नाताळ, नववर्षासाठी पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वेच्या तीन विशेष गाड्या

नवी मुंबई : नाताळ आणि नववर्ष दिन साजरा करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी तीन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सुरत-मडगाव आणि वांद्रे-करमळी या दोन मार्गावर या तीन गाड्या धावणार आहेत. कोकण रेल्वेने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले आहे.

त्यापैकी 09193/09194 क्रमांकाची विशेष तिकीटदराची सुरत-मडगाव-सुरत साप्ताहिक गाडी २१ आणि २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुरत येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता मडगावला पोहोचेल. जाताना आणि येताना ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी २२ आणि २९ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी मडगाव येथून रवाना होणार असून सुरत येथे ती दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.

याच मार्गावर आणि त्याच वेळापत्रकानुसार धावणारी 09187/09188 क्रमांकाची द्विसाप्ताहिक सुरत-मडगाव-सुरत गाडी २२, २४ आणि २९ डिसेंबर रोजी सुरत येथून सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी २३, २५ आणि ३० डिसेंबर रोजी सुटेल.

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांकरिता वांद्रे-करमळी-वांद्रे या मार्गावर 09191/09192 या क्रमांकाची विशेष गाडी धावणार आहे. ती २३ आणि ३० डिसेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी २४ आणि ३१ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी करमळी येथून रवाना होईल आणि वांद्रे येथे रात्री आठ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी जाताना आणि येताना बोरिवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी येथे थांबेल.

या सर्व गाड्यांचे आरक्षण रविवार, २९ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply