
मुंबई : विलेपार्ले येथील सर्वांगीण सामाजिक विकासात अग्रेसर असलेल्या कोकण कट्टा या बहुउद्देशीय संस्थेने पालघर तालुक्यातील भाताणे आदिवासी पाड्यातील साई आधार संस्थेच्या बालकांना विलेपार्ले येथील सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्ती आणि देखाव्यांचे दर्शन घडविले.
विलेपार्ले येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या आदिवासी मुलांना दर्शनासाठी आमंत्रित केले होते. या मंडळात सुभाष रोड सार्वजनिक गणेशोत्सव, मोंघीबाई मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव, विलेपार्ले लोकसेवा मंडळ, हनुमान रोड, मुंबईचा पेशवा गणेशोत्सव, भारतीय कामगार सेना पुरस्कृत कामगारांचा विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ, पारसी वाडा सार्वजनिक गणेशोत्सव, विलेपार्लेचा राजा गणेशोत्सव, वीर सावरकर सेवा केंद्र आदी मंडळांचा समावेश होता. या मंडळांच्या गणपतींचे दर्शन अनाथ मुलांना घडविण्यात आले. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मठात दर्शन घेऊन नंतर सार्वजनिक गणेशोत्सव दाखविण्यात आले. मुंबई दर्शनासाठी आलेल्या या आदिवासी आणि अनाथ मुलांपैकी काही मुलांच्या पायात चपलाही नव्हत्या. त्या त्यांना तत्काळ घेऊन देण्यात आल्या. मोदक आणि आइस्क्रीमचा प्रथमच आस्वाद घेऊन मुले आनंदी झाली, तर विमानतळावर विमान पाहताना त्यांना स्वर्गसुखाचा आनंद झाला.
मुंबईचा पेशवा, मोघींबाई मार्केट, विलेपार्ले लोकसेवा मंडळ या मंडळांनी मंडळांनी या आदिवासी पाड्यातील मुलांकरिता प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली. कोकण कट्टाने मानवतेच्या दृष्टिकोनातून राबविलेल्या उपक्रमांमुळे आदिवासी पाड्यातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कोकण कट्टाच्या या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, अशी माहिती कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांनी दिली.
यावेळी दादा गावडे, सुजित कदम, सुनील वनकुंद्रे, दया मांडवकर, सागर मालप, समीर देसाई आकांक्षा आणि शलाका पितळे, आरती दाभोळकर, नीता पैंगणकर, पूजा तळेकर आदी सदस्य उपस्थित होते.
(निकेत पावसकर)
(संपर्क : अजित पितळे 93232 29074)

