मराठ्यांचे पाऊल पडलेला प्रत्येक भाग आज भारतात – प्रा. पंकज घाटे

रत्नागिरी : इतिहासकाळात जेथे जेथे मराठ्यांचे पाऊल पडले, तो प्रत्येक भाग आज भारतात आहे, याचे श्रेय शिवरायांना आहे, असे विचार येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहास विभागातील प्रा. पंकज घाटे यांनी व्यक्त केले.

येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आज शिवराज्याभिषेक दिन हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने सेमिनार हॉलमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अभ्यागत व्याख्याते म्हणून प्रा. घाटे बोलत होते. त्यांनी “शिवराज्याभिषेकाचे एक सूत्र” या विषयावर आपले विचार मांडले. जमीन जिंकून घेणे,राज्याभिषेक करून नवी वहिवाट तयार करणे, देशी भाषांना हक्काचे स्थान देणे, लोकमान्यता मिळवणे, भूप्रदेशाचा विस्तार करणे, किल्ले बांधण्याची कला, आरमाराची विशाल दृष्टी, नकाशाज्ञान ही कार्ये करून अगदी इंग्रजांकडूनही पूर्वेकडील मोठा राजकर्ता हा नावलौकिक मिळवणारा शिवाजी रयतेचा राजा होता, असे त्यांनी सांगितले.

प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिवाजी महाराजांची भूमिका हिंदवी स्वराज्याची म्हणजे एतद्देशियांच्या राज्याची होती आणि म्हणूनच शिवस्वराज्य दिन साजरा करण्यासाठी, शिवरायांचे चरित्र डोळसपणे वाचण्यासाठी, सांगण्यासाठी, आचरण्यासाठी हा दिवस साजरा करीत आहोत, असा शिवस्वराज्य दिनाचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

शासकीय अध्यापक महाविद्यालय कार्यक्रम समन्वयक राजश्री देशपांडे, कार्यक्रमाला तंत्र सहाय्य करणारे प्रा. प्रशांत लोंढे यांचे सहकार्य कार्यक्रमास लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेघना म्हादये यांनी केले. विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, ऑनलाइन ४१ आणि ऑफलाइन ८० शिवप्रेमी विद्यार्थी शिक्षकांनी यात सहभाग घेतला.

तत्पूर्वी शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मारुती मंदिरपासून मिरवणुकीने सुरुवात झाली. रत्नागिरीतील १३ क्लस्टर कॉलेज यात सहभागी झाली होती. देव-घैसास-कीर महाविद्यालय, नवनिर्माण महाविद्यालय, भागोजी कीर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply