प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेमुळे आंबा उद्योगाला वाव – अनिल परब

रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी २०२४-२५ पर्यंतच्या पाच वर्षांसाठी राबविली जात आहे. एक जिल्हा एक उत्पादन हे या योजनेचे तत्त्व असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी आंबा हे पीक निवडण्यात आले आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील फळांवर आधारित अन्नप्रक्रिया उद्योगास मोठा वाव असल्याने जास्तीत जास्त लाभार्थींनी या योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी केले.

त्र्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्याच्या सर्वंकष प्रगतीचा आढावा घेतला. विविध योजनांमध्ये जिल्ह्याने साधलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील २४ हजार ३३ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी २२ हजार ६६८ शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे. कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह साह्य योजना शासनाने आणली असून जिल्ह्यातील सुमारे ८६६ जणांना त्याचा लाभ मिळाला आहे. ज्यांनी या योजनेसाठी ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत. करोना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहेत. पंधराव्या वित्त आयोगातील अबाधित निधीच्या २५ टक्के निधीतून कोविडविषयक बाबींसाठी खर्च करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनदेखील चालू वर्षाच्या मंजूर २५० कोटींच्या ३० टक्के निधी कोविड‍विषयक कामांसाठी राखून ठेवल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. करोनाप्रतिबंधासाठी आवश्यक त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग उत्तम काम करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कोविड, नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, तौते वादल आणि अतिवृष्टीच्या काळात शासनाने दिलेल्या नुकसानभरपाईची माहिती देतानाच विविध संस्था, संघटनांनी केलेल्या मदतीचा पालकमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील १४ बहुआपत्तीप्रवण जिल्ह्यांपैकी एक असून जिल्ह्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचे प्रमाण जास्त आहे. अशा आपत्तींमध्ये तातडीची मदत आणि बचाव कार्यासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नावीन्ययपूर्ण योजनेतून विविध उपक्रमांना मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षणात खेड पालिकेने देश पातळीवर ३६ वा, तर पश्चिम विभागातील पाच राज्यांमध्ये सोळावा क्रमांक मिळविला. दापोली नगर पंचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात करून तिसऱ्या राष्ट्रीय जलपुरस्कार योजनेत देशात दुसरा क्रमांक मिळविला. याबाबत पालकमंत्र्यांनी या दोन्ही पालिकांचे कौतुक तेले.

रत्नागिरी जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप करण्याची मोहिम गेल्या २ ऑक्टोबरपासून सुरू झाली. आतापर्यंत जिल्हयातील ९४ टक्के शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती देतानाच ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या कृषीपंप वीजजोडणी धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. परब यांनी शेतकऱ्यांना केले. पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता निसर्ग पर्यटनाचा विकास, स्थानिक लोकांच्या संस्कृतीचे जतन आणि रोजगाराला चालना देण्यासाठी तसेच कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता चिपळू वन विभागामार्फत कांदळवन उद्यान निर्मितीचे काम हाती घेतले आहे. कर्ला जुवे (ता. रत्नागिरी) येथे १४.७९ हेक्टर क्षेत्रावर १० कोटी रुपये आणि जुवे जैतापूर (ता. राजापूर) येथे १०.६० हेक्टर क्षेत्रावर रक्कम १० कोटी रुपये अशी २० कोटीची कामे प्रस्तावित केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कांदळवन कक्षामार्फत स्थानिक युवकांना रोजगार निर्मितीकरिता प्रस्तावित केलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी दिशा पातकर हिची आज प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राजपथावरील संचलनासाठी निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी तिचे अभिनंदन केले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply