रत्नागिरी : खरे तर भारतीय संस्कृती ही नात्यांची वीण घट्ट करणारी आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या बघता आपल्या या संस्कृतीला कुठेतरी खिंडार पडले आहे का, अशी शंका येत असल्याची भीती लेखिका सौ. सुनेत्रा जोशी यांनी व्यक्त केली.
आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा समूहातर्फे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रत्नागिरीजवळच्या शिरगाव येथील स्वगृही सेवा संस्थेच्या वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील ज्येष्ठ नागरिकांसाठी साहित्यिक कार्यक्रम सादर केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
संस्थेच्या विश्वस्त आणि अध्यक्ष श्रीमती वीणाताई लेले यांनी समूहातील सदस्यांचे स्वागत केले समूहाच्या सदस्या अनुप्रीता कोकजे यांनी प्रास्ताविक केले. समूहाच्या अध्यक्षा सुनेत्रा जोशी यांनी पर्यावरण दिनानिमित्त मोगऱ्याचे रोप पर्यावरणाचे प्रतीक म्हणून आश्रमाला भेट दिले. त्या निमित्ताने सौ. जोशी बोलत होत्या. समूहातर्फे १८ विविध प्रकारच्या मराठी पुस्तकांचा संच संस्थेला भेट म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लेले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

समूहाच्या साहित्यिक सदस्यांनी स्वलिखित कथा,कविता,लेख सादर केले. अध्यक्ष सौ. जोशी यांनी स्वलिखित ‘दिशा’ या विवाह समस्येवरील कथेचे प्रभावी वाचन केले. अनुप्रीता कोकजे यांनी पर्यावरणविषयक सुंदर कविता सादर केली. सौ. राधिका आठल्ये यांनी संगीताची पार्श्वभूमी असलेली कथा सादर केली. लता जोशी यांनी ‘गुंता’ हा खुमासदार लेख वाचून दाखविला. अनुराधा दीक्षित यांनी ‘रंग मनाचे’हा ललित लेख आणि ‘सोहळा’ ही सुंदर गेय कविता सादर केली. आश्रमातील ज्येष्ठ नागरिक श्री. सोहोनी यांनी सुंदर आवाजात सादर केलेल्या दोन बहारदार गीतांना उत्स्फूर्त दाद मिळाली. श्री. काळे यांनी पर्यावरणविषयक अभ्यासपूर्ण विचार मांडले.
शेवटी आम्ही सिद्ध लेखिका समूहाच्या वतीने खाऊ देऊन सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. आश्रमाच्या वतीने श्रीमती लेले यांनी आभार मानले.
