आंबडवे येथे पुढच्या वर्षापासून महामानवाची जयंती शासकीय स्तरावर

मंडणगड : आंबडवे (मंडणगड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने साजरी केली जाणारी जयंती पुढच्या वर्षापासून राज्य शासनाच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाच्या वतीने बाबासाहेबांच्या १३१ व्या जंयत्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सामंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, आंबडवे येथे बाबासाहेबांच्त्यांया जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास मिळणे हा मी माझा गौरव समजतो, त्यांच्या विचारांचा अनुयायी या नात्याने त्यांच्या मूळ गावाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे नैतिक कर्तव्य मानतो. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या आधारावर या देशाचा कारभार चालत असल्याने बदलत्या काळात बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आंबडवे गावाचा बहुआयामी विकास करणे हे राज्य शासनाचे पहिले कर्तव्य मानतो. त्याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासह शैक्षणिक सोयीसुविधांच्या विकासाकरिता मी आग्रही राहणार आहे. घटनाकारांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे, ही बाब जिल्ह्याचा लौकिक वाढविणारी आहे. बाबासाहेबांचे गाव ज्ञानाचे प्रतीक म्हणून विकसित करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर नावारूपास आणण्याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न मी करणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कळावे याकरिता राज्य शासन पंधरा तासांचा शिक्षणक्रम अभ्यासक्रमात आणणार असून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच या संदर्भातील शासन निर्णय होणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आंबडवे येथे डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार असून तो कोठे असावा याचे सार्वमत घ्यावे. जगभरातील अभ्यासक आणि पर्यटकांना आर्कषणाचे केंद्र ठरेल, असे स्मारक व पुतळा राज्य शासनाच्या माध्यमातून उभारला जाईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित चरित्र खंडाचे प्रकाशन आंबडवे येथे भव्य कार्यक्रमात लवकरच करणार असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आंबडवे गावी सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयाचे संचालन सुयोग्य पद्धदतीने व्हावे, याकरिता पुढाकार घेतला असून महाविद्यालयाच्या विविध समस्या सोडवण्याकरिता उपाययोजना सुरू केल्या आहेत. महाविद्यालयाचे विविध प्रश्न, महाविद्यालयास जमीन दान करणाऱ्या देणगीदारांचे प्रश्न यावर जातीने लक्ष घातले आहे. अर्धवट राहिलेल्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून महाविद्यालयासाठी जमीन देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीस रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या यादीनुसार सहा जणांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाविद्यालायतील शिक्षकेततर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या वेतनाची समस्या मार्गी लावली जाणार आहे.

कार्यक्रमास आमदार योगेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, अण्णा कदम, माजी सभापती स्नेहल सकपाळ, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी, ग्रामस्थ सुदाम सकपाळ, सुदर्शन सकपाळ, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, डॉ. अशोक साळुंखे, विनायक बोत्रे, मारुती काप, आदेश मर्चंडे, राजेश मर्चंडे, अल्पेश सकपाळ, प्रमोद सकपाळ, गणपत सकपाळ, राजेश कासरुंग आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील सकपाळ यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन नरेंद्र सकपाळ यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मारकाच्या परिसरात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निधीतून उभ्या करण्यात आलेल्या सभामंडपाचे श्री सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबडवे गावाला भेट दिली होती. या दौऱ्याचा संपूर्ण वृत्तांत सोबतच्या व्हिडीओमध्ये

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply