दापोली : दापोलीत जागतिक सायकल दिन आणि पर्यावरण दिनानिमित्ताने आज झालेल्या स्लो सायकल स्पर्धेत सर्वेश बागकर, अनिषा लयाळ आणि संघरत्न शेळके यांनी वेगवेगळ्या तीन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.



मनुष्य आणि पर्यावरण यांचे अतूट नाते आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले आहे असे नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्य सायकल फेरीचे आयोजन केले जाते. सायकलचे महत्त्व आणि आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली. दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिवस आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सायकल फेरी आणि आझाद मैदानावर स्लो सायकल स्पर्धा झाली.
प्रारंभी झालेल्या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान, आंबेडकर चौक, कोकंबा आळी, श्री भैरीभवानी मंदिर, गिम्हवणे, सोनार वाडी, तेली वाडी, एकता नगर, टांगर गल्ली, बुरोंडी नाका आणि परत आझाद मैदान असा ६ किलोमीटरचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.
सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदानात स्लो सायकल स्पर्धा ३ गटांत घेण्यात आली. त्या स्पर्धेचा गटनिहाय गुणानुक्रमे निकाल असा – मुलगे मोठा गट – सर्वेश देवेंद्र बागकर, आयुष मंगेश शिर्के, वेदांत राजेंद्र नाचरे. मुली मोठा गट – अनिषा संतोष लयाळ, मनश्री प्रकाश पालवणकर, रिद्धिमा सुदेशकुमार चव्हाण. लहान गट – संघरत्न आनंद शेळके,अनुज महेंद्र शिगवण, हेरंब मुकुंद लोंढे,ग्रीष्मा सुदेशकुमार चव्हाण. या विजेत्यांना चषक, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. भेटवस्तू म्हणून सायकल हेल्मेट, हवेचा पंप इत्यादी सायकलिंगसाठी उपयोगी साहित्य देण्यात आले.
या फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे,राहुल मंडलिक, झाहीद दादरकर, अमोद बुटाला,राकेश झगडे,रागिणी रिसबूड, शैलेश मोरे,उत्पल वराडकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड