मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा रमेश भिडे यांनी सादर केलेला प्रयोग रत्नागिरीत २३ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. त्याविषयी…
………………………………..
धनश्री, उद्या ये, गडकरी रंगायतनला. मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’चा प्रयोग करतोय, रमेश भिडे काकांचा फोन आला. तसा याचा पहिला वाचनाचा पायलट प्रयोग मी ऐकला होता, पण गडकरीसारख्या थेटरला हा प्रयोग कसा होतोय याची कमालीची उत्सुकता होती.
त्या उत्सुकतेनेच मी प्रयोग बघायला गेले. पडदा उघडल्यावर प्रेक्षक प्रथम बघतो ते नेपथ्य. इथे नेपथ्य कसं असेल याचीही एक उत्कंठा होतीच. पडदा उघडला आणि सौम्य प्रकाशात दिसली, बसण्यासाठी एक चौकोनी लेवल आणि त्याच्या बाजूला काही चित्र.. फोटो… चित्र प्रदर्शनात असतात तशा स्टँडवर. प्रभाकर पणशीकर, रामचंद्र वर्दे, काशिनाथ घाणेकर यांचे आणि एका फोटोत रमेश भिडे, माधव वर्दे (रामचंद्र वर्दे यांचे सुपुत्र) यांच्या समवेत काशिनाथ घाणेकर. प्रभाकर पणशीकर, रामचंद्र वर्दे म्हणजे काशिनाथ घाणेकरांच्या नाट्यक्षेत्रातल्या वाटेवर सावली देणारे हिरवेगार वृक्षच जणू! अर्थात यातले पटकन ओळखता येतात ते प्रभाकर पणशीकर! मात्र रामचंद्र वर्दे त्या नाटकाच्या ओघात, काकांच्या बोलण्यातून उलगडतात, अर्थात माझ्या आधीच्या पिढीतल्या प्रेक्षकांनी त्यांना फोटो पाहताच ओळखलंही असेल. हे फोटोंच साधं नेपथ्य पण विषयाला पोषक-पूरक असं.
आणि मग यातला “मी” बोलायला लागतो. “मी बोलायला लागतो” असं म्हटल्यामुळे कुणाचा गैरसमज होऊ शकतो.
शांताबाई शेळके यांच्या वर्षा संग्रहात पहिलीच कविता आहे तिचं शीर्षक आहे मी. शीर्षक वाचून ही अहंकारभारित कविता आहे की काय असं वाटू शकतं, पण त्या संपूर्ण कवितेत शांताबाई तटस्थपणे आपलं परीक्षण करतात.
लखलखून उजळी घन तिमिराला अशी
ती विद्युल्लतिका नाही मी उर्वशी
ढग एक परि जो दिसतो गगनांगणी
चमकते तयातून इवली मी चांदणी …
काहीशी अशीच भूमिका या प्रयोगातल्या ‘मी’ चीही आहे.
काशिनाथ नावाचा उसळी मारून कोसळणारा प्रपात, त्याची ताकद, त्याचं सौंदर्य, त्याचं पारदर्शित्व हे सगळं एका कड्याच्या टोकावर उभं राहून हा ‘मी’ आपल्याला दाखवत राहतो आणि आपण अचंबित होऊन एकटक पाहत राहतो. कड्याच्या टोकावर म्हटलं कारण …….. हा ‘मी’सुद्धा त्या प्रपातात उडी घेणार असं वाटत असतानाच तो थांबतो, सावरतो आणि आपली प्रपात दाखवणाऱ्या गाइडची भूमिका आहे ह्याचं भान तो त्याक्षणी सांभाळतो….. आणि या प्रपाताची पुढची धारा आपल्याला दाखवतो.
हा ‘मी’ म्हणजे रमेश भिडे. नाटक हे ज्यांचं खरं वेड… त्यात प्रभाकर पणशीकर, मा. दत्ताराम यांच्यासारखे मार्गदर्शक लाभलेले, काशिनाथसारखे मित्र मिळालेले … त्यामुळे ह्या क्षेत्रातली अनुभवांची समृद्ध शिदोरी हाती असलेले भिडे काका. आपला जवळचा मित्र … नटवर्य काशिनाथ घाणेकर याची सगळी दास्तान आपल्यासमोर ठेवतात, नव्हे शब्दातून उभी करतात. गुलाबाची एक एक पाकळी उमलत जावी, तशी काशिनाथ घाणेकरांविषयी एक एक गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते. त्यांचा स्वभाव, अभिनयाची ओढ, सळसळता उत्साह, त्याचं माणूसपण, संवेदनशीलता … त्यांच्या आयुष्यातले काही भावनिक गुंते, काही कठोर प्रसंग, काही निर्णयाची वळणं …. एक ना दोन …. आणि हे सगळं रमेश भिडे तल्लीन होऊन आपल्याला सांगत असतात. सांगताना कुठेही “हे मी सांगतोय’ असा अभिनिवेश, आव कुठेही नाही. घरी गप्पा मारताना विषय निघावा आणि गप्पा त्या विषयात वाढत जाव्यात, इतक्या सहजतेने ते हे सगळं सांगतात. त्यांच्या सांगण्याला कमालीचं आत्मीयतेचं अस्तर आहे. इतकी वर्षं नाट्यक्षेत्रात असल्याने बोलण्यातले चढउतार, योग्य त्याच शब्दावर पडणारा जोर, सुंदर प्रवाही, प्रभावी भाषा आणि आपलं म्हणणं समोरच्या प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचवण्याची हातोटी… या साऱ्याने प्रयोग सुरू झाल्यानंतर काही क्षणातच आपण त्यात गुंतू लागतो. म्हणजे भिडे काका आपल्याला त्यांच्या बरोबर घेऊन जातात. या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामन्यात: मोठ्या, म्हणजे आजकालच्या भाषेत सेलिब्रिटी अशा मंडळींबरोबर वावरणारी माणसं त्या सेलिब्रिटींचं आपल्याशी किती सख्य आहे/होतं हे दाखवण्याची धडपड करतात. इथे तशी कुठलीही धडपड नाही. एखादी रुळावरून धावणारी गाडी आजोबांनी आपल्या कडेवरच्या नातवाला लांब उभं राहून जितक्या आनंदाने दाखवावी, तशी ही डौलात दौडत जाणारी काशिनाथ नावाची गाडी, तिच्या इंजिनापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत रमेश भिडे दाखवतात. त्यांच्या बोलण्यातल्या सहजतेमुळे, ते वर्णन करत असलेला प्रसंग आत्ता जणू आपल्यासमोर घडतोय असं वाटू शकतं. सहजतेतही नाट्यमयता कशी असते, याचं उत्कृष्ट उदाहरण आहे हे. काशिनाथचा ग्राफ पाहत असताना
त्याच्या यशाने आपण आनंदित होतो, त्याच्या अपयशाने आपल्याला वाईट वाटतं, त्याच्या चुकांमुळे आपण अस्वस्थ होतो, त्याच्या मिश्किलीमुळे आपण खळाळून हसतो … `सामरस्य’ हा नाटकातला जो महत्त्वाचा भाग असतो … ते सामरस्य इथे अनुभवता येतं…. आणि हे सगळं उभा करत असतो एक एकटा माणूस, थोडंसं नेपथ्य आणि लाइट्सचा माफक आधार घेऊन …. बरं काशिनाथला जवळून पाहिलेली व्यक्ती नक्कीच साठी, पासष्टीच्या वयाची असणार … पण तरीही त्या वयाचा अडसर सलग दोन तास बोलणाऱ्या रमेश भिड्यांना जाणवत नाही आणि रसिकांनाही नाही. कुठून येते एवढी ऊर्जा? गडकरी रंगायतनचं स्टेज मोठं आहे. त्यामुळे ते कव्हर करत कधी इकडे, कधी इकडे, सहजतेने वावरायचं हेही काम सोपं नाही. पण भिडे काका त्या प्रयोगात असे काही शिरलेले असतात की ज्या हालचाली घडतात, त्या सगळ्या उत्स्फूर्त, नॅचरल.
हा सगळा प्रयोग आपल्या मनावर गारूड करतो. मध्यंतरात चहापानाच्या वेळीही फार कुणी कुणाशी बोलत नाही कारण त्या सगळ्यांच्या मनात असतो तो मध्यंतरापूर्वीचा काशिनाथच्या नाटकातला प्रसंग. भिडे काका बोलता बोलता रायगडला जेव्हा जाग येते' किंवा 'आनंदी गोपाळ
नाटकातलं स्वगत असं काही सादर करतात की आपण थरारून जातो. शेवटच्या टप्प्यावरचं `आनंदी गोपाळ’ नाटकातलं स्वगत तर … नाटकातला भावनिक प्रसंग कसा पेलायचा आणि कसा जिवंत करायचा याचा वस्तुपाठच!
एकंदरीत हा नाट्यानुभव आपल्याला काशिनाथ घाणेकर यांचा एक नट आणि एक माणूस या दोन्ही अंगांनी परिचय करून देतो. त्यांच्या स्वभावातल्या चांगल्या गोष्टीच सांगून काशिनाथ महिमा
असं स्वरूप याला येत नाही हे आणखी एक वैशिष्ट्य! त्यांच्या आयुष्यात जे आहे, जे घडलं ते उगाचच कुणाची बाजू न घेता किंवा कुणाला वाईट न ठरवता काका मांडतात. चांगलं वाईट, योग्य अयोग्य …सगळं! मात्र काशिनाथ घाणेकर यांच्यावर आलेल्या चित्रपटात त्यांची प्रतिमा ही नटापेक्षा व्यसनी अधिक आणि स्वभावातल्या चांगल्या गुणांपेक्षा लंपट अधिक अशी जी दाखवली गेली त्याने मात्र हा ‘मी’ व्यथित होतो. स्वाभाविकच आहे म्हणा! काशिनाथना जे अंतर्बाह्य ओळखतात त्यांना ह्या गोष्टीचं दु:ख होणारच …
भिडे काकांचा सुपुत्र जो उत्तम नाट्यलेखन, दिग्दर्शन करतो त्या डॉ. प्रसाद भिडे यांनी या प्रयोगाला योग्य अशी दिग्दर्शकीय ट्रीटमेंट दिली आहे. सर्वांगाने उत्तम असा हा प्रयोग जरूर बघावा असाच. इतका सुंदर अनुभव रसिकांना दिल्याबद्दल रमेश
भिडे यांना मनापासून धन्यवाद आणि पुढच्या प्रयोगासाठी शुभेच्छा!
- धनश्री लेले


