रत्नागिरी : शब्दकोड्याच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमुळे आभासी पद्धतीने एकत्र आलेल्या सदस्यांनी समाजातील गरजू आणि गरीब विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजांचे कोडे आर्थिक मदतीतून सोडविले आहे. कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील ए. के. मराठे यांनी चालविलेल्या या ग्रुपमुळे अनेक विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे.
शब्दकोडे हे ए. के. मराठे यांच्या ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. मराठीतील गाणी, म्हणी, पर्यायी शब्द शोधून काढायला प्रवृत्त करणे हा श्री. मराठे यांचा व्हॉट्स अॅप ग्रुपवर कोडी देण्याचा उद्देश आहे आतापर्यंत या पद्धतीने सलगपणे ६३० शब्दकोडी त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कोड्यांची अचूक उत्तरे देणाऱ्या पाच जणांच भाग्यवान विजेते म्हणून निवड केली जाते. या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यातील सदस्यही सहभागी होऊन विजेते ठरले आहेत.
अशा या ग्रुपतर्फे सदस्यांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. पावस तीर्थक्षेत्रापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात वसलेल्या कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील शिक्षण सुधारक समिती संचालित राधा पुरुषोत्तम माध्यमिक विद्यालय तसेच प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या शंभरहून अधिक विद्यार्थिनी शेतमजुरी करून उपजीविका चालविणाऱ्या गरीब आणि गरजू कुटुंबातील आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली नाही, म्हणून त्यांची शैक्षणिक प्रगती रखडू नये, यासाठी शिक्षण सुधारक समिती नेहमीच प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेचे नूतन कार्यवाह श्री. मराठे यांनी भाऊबीज भेट देण्याचे आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक कोडेप्रेमी स्नेह्यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी भरभरून मदत दिली. शिक्षण सुधारक समितीच्या नावे बँकेच्या खात्यात थेट मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
जमा झालेल्या रकमेतून पहिली ते आठवीतील गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना भाऊबीज भेट म्हणून शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्याचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष वसंतकाका फडके, कार्यवाह श्री. मराठे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय फडके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.नवाथे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. आताच्या घेणाऱ्या हातांनी मोठेपणी देणारे हात झाले पाहिजे, असे आवाहन याप्रसंगी श्री. मराठे यांनी लाभार्थी तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना केले. घेण्यापेक्षाही देण्याचा संस्कार रुजणे जास्त गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी आर्थिक मदत देणाऱ्या कोडेप्रेमी स्नेह्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

…………….