खारवी समाज पतसंस्थेला १८ लाख २९ हजाराचा निव्वळ नफा – संतोष पावरी

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्यांच्या कार्यकाळात १८लाख २९ हजाराचा नफा प्राप्त करत अ वर्ग प्राप्त करून जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. पतसंस्थेची ही वाटचाल खऱ्या अर्थाने विश्वासहार्य होताना दिसत आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष संतोष पावरी यांनी केले.

अध्यक्ष संतोष पावरी

ते म्हणाले, ४० महिन्यांत कालावधीत जवळजवळ २० महिने करोना महामारीने ग्रासलेला होता. दीर्घकालीन लॉकडाउनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र आणि जलद सेवा देत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणांच्या नियोजनबद्ध वापरामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केले आहे. अल्पावधीतच संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम झाला आहे. संस्था आपल्या आर्थिक सक्षमतेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत तसेच सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक स्पर्धेच्या या युगात अर्थकारणाची गती राखण्याचे आव्हान पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत पतसंस्थेने आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णू केला आहे.

श्री. पावरी यांनी सांगितले की, संस्थेची मार्च २०२२ अखेर ३९४७ सभासद संख्या, ५ कोटी ६२ लाखाच्या ठेवी, ४ कोटी ४० लाखांची कर्जे, २ कोटी ४६ लाखाची गुंतवणूक, ७ कोटी १६ लाखांचे खेळते भांडवल, १ कोटी १२ लाख स्वनिधी, ६१.१४ टक्के सीडी रेशो, ९५.०६ टक्के वसुली, १०० टक्के सोनेतारण कर्ज वसुली अशी स्थिती आहे. या वाटचालीमुळे राज्यातील काही निवडक संस्थांमध्ये खारवी समाज पतसंस्थेच्या समावेश होत आहे.

पतसंस्थेचे जिल्हा कार्यक्षेत्र असून १ शाखा व १ सेवाकेंद्राच्या आधारावर सलग ४ वर्षे अ वर्ग प्राप्त झाला आहे, असे सांगून श्री. पावरी म्हणाले, आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था, पहिल्या वर्षापासूनच सभासदांना शेअर्स च्या रकमेवर लाभांश देणारी पतसंस्था, ४० महिन्यांत सोनेतारण कर्ज मुदतीत कर्ज खाते बंद करून एकही कर्ज खात्याचा लिलाव न करण्यास पात्र ठरलेली पतसंस्था, संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणकीकृत असणारी पतसंस्था, सभासदांचे मनोबल उंचावून सभासदांमध्ये खऱ्या अर्थाने सहकार रुजवणारी पतसंस्था, अल्पावधीतच शाखाविस्तारांचा प्रस्ताव सादर करणारी पतसंस्था आहे.

संस्थेच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे १३ जणांचे संचालक मंडळ, ५ जणांचा कर्मचारी वर्ग, १३ जणांचे जिल्हा समन्वय समिती मंडळ व नवनियुक्त १ तज्ञ संचालक आहेत.

एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे…! हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यात सहकार्य करणारे संचालक मंडळ सदस्य, समन्वयक, प्रशासन वर्ग, सभासद व ठेवीदार यांचा मोलाचा वाटा आहे, असे संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply