जागतिक पर्यावरण दिन रोज साजरा करण्याचे निवेदिता प्रतिष्ठानचे आवाहन

दापोली : आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दापोलीतील पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे यांच्या निवेदिता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने रस्त्यांची स्वच्छता करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिन रोज साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

लाठी असोसिएशन ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष उत्तम पाटील, सुरेंद्र शिंदे, शर्वरी शिगवण, आर्या जवळगे, अथर्व जवळगे, उत्कर्षा पाटील, संगम चव्हाण ,यश चव्हाण आणि निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी रस्ता स्वच्छता अभियान केले. यावेळी रस्त्यावर कचरा टाकायचाच नाही आणि टाकूही द्यायचा नाही, अशी कळकळीची विनंती नागरिकांना करण्यात आली.

यावेळी श्री. परांजपे यांनी पर्यावरणाबद्दलची स्थिती सांगितली. ते म्हणाले, भारतात करोनापेक्षाही अधिक मृत्यू प्रदूषणाने झाले आहेत. प्रदूषणामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. विकासाच्या नावाखाली विकसित देशांकडून अनेक प्रकल्प राबवले जातात, पण त्याचा फटका मात्र विकसनशील देश आणि मागासलेल्या देशांना बसत आहे. भारतातही प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. जगभराचा विचार करता प्रदूषणामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू होतात, असे २०१९ ची आकडेवारी सांगते. भारतात एका महिन्यात करोनामुळे जेवढे मृत्यू झाले, त्यापेक्षा ११ पटींनी जास्त मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताती प्रदूषणामुळे होणारे मृत्यू आणि करोनामुळे झालेले मृत्यू याविषयी माहिती देताना ते म्हणाले, देशात दरवर्षी २३.५ लाख म्हणजे महिन्याला १.९६ लाख मृत्यू होतात. याचाच अर्थ दररोज ६,५२८, दर तासाला २७२, तर दर मिनिटाला ५ मृत्यू होतात. जगभरातील इतर देशांशी तुलना करता २०१९ साली प्रदूषणामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू झाले. भारतात प्रदूषणामुळे दरवर्षी होणाऱ्या २३.५ लाख मृत्यूंपैकी १६.७ लाख मृत्यू हवा प्रदूषणामुळे, तर ५ लाख मृत्यू जलप्रदूषणामुळे होतात. प्रदूषणामुळे होणारे आर्थिक नुकसान मोठे आहे. प्रदूषणामुळे जगाच्या जीडीपीमध्ये ३५० लाख कोटी रुपयांची घट झालीय हे प्रमाण एकूण जीडीपीच्या ६.२ टक्के इतके आहे. त्यामध्ये हात स्वच्छ न धुणे, दूषित पाणी पिणे यासारख्या पारंपरिक अयोग्य गोष्टीमुळे जीडीपीचे एक टक्का नुकसान झाले आहे. ओझोन प्रदूषण, पीएम प्रदूषणसारख्या आधुनिक गोष्टींमुळे एक टक्का जीडीपी घसरला आहे.

श्री. परांजपे म्हणाले, जागतिक स्तरावरील हवेचा गुणवत्ता अहवाल २०२१ साली प्रकाशित करण्यात आला असून त्यामध्ये भारताबाबत काही निरीक्षणे मांडण्यात आली आहेत. त्यानुसार भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेची मानके ठरवली आहेत. भारतातील एकही शहर ती मानके पूर्ण करत नाही. राजस्थानमधील भिवंडी हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. उत्तर भारतात सर्वाधिक प्रदूषण होत आहे. दिल्ली ही जगभरातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे. सलग चौथ्यांदा दिल्लीचा यामध्ये पहिला क्रमांक लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या मानकांच्या तुलनेत भारतातील प्रदूषणाचे प्रमाण २० पटींनी जास्त आहे. जगभरातील १०० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील ६३ शहरांचा समावेश आहे. यामुळे भारताचे दरवर्षी ११.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

ही भयावह परिस्थिती लक्षात घेता आजच नव्हे तर रोजच पर्यावरण दिन सर्वांनी साजरा करावा आणि निसर्ग तसेच पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखावे, असे आवाहन यानिमित्ताने निवेदिता प्रतिष्ठानतर्फे करत असल्याचे अध्यक्ष श्री. परांजपे यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply