चिपळूण : शालेय अभ्यासक्रमातील भूगोल हा विषय पावसाच्या दोलायमानतेसारख्या विचाराशी जोडला जायला हवा. हे शिकवले न गेल्याने पाण्याच्या व्यवस्थापनाचे पुरेसे गांभीर्य आपल्याकडे रुजले नसल्याचे मत डॉ. माधवराव चितळे यांनी व्यक्त केले.
अलोरे (ता. चिपळूण) येथील सुवर्णमहोत्सवी प्रशालेच्या प्रतिनिधींनी प्रशालेच्या जडणघडणीत वाटा असलेले डॉ. माधवराव चितळे यांची इंदूरमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कोयना भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या अलोरे येथील तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी कोयना बोगदे मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून १९६८ च्या पावसाळ्याच्या दिवसात डॉ. माधवराव चितळे यांची बदली अलोरे येथे झाली होती. ते १९७१ पर्यंत तेथे कार्यरत होते. याच काळात अलोरे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार चिपळूण शहरातील शाळा अलोरे येथे व्हावी, म्हणून परशुराम एज्युकेशन सोसायटीची शाळा अलोरे येथे सुरू करण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयप्रक्रियेच्या प्राथमिक चर्चांमध्ये स्थानिक प्रकल्प अधिकारी म्हणून चितळे यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (१९७२-२०२२) पार्श्वभूमीवर चितळे यांच्या अलोरे येथील आठवणी जाणून घेण्याच्या हेतूने प्रशालेच्या प्रतिनिधींनी इंदूर (मध्य प्रदेश) येथे डॉ. चितळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करताना पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या स्टॉकहोम वॉटर प्राइझने १९९३ साली डॉ. चितळे यांचा सन्मान झाला. डॉ. चितळे यांचे चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे शाळा सुरू होण्याचे योगदान लक्षात घेऊन विद्यमान मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय आणि सीए वसंतराव लाड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, माजी मुख्याध्यापक आणि शाळा-संस्था समन्वयक अरुण माने, शाळेच्या १९९५ बॅचचे माजी विद्यार्थी पर्यावरणप्रेमी पत्रकार आणि लेखक धीरज वाटेकर या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मुख्याध्यापक वाचासिद्ध यांनी डॉ. चितळे यांना शाळेचे वर्तमान उपक्रम आणि प्रगतीची माहिती दिली. डॉ. चितळे यांनी दहा वर्षांपूर्वी चिपळूणला झालेल्या चितळे कुलसंमेलनप्रसंगी आवर्जून अलोरे येथे शाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांचे स्वागत अरुण माने यांनी केल्याची आठवण त्यांना यावेळी सांगण्यात आली. धीरज वाटेकर यांनी डॉ. चितळे यांच्याशी अलोरे गाव, प्रकल्प आणि शाळा यांसह विस्तृत जलसंवाद साधला.
पोफळी येथे परशुराम एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल (१९६९) सुरू झाले होते. एमएसईबीतील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शाळेची सोय झालेली होती. या पार्श्वभूमीवर अलोरे प्रकल्पात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत राहावे, यासाठी प्रकल्पाच्या वसाहतीत दर्जेदार माध्यमिक शाळेची गरज होती. अलोरे शाळेच्या निवडीबाबत खूप चर्चा झाली होती. अंतिमत: प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या, चिपळूण शहरातील शाळा अलोरे येथे यावी, या मागणीनुसार परशुराम एज्युकेशन सोसायटीची शाळा अलोरेत आणण्यात आली होती. पुढील कालखंडात रत्नागिरी जिल्ह्यात याच अलोरे शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध केली. चितळे यांच्या प्रोत्साहनाने अलोरेत आठवडा बाजार सुरू झाला. अलोरे बालकमंदिर, टपालघर आदी सुविधा याच काळात सुरू झाल्या. चितळे आणि त्यांचे सर्व सहकारी अभियंते, कर्मचारी आदींच्या पुढाकारातून गणेशोत्सव, महिला मंडळ उपक्रमांमधून वसाहतीचा सांस्कृतिक विकास झाला. भयग्रस्त कर्मचाऱ्यांची कामाची मानसिकता तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेण्यासह डॉ. चितळे स्वतः अपुऱ्या व्यवस्थेत काहीकाळ अलोरेत राहिले. कर्मचाऱ्यांचा विमा उतरवणे, अनुदानाच्या खर्चातील एक टक्का रकमेतून कर्मचाऱ्यांना वसाहतीतील खोल्या रंगविण्यासाठी रंग उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी राबविले. कर्मचाऱ्यांना कामाविषयी निष्ठा निर्माण होण्यात या सर्वांचा उपयोग झाला होता. त्याकाळी अलोरे वसाहतीत साप खूप दिसत. सापांना भूकंपाचे धक्के चटकन जाणवतात, याचा विचार करून अलोरे वसाहतीच्या शेजारून अर्धा मीटर रुंदीचा वाळूचा थर देण्यात आला होता.
कोयना धरण परिसरात ११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी ६.७ रिश्टर क्षमतेचा तीव्र भूकंप झाला होता. या भूकंपामुळे लगतच्या चिपळूण आणि पाटण तालुक्यात मनुष्यहानी आणि खूप नुकसान झाले होते. अशा स्थितीत डॉ. चितळे यांची अलोरेत बदली झाली होती. १९६८ ते १९७१ या काळात ते अलोरे येथे कार्यरत होते. १९७१-७२चे शालेय सत्र सुरू असताना त्यांची मुंबईत बदली झाली. मुळा, भातसा, कोयना आदी प्रकल्पांवरील परिस्थिती गुंतागुंतीची आणि अडचणीची असताना तेथे चितळे यांची नेमणूक होताच कोणतीही सबब न सांगता ते त्या पदावर रुजू झाले. आपल्या कारकिर्दीत चितळे यांनी अनेक अवघड कामे स्वीकारली आणि यशस्वी करून दाखवली. ठेकेदारांकडील कामांची फेरजुळवणी करण्यातील वित्तीय व कायदेशीर अडचणींमधून मार्ग काढणे, प्रकल्पाची काही कामे ताब्यात घेऊन खात्यामार्फत यंत्रे आणि मजूर लावून करवून घेणे, प्रकल्पाच्या वसाहतींची फेरबांधणी आणि विस्तार करणे, तेथील सामाजिक जीवनात उत्साह निर्माण करणे अशा प्रकारे प्रकल्प सुरळितपणे मार्गस्थ करण्याचे जे काम त्यांच्या कारकिर्दीत अलोरे येथे झाले त्याची ‘उत्कृष्ट’ म्हणून गणना झाली. शासनाने मंत्रालयातील एका कार्यक्रमात डॉ. चितळे यांना खात्याचे तत्कालीन सचिव भुजंगराव कुलकर्णी यांच्या हस्ते या कामांसाठी दोन पानी सविस्तर गुणवत्ता प्रशस्तिपत्र बहाल केले. विशेष म्हणजे त्या काळात अशा प्रकारे औपचारिक गुणवत्ता प्रशस्तिपत्र देण्याची पद्धत प्रशासनात रूढ नव्हती. चितळे यांना मिळालेले ते अशा प्रकारचे पहिले गौरवपत्र होते. कालांतराने शासनाने दरवर्षीच्या कामांचा आढावा घेऊन गुणवत्ता प्रशस्तिपत्रके देण्याचा आणि गुणवंतांचा समारंभीय सत्कार करण्याचा चांगला पायंडा पाडला.
इंदूर येथील भेटीत डॉ. चितळे यांच्याशी जलसंवाद साधण्यात आला. यावेळी डॉ. चितळे यांनी पाणी या विषयातील अनेक मुद्द्यांचा ऊहापोह केला.
यावेळी डॉ. चितळे यांच्या पत्नी आणि ‘सुवर्णकिरणे’ या आत्मचरित्राच्या लेखिका सौ. विजया चितळे, डॉ. चितळे यांचे इंदूर येथील जावई आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गिरीश कवठेकर, अलोरेतील बालक मंदिरात शिकलेल्या कन्या आणि विद्यमान प्रसिद्ध डेंटल सर्जन वृंदा कवठेकर यांच्याशीही संवाद साधण्यात आला.


