जनरल बिपिन रावत, ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे पद्मविभूषण; कोकणाच्या दोन सुपुत्रांना पद्मश्री

नवी दिल्ली : देशाच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे (पुणे) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात अलीकडेच मरण पावलेले भारतीय लष्कराचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. कोविशिल्ड लसनिर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे संस्थापक सायरस पूनावाला आणि कोव्हॅक्सिन निर्मात्या भारत बायोटेक कंपनीचे संस्थापक कृष्णा एल्ला आणि त्यांची पत्नी सुचित्रा एल्ला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असलेले दिवंगत आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे आणि विंचूदंश-सर्पदंशावरच्या गुणकारी औषधोपचारांसाठी ओळखले जाणारे डॉ. हिंमतराव बावस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण, प्रसिद्ध गायक सोनू निगम, डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे आदींचा पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि गुगल-अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

यंदा एकूण १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. चौघांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि १०८ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एक पद्मश्री पुरस्कार विभागून दिला जाणार आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये ३४ महिला, १० परदेशी नागरिक किंवा अनिवासी भारतीय असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे. गेल्या वर्षी परशुराम गंगावणे या सिंधुदुर्गातील ज्येष्ठ लोककलावंताला पद्मश्री पुरस्कार मिळाला. यंदा पद्मश्री जाहीर झालेले दिवंगत आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेडकुळी. तसेच, रायगड जिल्हा ही डॉ. हिम्मतराव बावस्कर यांची कर्मभूमी. त्यांच्या रूपाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सुपुत्रांना पद्मश्री सन्मान मिळाला आहे. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे आणि डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या कार्याची संक्षिप्त ओळख खाली करून दिली आहे.

यंदाच्या पद्म पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्रातील एकूण १० जणांचा समावेश असून, वर उल्लेख केलेल्या नावांव्यतिरिक्त टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन (पद्मविभूषण), अनिलकुमार राजवंशी (पद्मश्री), डॉ. भीमसेन सिंघल (पद्मश्री) यांचाही त्यात समावेश आहे.

पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींची सविस्तर यादी सोबत दिली आहे.

डॉ. हिम्मतराव बावस्कर

डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी विंचूदंश व सर्पदंश यांवर गुणकारी औषधाचा शोध लावला. त्यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण बुलढाण्याच्या सरकारी हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळविली (१९७४) आणि नंतर पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून एमडी पदवी संपादन केली (१९८१). विद्यार्थीदशेत ‘कमवा आणि शिका’ या योजनेत काम करून, तसेच किरकोळ कामे करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बावस्कर रायगड जिल्ह्यातील बिरवाडी, महाड, पोलादपूर, अलिबाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत, तसेच पूना चेस्ड हॉस्पिटल यांत वैद्यकीय अधिकारी म्हणून १९७६—८६ पर्यंत कार्यरत होते. दरम्यान ते डॉ. प्रमोदिनी यांच्याशी विवाहबद्ध झाले (१९८१). महाड येथे त्या दोघांनी बावस्कर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुरू केले. अतिदक्षता विभागासहित हे रुग्णालय सज्ज असून, विंचूदंश व सर्पदंश यांमुळे उद्भवणारे रोग,Hypothyroidism, फ्ल्युओरिन क्षारांचे अति सेवन इत्यादी आजारावर तिथे गोरगरिबांवर मोफत उपचार केले जातात.

बावस्कर यांनी सलाइनद्वारे नायट्रोप्रुसाइड औषध देऊन तीव्र विंचूबाधा झालेले रुग्ण बरे केले आणि त्याच उपचार पद्धतीने केवळ एका महिन्यात विंचू विषबाधेचे ६५ रुग्ण बरे केले. सोडियम नायट्रोप्रुसाइडसारखे औषध अतिदक्षता विभागातसुद्धा फारसे वापरले जात नसल्याने त्यांनी अधिक सुरक्षित उपचारांचा शोध सुरू केला. वैद्यकीय शोधनिबंधांतून त्यांना प्राझोसिन नावाचे हृदय विकारावर उपयोगी पडणारे औषध ज्ञात झाले. विंचू दंशानंतर मानवी अधिवृक्क ग्रंथीमधून कॅटेकॉल अमाइन्स मोठ्या प्रमाणात रक्तात मिसळतात. यांवर उपचार म्हणून प्राझोसिन वापरता येईल, हा त्यांचा अंदाज खरा ठरला. त्यांनी प्राझोसिनचा वापर करून १२६ विंचू विषबाधेचे रुग्ण बरे केले (१९८४). ‘विंचू विषबाधेमुळे हृदयावर झालेल्या परिणामावर प्राझोसिन उपचार ’ अशा शीर्षकाचा त्यांचा शोधनिबंध ‘लॅन्सेट’ या जगन्मान्य वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला (१९८६). प्राझोसिन ह्या विंचू विषबाधेवरील उपचारांमुळे कोकणातील मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ३०—४० टक्क्यांनी कमी झाली. जवळपास तीस हजाराहून वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी विंचू दंश उपचार करण्यासाठी प्रशिक्षित केले. त्यांच्या या उपचार पद्धतीची दखल अनेक वैद्यकीय नियतकालिकांमध्ये घेतली गेली आहे. त्यांच्या या संशोधनावर त्यांना तीसहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. (डॉ. बावस्कर यांच्याविषयीची माहिती – साभार – मराठी विश्वकोश)

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे

भालचंद्र वासुदेव तांबे असे बालाजी तांबे यांचे मूळ नाव. बालाजी या नावाने ते प्रसिद्ध झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील निवसर रेल्वे स्थानकानजीक खेडकुळी हे बालाजी तांबे यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील बडोदा येथे गेले. तेथेच २८ जून १९४० रोजी बालाजींचा जन्म झाला. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. बालाजींना लहानपणापासूनच वडिलांनी आयुर्वेद शिकविला. पुढे बालाजींनी आयुर्वेदातील आणि अभियांत्रिकीमधील पदवी एकाच वर्षी मिळविली. आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांचा त्यांचा व्यासंग होता. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील कार्ले येथे त्यांनी आत्मसंतुलन व्हिलेज स्थापन केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाबद्दल जनजागृती केली. त्यानिमित्ताने राजकीय, अभिनेते, संगीत, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या आश्रमाला भेटी देत असत. परदेशातील नागरिकही त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून कार्ल्यात जात असत. १० ऑगस्ट २०२१ रोजी त्यांचे निधन झाले.

आयुर्वेदाचा प्रसार त्यांनी जर्मनीतही केला होता. आयुर्वेदाचा अभ्यास करू इच्छिणारे आणि आयुर्वेद जाणून घेऊ इच्छिणारे जर्मनीतील अनेक अनुयायी त्यांच्यासोबत खेडकुळी येथे येत असत. मंदिराच्या उत्सवाच्या काळात पार पडणाऱ्या विविध पारंपरिक कार्यक्रमांमध्ये हे ही मंडळी आवर्जून सहभागी होत असे त्यानिमित्ताने कोकणातील प्रथा आणि परंपरांचा अभ्यासही काही काहींनी केला.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवर संशोधन केले. सुदृढ नवीन पिढीसाठी त्यांनी लिहिलेले ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. त्यांच्या इतरही पुस्तकांना मोठी मागणी होती. आरोग्यविषयक घडामोडींवर अत्यंत जागरूकपणे त्यांनी अनेक दशके काम केले. त्यांनी विविध विषयांवर शेकडो लेख लिहिले. नागरिकांमध्ये आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. शास्त्रशुद्ध आणि गुणत्तापूर्ण आयुर्वेदीय औषधांचे संशोधन आणि निर्मिती करून ती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यातून विविध समाजघटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद हे केवळ भारतापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रसार केला आणि त्याचे महत्त्व परदेशातील नागरिकांनाही आपल्या ओघवत्या शैलीतून पटवून दिले. ‘साम’ वाहिनीवर श्रीमत भगवद्त गीतेचे निरूपण ते करत होते. त्याला मोठा प्रेक्षकवर्ग होता. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविले.

खेडकुळी (ता. रत्नागिरी) येथील गणपती मंदिराचे प्रवेशद्वार

आयुर्वेदाच्या माध्यमातून महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर तसेच जर्मनी पर्यंत आयुर्वेदातील विविध उपक्रम राबवत असतानाच आपले खेडकुळी हे गाव आणि निस्सीम भक्ती असलेल्या गणपती या आराध्य दैवताकडे त्यांनी लक्ष पुरविले. गावातील नवसाला पावणाऱ्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. गेली सुमारे वीस वर्षे ते दरवर्षी माघ महिन्यात गणेश जयंतीला आपल्या मूळ गावी येत असत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply