रत्नागिरी : आयकॉनिक रत्नागिरीत बुधवारी (दि. ८ जून) सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये ३ जून ते १० जून दरम्यान सायकल फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काही आयकॉनिक जिल्ह्यांमध्ये सायकल फेरीचे आयोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र क्रीडा विभागाच्या वतीने रत्नागिरी, पुणे, नागपूर आणि वर्धा असे चार जिल्हे आयकॉनिक जिल्हे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.
जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित देशव्यापी कार्यक्रमाचा भाग म्हणून उद्या (दि. ८ जून) रत्नागिरीत सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ही सायकल फेरी युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे देशभरात जागतिक सायकल दिनाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते ३ जून रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून सायकल फेरीच्या उपक्रमाला आरंभ केला. ठाकूर ७५० तरुण सायकलस्वारांसह साडेसात किलोमीटरपर्यंत सायकल चालविली. नेहरू युवा केंद्रातर्फे देशातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आणि देशभरातील ७५ महत्त्वाच्या ठिकाणी सायकल फेरीचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांच्या आरंभ कार्यक्रमात १२ मार्च २०२१ रोजी पंतप्रधानांनी केलेल्या उद्घाटनपर भाषणातून प्रेरणा घेऊन, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने कृती आणि संकल्प @75 या स्तंभाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे. जागतिक सायकल दिनाचा एक भाग म्हणून उद्या नेहरू युवा केंद्र संघटन आणि राष्ट्रीय सेवा योजना या दोन प्रमुख युवा संघटनांच्या सहकार्याने दिल्लीत सायकल दिनाचा आरंभ झाला.
रत्नागिरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने ८ जून रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी क्रीडांगणापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारकापर्यंत सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये किमान १०० सहभागी तरुण साडेसात किमी अंतर सायकलवरून कापतील. या सायकल फेरीमध्ये सायकल चालवा आणि निरोगी राहा असा संदेश देत जास्तीत जास्त नागरिकांनी फेरीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरीच्या नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी केले आहे.
शारीरिक तंदुरुस्तीसाठीच्या व्यायामाचा भाग म्हणून आणि लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादींपासून मुक्तता मिळवण्याच्या दृष्टीने लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सायकल चालवण्यासाठी आणि ते अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिकांनी सायकल चालवण्याचा अवलंब केल्यास कार्बन उत्सर्जन कमी होण्यासही मदत होईल. जागतिक सायकल दिन साजरा करण्याच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या जीवनात दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायामाचा समावेश करण्याचा म्हणजेच “फिटनेस की डोस आधा घंटा रोज” हा संकल्प करण्याचे आवाहन सायकल दिनी केले जाईल.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड