पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र शासनाकडून दत्तक – उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्या मागणीनुसार केंद्र शासनाने पर्यटनाच्या विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त येथील मुख्य शासकीय सोहळ्यात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस संचलन मैदानावर झालेल्या या जिल्ह्याच्या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, राजेंद्र पराडकर, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाच जिल्ह्यांच्या विकासाबाबत मागणी केली होती. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने हा जिल्हा दत्तक घेतल्याचे घोषित केले आहे. त्याचबरोबर यवतमाळ हा जिल्हा शिक्षणासाठी घेण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा यापूर्वीच पर्यटन जिल्हा जाहीर झाला आहे. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी निश्चितच चांगल्या पायाभूत सुविधा केल्या जातील, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंप वीज जोडणी धोरण जाहीर केले आहे. या धोरणामध्ये वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात ६६ टक्क्यांपर्यंत सूट देऊन त्यांना वीज बिल कोरे करण्याची संधी उपलब्ध केली आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही सवलत घ्यावी शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या योजनेत कृषीपंप ग्राहकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. वीज बिलाच्या वसूल झालेल्या रकमेतून ३३ टक्के ग्रामपंचायत व ३३ टक्के जिल्हा पातळीवर हा निधी पायाभूत सुविधेसाठी वापर करता येणार आहे. कृषीपंप ग्राहकांनी या धोरणाचा लाभ घेऊन वीज बिल कोरे करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

श्री. सामंत पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य जणांनी बलिदान केले. देशाची एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमता कायम राखण्यासाठी अनेक शूर सैनिकांनी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व वीर पुत्रांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, सैन्यदलातील, तसेच राज्याच्या पोलीस दलातील आजी माजी अधिकारी, कर्मचारी, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पत्रकारिता, समाजकारण आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्व बंधू-भगिनींचे स्वागत करतो. देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही परंपरा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सदैव क्रियाशील राहावे. एकता आणि बंधुता यांचा संदेश देणारी आपली लोकशाही जगात सर्वोत्कृष्ट आहे. अशी ही लोकशाही चिरंतर टिकावी यासाठीही आपण सजग राहावे.

आज देश करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. करोना अजून संपलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी करोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे पालन करावे. लसीकरणही करून घ्यावे. करोनावर लवकरच आपण निश्चितपणे अंतिम विजय मिळवू. त्यासाठी आपणाला नियमांचे पालन करून संयमाने लढायचे आहे.

यावेळी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय व गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांना पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमास आजी – माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी उपस्थितांची भेट घेतली. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर, सर्व सभापती, विषय समिती प्रमुख व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. जिल्हा न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply