आम्ही चालवू हा पुढे वारसा…

खारेपाटण येथील प्राचार्य निवृत्त प्राचार्य शरद काळे यांना श्रद्धांजली

खारेपाटण (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील कथाकार, लेखक आणि वि. स. खांडेकर यांचे लेखनिक, माजी प्राचार्य शरद काळे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीबाबत त्यांची कन्या, सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांनी सांगितलेल्या आठवणी.

………………………………..

बाबा गेले!!! हे सत्य स्वीकारता येत नाही आणि ते गेले असं माझ्याने लिहवतही नाही…. कारण एका ध्येयवादी सर्जनशील कार्याचं मूर्तरूप होते आमचे बाबा आणि आज ते कार्य त्यांचे हजारो विद्यार्थी, त्यांनी घडवलेली असंख्य आयुष्यं आणि अफाट लोकसंग्रहामध्ये सामावलंय. खारेपाटण हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य शरद काळे हे त्या कार्यपर्वाचं नाव. गेले १० महिने मुखकर्करोगाशी जिद्दीने लढाई करून माझ्या ८२ वर्षीय बाबांनी २६ मे २०२२ रोजी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आणि एका नि:स्वार्थी कर्मयज्ञाचं समापन झालं!

आम्हां कुटुंबीयांवर कोसळलेली आणि मुख्य आधार हरपलेली ही अतीव दु:खाची वेळ सर्व सुहृदांनी धीर देऊन सुसह्य केली याबद्दल मी सुरुवातीलाच सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आजच्या आमूलाग्र बदललेल्या तंत्र-यंत्रक्रांतीच्या या युगामध्ये बाबांसारखी, जीवनमूल्यं जपणारी तत्त्वनिष्ठ प्रेरणास्थानं वेगाने काळाच्या पडद्याआड होत आहेत ही आपली फार मोठी हानी आहे. पण आमचं भाग्य की, आमचे बाबा अशा प्रेरणादायी व्यक्तींमधील एक होते.

वाडा-पडेल (ता. देवगड) इथं मूळ घर पण सुमारे ७० वर्षं वास्तव्य केलेलं खारेपाटण ही त्यांची कर्मभूमी ठरली. ‘खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळा’च्या शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजची स्थापना गुरुवर्य शंकरराव पेंढारकर सरांनी केली. “शिक्षणातून पुनर्रचना, पुनर्रचनेतून शिक्षण” असं ब्रीदवाक्य असलेल्या या शिक्षणसंस्थेची धुरा पेंढारकर सरांच्या निवृत्तीनंतर बाबांच्या खांद्यावर आली. सरांना दिलेलं शाळेची जबाबदारी निभावण्याचं जाहीर वचन या त्यांच्या शिष्योत्तमाने समर्थपणे आणि त्यांच्याच ध्येयवादी पद्धतीने शाळेचा कारभार सांभाळत पूर्ण केलं. त्यांच्या या कार्यात माझ्या आईने त्यांना प्रत्येक पावलाला दिलेली साथ मोलाची होती. संस्थेची चार वसतिगृहं होती. पैकी गुरुकुल, अप्पासाहेब पटवर्धन संमिश्र आणि स्वावलंबन वसतिगृह ही तीन मुलांची वसतिगृहं होती आणि मुलींचं ‘नवयुवती वसतिगृह’ माझी आई चालवत असे. शाळेतली शिक्षिकेची नोकरी सोडून आईने संस्थेचं हे वसतिगृहाचं काम अतिशय सेवाभावी वृत्तीने केलं.

बाबा पाच वर्षांचे असताना प्लेगच्या साथीत झालेला त्यांच्या आईचा आकस्मिक मृत्यू, वडील प्राथमिक शिक्षक पण मोठ्या कुटुंबामुळे घरची गरिबी, त्यांची बदल्या होणारी नोकरी, गावात पुढील शिक्षणाची सोय नाही अशा बिकट परिस्थितीत बाबांचं लहानपण गेलं. मुलांच्या शोधार्थ गावोगावी फिरणारे पेंढारकर सर पडेल गावात पोहोचले. सातवीच्या परीक्षेत उत्तम मार्क आणि पहिल्या नंबरने पास झालेला विनायक काळे मास्तरांचा शरद काळे हा मोठा मुलगा ते आठवीसाठी खारेपाटणला घेऊन आले. आठवड्याचे सात वार सातजणांकडे जेवणाची व्यवस्था लावून ‘वारावर राहून’ शिक्षण घेण्याची सोय सरांनी लावून दिली. अत्यंत खडतरपणे शिक्षण घेत जुन्या एसएससीच्या पहिल्या बॅचचा हा विद्यार्थी प्रथम‌ क्रमांकाने पास झाला. रत्नागिरी आणि कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण एमए, बीएड. करून त्याच शाळेत नोकरीला लागला आणि पुढे त्याच शाळा-कॉलेजचा कर्तव्यतत्पर प्राचार्य आणि अनेकांच्या आयुष्याचा मार्गदर्शक बनला. हा सारा प्रवास गरिबी, कष्ट आणि प्रतिकूलतेतून तावून सुलाखून निघालेला होता.

लहानपणीच झालेल्या आईच्या निधनामुळे आलेल्या हळवेपणाने आयुष्यभर बाबांची सोबत केली. त्यांचं कविमन सतत ती दुखरी सल जोजवत राहिलं.. ‘सय’ नावाच्या बाबांच्या कथेत ते सगळं आलं आहे. त्यांच्या लहानपणीच्या अनेक हदयद्रावक कहाण्यांचे श्रोते बनलेल्या आम्हां मुलांचा बाबांबरोबरचा सुसंवाद ही आमच्याही जडणघडणीची शिदोरी होती हे आता लक्षात येतं. शाळेच्या कारभारात घडलेले प्रवास, कार्यक्रम, मुलांसाठी राबवत असलेले उपक्रम, भेटलेली माणसं, आलेले बरे-वाईट अनुभव तसंच ज्येष्ठांच्या कथा, कविता, ललित, वैचारिक, समीक्षकी सर्व प्रकारच्या साहित्यचर्चा, सर्जनशील नवं लेखन-वाचन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय सर्व प्रकारच्या विषयांबद्दल सजगपणे विचार करणं, कृतिशील जगणं, प्रतिकूलतेशी संघर्ष करत गवसणारी ध्येयाची वाट, त्याचा आनंद आणि कामाचं अपूर्व समाधान अशा सगळ्या मौलिक गोष्टींची कार्यशाळाच बाबांच्या रूपात अहोरात्र आम्हाला लाभायची. वसतिगृहांमधल्या मुलांच्या जेवणासाठी दशक्रोशीतून शिक्षकांच्या गटागटाने जाऊन भात गोळा करायची मोहीम‌‌, शाळेत दर बुधवारी चालणारी छंदमंडळं, शाळेचं ‘कल्पना’ हे हस्तलिखित, स्काऊट-गाइडचे कॅम्प, त्यातले ‘खरी कमाई’सारखे उपक्रम, विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक अभिनव कार्यक्रम, संस्थेला आर्थिक मदतीसाठीच्या उपाययोजना, पाहुण्यांच्या भेटीगाठींतून निधी उभारणी, मुख्याध्यापक संघाची कामं तसंच मुलांच्या शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरविणारे नानाविध उपक्रम बाबा राबवत. दहावीनंतरचा तंत्रशिक्षणाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आणि ज्युनिअर कॉलेजची आर्टस् साइड त्यांनी सुरू केली. गरीब होतकरू मुलांना पदरमोड करून शिक्षणाची सोय करून देणं तर नेहमीचंच होतं. ते उत्तम आणि उपक्रमशील शिक्षक होते. त्यांचं जीव ओतून शिकवणं आणि तळमळीने काम करणं आज अनेकांना आठवतं. दिवसाचे बारा-बारा तास बाबा शाळेत असायचे. कामात व्यग्र असायचे. सगळ्यात मुख्य म्हणजे सारा कारभार चोख, पारदर्शी आणि ध्येयवादी निष्ठेचा होता. त्यामुळे आयुष्यभर जपलेली तत्त्वं आणि मूल्यांशी तडजोड करण्याची वेळ येईल, असं दिसताच बाबांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. पण शाळेशी निष्ठा आणि प्रेम शेवटपर्यंत अखंड राहिलं होतं. आमचं घर म्हणजे शाळा आणि शाळा म्हणजे घर असंच ते समीकरण होतं. “आज मी जो कुणी आहे तो काळे सर आणि बाईंमुळे आहे; त्यांनी मला खारेपाटणच्या शाळेत आणलं नसतं तर आज मी कुठेच असलो नसतो..” असं आज फोनवर सांगणारे उच्चपदस्थ अधिकारी विद्यार्थी हा बाबांनी मागे ठेवलेला अमूल्य ठेवा आहे.

या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबरोबरच दर्जेदार कथा-कविता आणि ललित लेखन करणाऱ्या बाबांचं कोकणच्या साहित्य चळवळीतही भरीव योगदान होतं. आमचं घर तसं बघू जाता सदैव पालक आणि माणसांची वर्दळ असलेलं समाजकेंद्र होतं, पण ती सारी ऊर्जा बाबांच्या निरंतर चालू असलेल्या गप्पा, गाणी, कविता आणि संवादांमधून घराला मिळत होती. सूत्रधार बाबा, साथीदार आई आणि सहभागी कलाकार आम्ही तिघं भावंडं अशी ती समृद्ध मैफल होती.

शालेय वयापासून बाबा कविता लिहू लागले. भरपूर वाचनव्यासंग होता. कवितांचं उत्तम सादरीकरण करत. स्वत:च्या चालीत गाऊनही कविता सादर करत. उत्तम गाणी त्यांनी लिहिली. लय-ताल-सूर-छंद-मात्रा व्याकरणाची उत्तम जाण होती. आवाज गोड होता. बासरीही सुरेख वाजवत. चित्रं काढत. शाळेत प्रवेशद्वारातच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि अन्य कार्यक्रमांना त्यांनी काढलेलं लोकनेत्याचं एखादं पोर्टेट आणि त्याखाली चार कवितेच्या ओळी असं ठरलेलं असे. सुरेख रांगोळ्या, बोटांनी नक्षीचं सारवण, हस्तकलेच्या आणि कलाकुसरीच्या अनेक गोष्टी आणि कलेच्या नाना कळा त्यांच्या अंगात होत्या. लहानपणी नाटकात काम करीत. खारेपाटणला आल्यावरही गोकुळाष्टमीच्या दिंड्यांसमोरच्या नाचांसाठी बाबा टिपरीगीतं लिहीत. नाट्यछटा बसवत. कविता आणि गाण्यांचा हा जलसा पुढे ललित आणि कथालेखनाकडेही वळला. ‘मौज’ प्रकाशित ‘जहाज’, ‘गंधर्व’कार किंजवड्याच्या बाळकृष्ण प्रभुदेसाईंची मैत्री आणि वाड्याचे ज्येष्ठ कथाकार श्रीपाद काळे यांचं मार्गदर्शक सान्निध्य बाबांना मिळालं. कोल्हापूरला गोखले कॉलेजमधे ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी शिक्षक म्हणून लाभले. भारतीय ज्ञानपीठाचे पहिले विजेते वि. स. खांडेकर यांचे बाबा हे पहिले छात्रलेखनिक. त्यांच्या घरी राहून त्यांचं लेखनकाम करत बाबांनी बी. ए. पूर्ण केलं. कुसुमाग्रज, रणजित देसाई, इत्यादी अनेक ज्येष्ठांचा सहवास भाऊंमुळे त्यांना लाभला. देखणं हस्ताक्षर, उत्तम साहित्यिक जाण आणि मेहनती, जिज्ञासू वृत्तीच्या बाबांवर प्रेमळ स्वभावाच्या भाऊंचाही फार लोभ होता. स्वतंत्र कथालेखन करत बाबा नंतर सत्यकथा, किर्लोस्कर, माणूस, मौज इत्यादी महत्त्वाच्या नियतकालिकांमध्ये लिहू लागले. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धनांच्या साक्षेपी संपादनाच्या अनेक आठवणी बाबा सांगत. ह. मो. मराठे, आनंद यादव, शैला सायनाकर असे सगळे गोखले कॉलेजमध्ये पाठी-पुढे शिकत होते. नंतरही संपर्कात होते. बाबांनंतरच्या काळात भाऊसाहेबांचे लेखनिक कोल्हापूरचे हस्ताक्षर संग्राहक आणि लेखक राम देशपांडे यांचंही सख्ख्या भावासारखं नातं होतं.

खारेपाटणच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागल्यावर बाबांचा चळवळ्या स्वभाव आणि साहित्यिक कामाचा उदंड उत्साह मधु मंगेश कर्णिकांनी स्थापन केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कामातही जबाबदार मार्गदर्शकाची भूमिका निभावू लागला. मधुभाईंशीही आत्मीय नातं निर्माण झालं. मालवणी बोलीविषयक कार्यशाळा आणि कामही बाबांनी केलं. वसंत सावंत, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, डॉ. विद्याधर करंदीकर, प्रभाकर भागवत यांचा भरपूर लोभ आणि सख्य बाबांना मिळालं. वैशाली पंडित, मधुसूदन नानिवडेकर, आ. सो. शेवरे, मदन हजेरी, डॉ. अनिल धाकू कांबळी, प्रमोद जोशी यांच्यासारख्या तेव्हापासूनच्या नवीन आणि धडपड्या साहित्यिकांना बाबा गुरुस्थानी होते. आम्ही प्राथमिक शाळेत होतो, तेव्हापासूनच्या आठवणी मला आहेत. ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ ही कादंबरी लिहिणारे माधव कोंडविलकर अनेकदा घरी येत. राहत, चर्चा करत. आबा शेवरेंच्या ‘प्रसंवाद’ या दलित चळवळीच्या मासिकाचा पहिला अंक बाबांच्या संपादकीय मार्गदर्शनातून आमच्या घरातून निघाला होता. आबांच्या तब्येतीची काळजी आणि कवितेची खूप आस्था बाबांना होती. महेश केळुसकर, मंदाकिनी गोडसे, उषा परब, दि. मो. दुधगावकर, आ. ना. पेडणेकर, डॉ. मधुकर घारपुरे, साधले गुरुजी, महेंद्र नाटेकर, गणपत डोंगरे असे अनेक साहित्यिक-रसिक-मुख्याध्यापक नित्यसंपर्कात होते. मी सावंतवाडीच्या आयुर्वेद कॉलेजला शिकत असताना बाबांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आमचं बिऱ्हाड चार वर्षं सावंतवाडीला असताना तिथल्या साहित्यिक वर्तुळात बाबा पुन्हा एकदा खूप छान रमले होते. नवीन लिहू लागलेले प्रवीण बांदेकर आणि बाबांच्या तासन् तास गप्पा चालत. कथाशिबिरं, कविसंमेलनं उत्साहाने होत. तिथे बालकुमार साहित्यसंमेलनात बाबांनी “फुलराणी” नावाचा एक विशेषांक केला, त्याचे उपसंपादक मी आणि बांदेकर होतो. वीरधवल परब, अजय कांडर, शरयु आणि ज्ञानदा आसोलकर, दादा मडकईकर, बाळकृष्ण लळित या तेव्हाच्या नवीन लिहिणाऱ्यांचं तर बाबांना प्रचंड कौतुक आणि बाबांविषयी या सर्वांना नितांत आदर होता. अलीकडच्या काळात पुण्याला जायचे तेव्हा दभि सर, शंकर सारडा यांच्याशी नित्य भेटीगाठी असायच्या.’ माणूस’ च्या निर्मला पुरंदरे, ‘अंतर्नाद’च्या भानू काळेंशी पत्रव्यवहार होता. मौज, हंस, कवितारती, अंतर्नाद, प्रिय रसिक, अनुभव, आरती इत्यादी नियतकालिकांचं आणि इतर भरपूर वाचन होतं.

सखोल चिंतन मनन, चोखंदळ आणि साक्षेपी, समीक्षकी दृष्टी आणि प्रतिभासंपन्नता लाभलेल्या बाबांनी मोजक्या पण सकस कविताही लिहिल्या. ते त्या अतिशय प्रभावीपणे सादर करीत आणि कविसंमेलन गाजवून सोडत. त्याकाळच्या लोकांना त्यांच्या बऱ्याच कविता अजूनही आठवतात. शिवाजी : एक शब्दशिल्प, उखाणा गवताचा, मोगरी, ही फुलली ग पिवळी पिवळी, मोतिया तळ्याची कहाणी, तळं या त्यांच्या काही प्रसिद्ध कविता. कवितासंग्रह काढायला मात्र ते कधीच तयार झाले नाहीत. एका उभरत्या शिक्षणसंस्थेची मोठी जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर ती पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी त्यांनी निग्रहाने स्वत:च्या साहित्यिक वाटचालीला विराम दिला आणि त्याबद्दल खेद कधीच केला नाही. आधी प्रसिद्ध झालेल्या कथांचा ‘केले मन वेगळे’ हा कथासंग्रह फक्त पुण्याच्या गमभन प्रकाशनाकडून प्रकाशित झाला, काही लेख आणि कवितालेखन झालं, पण पूर्वीच्या उत्साहाने नवं लेखन फार घडलं नाही. नंतर फक्त वाचन आणि होतकरू हातांना पाठबळ आणि मार्गदर्शन ते करत राहिले.

माझा भाऊ कपिल काळे याने लिहिल्याप्रमाणे खारेपाटणमध्ये उभं केलेलं शैक्षणिक-सामाजिक कार्य हा बाबांचा ‘स्वधर्म’ होता. माझी बहीण चारुता प्रभुदेसाई हिने लिहिलेलं बाबांचं अष्टपैलू गुणी व्यक्तिमत्त्व, हरहुन्नरीपणा, अखंड उत्साह आणि नेमस्त अध्यापन, हा बाबांचा ‘आनंदधर्म’ होता आणि मला आज त्यांचं साहित्यिक योगदान लिहिताना त्यांच्यातील ‘साहित्या’ने त्यांना दिलेला समृद्ध ‘माणुसकीचा धर्म’ लक्षात येत गेला. ‘सहित’ घेऊन जाणारं ते साहित्य. बाबा साहित्यव्यवहारात अडकले नाहीत. पुरस्कार, मानमरातब वगैरेच्या नादी लागले नाहीत. अलीकडच्या काळातील कंपू कळपांची राजकारणं आणि तुच्छतावाद बघून ते व्यथित होत. “अस्सल कविता हा पारा आहे. हातून पटकन् कधी निसटेल कळणार नाही, त्याला जप”, असं सावधपण ते सतत देत राहत. ती त्यांची लेखननिष्ठा आणि तळमळ होती. एकदा एक सेवाधर्म स्वीकारल्यानंतर हाती घेतलेल्या कामाला ऊर्जा पुरविणारं आणि केवळ एक निखळ आत्मानंद देणारं साधन म्हणून त्यांनी आपल्या साहित्याकडे पाहिलं. त्यांच्यातला सेवाभावी सामाजिक कार्यकर्ता आणि उत्तम अध्यापक या दोन्हींना ऊर्जा पुरविण्याचं काम त्यांच्यातला ‘साहित्यिक‌’ सतत करत राहिला.. केवळ माणुसकीला ‘सहित’ घेऊन हा माझा ‘बापमाणूस’ आयुष्यभर जिद्दीने चालत राहिला…

कौतुकाचा सोहळा गोतावळा वाखाणतो
आनंदतो मी काहीसा भारावतो भांबवतो

जी प्राप्त झाली भूमिका साकारिली ती रंगुनी
मम जीव ओतुन वर्तलो कर्तव्य केले दंगुनी

जे ज्ञानवैभव भावले ते छात्रवृंदांसी दिले
त्यांच्यासवे मी रंगलो अन् ब्रह्मरूपा पाहिले

प्रतिकूल ते ना टाळिले त्या जाहलो सन्मुख सदा
ते दूर गेले देऊनी, मज स्मृती सुखदशा हो तदा

करुणाघना परमेश्वरा तव तेज दे पाथेयसे
त्या घेऊनी चालेन मी पुढती दुण्या अन् साहसे..

बाबांनी सत्कार सोहळ्याच्या मनोगतात शेवटी ही कविता म्हटली होती.. नुकत्याच सुरू झालेल्या त्यांच्या अनंताच्या प्रवासातही माणुसकीच्या धर्मपालनाचं हेच पाथेय त्यांच्यासोबत असेल!

बाबा, तुमचा हा प्रेरणादायी वारसा जपायचा आम्ही कसून प्रयत्न करू, ही तुम्हाला माझी शब्दांजली….

  • डॉ. अनुजा जोशी, गोवा
  • (संपर्क – ७७२१८१०९८६)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply