चिपळूण : चिपळूण येथील १५८ वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कार्याध्यक्षपदी विद्यमान कार्यवाह, प्रसिद्ध प्रवचनकार आणि लेखक धनंजय चितळे यांची निवड झाली आहे.
वाचनालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कार्यवाहपदी विनायक ओक, कोषाध्यक्षपदी श्रीराम दांडेकर यांची निवड झाली आहे. नवीन निवडीबद्दल सर्व संचालक मंडळाने त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या सहकार्याने वाचनालय प्रगतीकडे झेप घेईल, असा विश्वास अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांनी व्यक्त केला.
धनंजय चितळे संतसाहित्याचे तरुण पिढीतील गाढे अभ्यासक आहेत. ते आपल्या रसाळ शैलीत श्रीगणपती अथर्वशीर्षाची महती विशद करतात. त्यांनी गेली २१ वर्षे कोकणसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, हैदराबाद, ग्वाल्हेर आदी ठिकाणी २३०० हून अधिक प्रवचने दिली आहेत. वाचनालयाशी ते गेली दोन दशकांहून अधिक काळ निगडीत आहेत. ते परशुराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आहेत. ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल त्यांना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा कै. वासंती गाडगीळ पुरस्कार आणि पुण्यातील श्रीपाद सेवा मंडळाचा संत साहित्य अभ्यासक या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वाचनालयाच्या कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी असे – उपाध्यक्ष : सुनील खेडेकर, राष्ट्रपाल सावंत, सहकार्यवाह : प्रकाश घायाळकर, संचालक – मधुसूदन केतकर, धीरज वाटेकर, अभिजित देशमाने, अंजली बर्वे, वसुंधरा पाटील, मनीषा दामले, दिशा रावराणे. गेल्या तीन तपांहून अधिक काळ वाचनालयाच्या जडणघडणीत मौलिक योगदान असलेले प्रकाश देशपांडे यांनी वयाच्या पंचाहत्तरीनंतर कोणत्याही सक्रिय पदावर कार्यरत राहायचे नाही, या उक्तीनुसार कृती करत हा निर्णय घेतला आहे. पुढील काळात देशपांडे यांनी वाचनालय परिवारास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

