावाचं संध्याकाळचं दैनिक सुरू केलं होतं. या दैनिकाचा डोंबिवलीचा बातमीदार म्हणून मी काम करत होतो. याच काळात डिसेंबरमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची दहा दिवसांची शिवचरित्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. बाबासाहेब पुरंदरे यांचं ‘राजा शिवछत्रपती’ हे पुस्तक मी त्यापूर्वी पाहिलं होतं, हाताळलंही होतं, पण संपूर्णपणे वाचलेलं नव्हतं. त्यांची शिवचरित्र व्याख्यानमाला डोंबिवलीत सुरू होणार आहे, हे समजल्यानंतर मी पहिल्या दिवशी त्या ठिकाणी हजर झालो. उद्घाटनाची बातमी तेवढी करायची, एवढाच माझा उद्देश होता. पण त्यांचं ते पहिलंच व्याख्यान ऐकल्यानंतर मी दररोज संध्याकाळी या व्याख्यानमालेला जाऊ लागलो. बाबासाहेब पुरंदरे यांना त्या व्याख्यानाच्या निमित्ताने मी सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं. त्यांची ओघवती वाणी ऐकून मी भारावून गेलो. ‘राजा शिवछत्रपती’ हे त्यांचं पुस्तक याआधी मी का वाचून काढलं नव्हतं, हा प्रश्नही मला सतावू लागला.

‘आदिशक्ती तुळजाभवानी’ या शब्दांनी ते आपल्या व्याख्यानाची सुरुवात करत. अत्यंत भारदस्त आवाजात त्यांनी उच्चारलेले ते शब्द हृदयात आतपर्यंत पोहोचत असत. संध्याकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला त्यांचं व्याख्यान सुरू होत असे. व्याख्यानमालेत शिवरायांच्या काळातील संदर्भ ते इतके चपखलपणे देत असत की आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहोत, असं वाटावं. तो प्रसंग मूर्तिमंत उभा करणं हेच त्यांचं कसब होतं. लोकांच्या मनामनामध्ये शिवाजी महाराज पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी ते कसब कमावलं होतं. नुसतीच कादंबरी वाचली असती तर कदाचित वेगवेगळ्या शस्त्रांची नावं डोळ्यांखालून गेली असती, पण विशिष्ट शस्त्र कुठल्या पद्धतीने हाती घेतलं जात असे, त्याचा उपयोग कोणता, तोमरसारखं विषारी शस्त्र कसं तयार केलं जात असे आणि ते कोणत्या प्रसंगात वापरलं जात असे, असे बारकावेसुद्धा त्यांच्या व्याख्यानातून समोर येत. त्यामुळे शिवचरित्र वाचणं नंतरच्या काळात खूपच सोपं होऊन गेलं. शिवरायांच्या लढाया, शत्रूवर केलेली चाल, वेगवेगळे किल्ले ताब्यात घेण्याच्या मोहिमा, नव्यानं वसविलेला सिंधुदुर्ग किल्ला अशा विविध प्रसंगांमधून दहा दिवसांच्या त्या व्याख्यानमालेमध्ये संपूर्ण शिवचरित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. महाराष्ट्रातल्या कोट्यवधी लोकांना शिवाजी महाराजांविषयीची अशी परिपूर्ण माहिती अत्यंत रंजक पद्धतीने अन्य कोणीही दिली नाही. त्यांच्यामुळेच महाराष्ट्राला शिवरायांची परिपूर्ण ओळख झाली.

व्याख्यानमालेत वर्तमानकाळातल्या विविध घटना आणि प्रसंगांचा उल्लेख ते करत असत. त्यातून शिवशाहीतले प्रसंग जिवंत होत असत. ताज्या प्रसंगांविषयीची बातमी तयार करून मी ‘मुंबई संध्या’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी देत असे. डोंबिवलीतल्या त्या व्याख्यानमालेत एके दिवशी त्यांनी टीका केली, की साहित्य संमेलनं म्हणजे दारूड्यांचे वार्षिक अड्डेआहेत. ते त्यांचं विधान अत्यंत स्फोटक होतं. साहित्य संमेलनांमध्ये कोणती चर्चा झाली पाहिजे, याविषयी त्यांनी तेव्हा मल्लीनाथी केली होती. ‘इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्याविषयी चर्चा आणि परिसंवाद होण्याच्या ऐवजी तात्कालिक कोणते तरी विषय तेथे चर्चिले जातात आणि एकंदरीत त्यात सहभागी होणाऱ्या साहित्यिकांकडे पाहिलं तर ते संमेलन म्हणजे दारूड्यांचे वार्षिक अड्डे ठरले आहेत,’ असं विधान त्यांनी केलं होतं. ‘मुंबई संध्या’मध्ये मी पाठवलेल्या बातमीमध्ये ते लिहिलं होतं. संध्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांमध्ये स्फोटक बातम्या आणि त्यांचे मथळे जरूरीचे असायचे. आता अलीकडे संध्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांची प्रथाच बंद झाल्यात जमा आहे. पण तेव्हा अशा घटना आणि प्रसंगाचं महत्त्व असायचं. बाबासाहेबांचं ते विधान जसंच्या तसं प्रसिद्ध झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी ‘बाबासाहेब, तोल सुटला’ अशा मथळ्यात अग्रलेखही ‘मुंबई संध्या’मध्ये प्रसिद्ध झाला. कमी-अधिक प्रमाणात इतर दैनिकांनीही बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या विधानाची दखल घेतली होती. त्यांच्यावर टीकाही केली होती.

बाबासाहेबांच्या घरी असलेला शस्त्रसंग्रह

‘मुंबई संध्या’मध्ये त्यांची बातमी माझ्या नावाने म्हणजेच बा. वि. कोनकर या बायलाइनने प्रसिद्ध झाली. त्या दिवशी संध्याकाळीही मी त्यांच्या व्याख्यानाला हजर होतोच. माझ्या नावाने बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांनी माझं नाव पुकारलं आणि व्याख्यान झाल्यानंतर मला भेटून जावं अशी सूचना केली. पत्रकारितेत मी तसा नवीनच होतो. त्यामुळे माझं काहीतरी नक्कीच चुकलं असणार, आता बाबासाहेबांसारख्या मोठ्या व्यक्तीकडून बोलून घ्यावं लागणार, अशी धाकधूक मनात निर्माण झाली. व्याख्यान संपलं. मी त्यांना भेटायला गेलो होतो, तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने मला आलिंगन दिलं. माझी चौकशी केली आणि दुसऱ्या दिवशी ते ज्या सामंत डेअरीच्या इमारतीमध्ये उतरले होते, त्या ठिकाणी यायचं निमंत्रण मला दिलं. मी दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्यांना भेटायला गेलो. अत्यंत दिलखुलास हसून त्यांनी माझं स्वागत केलं आणि बोलायला सुरुवात केली. ‘कोनकर, तुमच्या नावाला इतिहास आहे. तुम्हाला तुमचा इतिहास माहीत आहे का?’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला. आज मुंबईत जी इमारत जुनं सचिवालय म्हणून ओळखली जाते, त्या इमारतीच्या पायाभरणी समारंभाचं पौरोहित्य माझ्याच कोण्या दूरच्या पूर्वजानं केलं होतं. ते नाव त्या इमारतीच्या कोनशिलेमध्ये कोरलेलं होतं, हे मला माहीत होतं. कल्याणमध्ये कोनकरवाडा होता, हेही मला माहीत होतं. पण त्यापलीकडे मला काही इतिहास माहिती नव्हता. बाबासाहेबांनी सांगितलं, ‘कोनकरांना पेशवाईमध्ये मोठा मान होता. पुण्यात कोनकरांचा एक वाडा होता. कलाकुसरीसाठी तो प्रसिद्ध होता. या वाड्याची इमारत जीर्ण झाल्यामुळे पाडायचं ठरलं. पण त्यापूर्वी या इमारतीमधल्या भिंतीचा तुकडा संग्रहित करण्याचं ठरवण्यात आलं. तो तुकडा मुंबईतल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात जतन करण्यात आला आहे. तुम्ही तो पाहिला आहे का?’ असं त्यांनी मला विचारलं. अर्थातच ते मला माहीत नव्हतं. त्यानंतर इतरही काही गप्पा झाल्या. म्हणजे त्यांनी सांगितलं आणि मी ऐकलं. कोकणातलं आरमाराचा स्थान, शिवशाहीमध्ये शिवरायांनी निर्माण केलेल्या आरमाराचं महत्त्व, आरमाराचा शिवरायांनी केलेला अभ्यास अशी बरीच माहिती त्यांनी मला दिली. नव्या, पुढच्या पिढ्यांनी शिवरायांचे संदर्भ केवळ इतिहास म्हणून न देता परिस्थितीनुसार आपण कसे बदल केले पाहिजेत, याबद्दलही त्यांनी सांगितलं. सुमारे दोन तास ही भेट झाली. मी पत्रकारितेमध्ये नवखाच होतो. त्यामुळे त्यांनी जे काही सांगितलं, त्याची मी फक्त श्रवणभक्ती केली. त्यावर काही लिहावं, काही टिपणं करावीत, असं मला तेव्हा वाटलं नाही. त्यामुळे त्यावेळच्या भेटीचा कोणता संदर्भ आता माझ्याकडे राहिला नाही. फक्त अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले मराठी मनामनामध्ये पोहोचलेले बाबासाहेब मला प्रत्यक्ष भेटले, याचाच आनंद मला झाला आणि तो मी अजूनही जपून ठेवला आहे.

बाबासाहेबांच्या या भेटीनंतर शिवरायांची राजधानी असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड, लोणावळ्याजवळचे लोहगड आणि विसापूर हे किल्ले, रत्नागिरीचा रत्नदुर्ग, मालवणचा सिंधुदुर्ग, लांजा तालुक्यातल्या साटवली गावची गढी अशा काही ऐतिहासिक वास्तू मी पाहिल्या. त्या वास्तूंचा इतिहास फारसा माझ्या डोक्यात नव्हता. पण किल्ला कसा पाहावा, याविषयी बाबासाहेबांनी सांगितलेली काही वाक्यं मात्र तेव्हा आठवत होती.

बाबासाहेब पुरंदरे त्यानंतर अप्रत्यक्षरीत्या भेटले, ते ‘जाणता राजा’ या त्यांनी तयार केलेल्या महानाट्याच्या निमित्ताने. राजाशिवछत्रपती पुस्तकातले काही निवडक प्रसंग त्यामध्ये उभे करण्यात आले होते. अतिभव्य अशा पटांगणावर ठाण्यात आणि रत्नागिरीतही मी हे महानाट्य पाहिलं.

असंच अतिभव्य शिवसृष्टीचं त्यांचं स्वप्न सर्वांना माहीत आहेच. त्यासाठी त्यांची चाललेली धडपड शतकाच्या उंबरठ्यावर असतानासुद्धा या स्मारकासाठी त्यांची सुरू असलेली तळमळ महाराष्ट्राने पाहिली आहे. असंच एक छोट्या स्वरूपाचं प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कसालजवळच्या सुकळवाड गावात उभारण्याचा प्रयत्न झाला. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. या प्रदर्शनाबाबतही बाबासाहेब सातत्यानं पाठपुरावा करत होते. मात्र ती शिवसृष्टी प्रत्यक्षात येऊ शकली नाही. जागा आणि निधी या दोन्हींचा अभाव त्याला कारणीभूत ठरला. अर्धीअधिक तयार झालेली ती शिवसृष्टी मी पाहून आलो होतो. पण ती पुढे प्रत्यक्षात आली नसल्याचं समजलं आणि वाईट वाटलं. (त्या संदर्भात साप्ताहिक ‘कोकण मीडिया’च्या सप्टेंबर २०१७ मधल्या एका अंकात मी लिहिलेला लेख इमेज स्वरूपात या लेखाच्या शेवटी दिला आहे.)

शिवरायांच्या आयुष्यातले प्रसंग त्या त्या वेळी त्या त्या दिवशी त्या त्या रात्री अनुभवण्यासाठी बाबासाहेबांनी त्या त्या गडावर स्वारी केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी ते प्रसंग कसे घडले असतील, याचं चित्र त्यांनी स्वतः डोळ्यांसमोर उभं केलं. म्हणूनच ते त्याच ताकदीने व्याख्यानमालेमध्ये आणि ‘जाणता राजा’सारख्या महानाट्यामध्ये लोकांसमोर उभे करू शकले. शिवाजी महाराजांनी त्यांचं अवघं आयुष्य व्यापून टाकलं होतं. म्हणूनच राज्य पातळीवरचा महाराष्ट्र भूषण आणि आणि देश पातळीवरचा पद्मविभूषण सन्मान त्यांना मिळाला, तेव्हा निर्माण झालेली नाराजी व्यथित करून गेली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट – पाच सप्टेंबर २०१७ – पुरंदरे वाडा, पुणे


बाबासाहेबांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग मला पुन्हा एकदा चार वर्षांपूर्वी आला. मुंबईतून रत्नागिरीत येऊन स्थायिक झाल्यानंतर आणि नोकरीतून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ‘कोकण मीडिया’ नावाची माध्यमविषयक संस्था सुरू केली. त्यामार्फत शंभर वर्षांपूर्वीच्या ‘झोपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचं पुनर्मुद्रण आम्ही केलं होतं. त्याची प्रत आणि ‘कोकण मीडिया’ नावाच्या सुरू केलेल्या साप्ताहिकाच्या प्रती देण्यासाठी मी त्यांच्या पुण्यातल्या पुरंदरे वाड्यावर गेलो होतो. त्यांनी पुस्तक चाळून पाहिलं. शंभर वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेचा गोडवा कसा होता, याचा चांगला प्रत्यय आल्याचं त्यांनी सांगितलं. मूळ पुस्तक मोडी लिपीमध्ये होतं का, असंही त्यांनी विचारलं. अर्थातच त्याची मला माहिती नव्हती. कोकणात सुरू केलेल्या ‘कोकण मीडिया’ साप्ताहिकाचंही त्यांनी कौतुक केलं. ही माझी त्यांची घडलेली अखेरची भेट होती. पहिली भेट आणि ३५ वर्षांनंतरची भेट यात काळाचा अंतर असलं तरी त्यांच्या बोलण्यातला ठाशीवपणा तसाच होता, हे जाणवलं. तो अनंत काळ कायम राहील, अशी खात्री होतीच. पण मानवी जीवन आणि नियती यांची गणितं ठरलेली असतात. त्याला बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वालाही शरण जावं लागलं. त्याला कोणताच इलाज नाही. पण मराठी मनामनामध्ये शिवाजी महाराज पोहोचविणारा, शिवरायांचं व्यक्तिमत्त्व समजावून सांगणारा इतिहासपुरुष इतिहासजमा झाला याची खंत वाटते. अर्थातच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बाबासाहेब पुरंदरे हे निश्चितच सोनेरी पान होतं. या सोनेरी पानाला प्रत्यक्ष भेटण्याचा मोठा ठेवा मला लाभला, हे लक्षात आलं की कृतकृत्य वाटतं. बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा दंडवत!

  • प्रमोद कोनकर, रत्नागिरी
    १५-११-२०२१
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply