स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त २६ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा

रत्नागिरी : प. पू. स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त येत्या रविवारी (दि. २६ डिसेंबर) रत्नागिरी ते पावस अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.

स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रत्नागिरीकर नागरिक ॐ राम कृष्ण हरि नामस्मरण करत पहाटेच्या धुंद वातावरणात परमेश्‍वराचे नाम उच्चारत तसेच ज्ञानदेवांचा हरिपाठ गात पावसला जाण्याचा भक्तिमार्ग वर्षातून एकदा तरी अनुभवावा, या उद्देशाने दरवर्षी पदयात्रा काढली जाते. यावर्षी २६ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता पदयात्रेला प्रारंभ होईल.

चालण्याने आरोग्याची तपासणी करता येते. आपला धीर, संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही चालण्याची स्पर्धा नाही. पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्वास किती खोलवर घेता येतो, हे अजमावल्यामुळे आपल्या जगण्याला नवी उभारी येते. सकाळचे धुके, राजिवड्याच्या समुद्राची गाज, गुलाबी थंडी, पहाटेचे वातावरण, सुमधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गात सर्व वारकरी मार्गक्रमण करतात. ही वारी पावस येथे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोहोचेल. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग गायन, अल्पोपाहार झाल्यानंतर वारीची समाप्ती होईल. सर्वांचे शक्यतो पांढरे कपडे असावेत. पुरुषांसाठी पांढरी टोपी आवश्यक आहे. आवश्यकता असल्यास पाण्याची बाटली आणावी. शक्यतो सर्वांनी नेहमीच्या वापरातले साधे चालण्यासाठीचे बूट/चप्पल घालावेत. आपले नाव, पत्ता, फोन नंबर लिहून आणून ते संयोजकांकडे द्यावे.

अधिक माहितीसाठी राजन पटवर्धन (9860366991) आणि अनंत आगाशे (7083162975) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply