राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकणबाग अॅग्रो टुरिझम शेतकरी कंपनी, जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य शासनाचा कृषि विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रायपाटण (ता. राजापूर) येथील कोकणबाग या नोंदणीकृत शेतकरी कंपनीतर्फे २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ओणी येथील गजानन मंगल कार्यालयात हा शेतकरी मेळावा होईल. मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे आणि बँकेच्या संचालकांसह विविध निमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याला राजापूर आणि लांजा तालुक्यातील जास्तीतजास्त प्रगतीशील शेतकरी व बागायतदार यांचेशी विविध माध्यमांतून निमंत्रणासाठी संपर्क साधला जाणार आहे.
कोकणातील आंबा, काजू तसेच कोकम, नारळ बागायतदारांना फलोत्पादनाच्या माध्यमातून प्रक्रिया आणि मूल्यवर्धित उत्पादने यासाठी या मेळाव्यात तज्ज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. कोकणबाग अॅग्रोटुरिझम या शेतकरी उत्पादक कंपनीकडून गेले दीड वर्ष विविध प्रकारच्या शेती उत्पादनांचा व्यापार सुरू आहे. राजापूर तालुक्यातील तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासदांना कोकणबाग कंपनीच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ मिळावी, म्हणून कंपनी कार्यरत राहणार आहे.
ओणी येथील मेळाव्यातून उपस्थित फळ बागायतदारांना, शेतकरी आणि बचतगट यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन केले जाणार आहे. मेळाव्याला जास्तीत जास्त बागायतदार आणि शेतकरी, बचतगट, प्रगतिशील महिला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकणबाग कंपनीचे संचालक महेश पळसुलेदेसाई यांनी गेले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी संचालक दीपक पवार (8275727710) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
