संगमेश्वर : कलांगण संगमेश्वर संस्थेतर्फे यमनरंग मैफलीचे आयोजन येत्या १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
यमन राग ही रागसंगीतातील अत्यंत हळुवार जागा असून संगीतरसिकांच्या अभिरुचीचा तो एक महत्त्वाचे राग आहे. शृंगार, भक्ती, विरह, प्रणय असे अनेकविध भाव सहजतेने प्रकट करणारा, वातावरण प्रसन्न करणारा, तणाव, भय यांना नष्ट करून आत्मविश्वास जागविणारा, रात्रीच्या पहिल्या प्रहरात गायला जाणारा यमन राग म्हणजे माणसातले माणूसपण म्हटले जाते. आपलेही कुठे चुकत असेल किंवा चुकू शकेल हे तपासून पाहण्याची वृत्ती यमनच्या श्रवणाने नक्कीच वाढीस लागते. साहस आणि प्रेम ही विशेषता असलेल्या या रागात मनातला विवेक आणि दुसऱ्याला समजून घेण्याची भावना आहे. ज्याला यमन जमला, उमगला त्याला जीवनातील भाव प्रकटीकरण जमलेच, असे म्हणायला हरकत नाही. रागदारी संगीतात नेहमीच समर्पणाची भावना दृग्गोचर होते आणि त्या भावनेला यमन राग अप्रतिम कोंदण देतो. संगीत रसिक अनिल गोविलकर यांच्या मते यमन रागाला ‘अंत’ नसतो. अजूनतरी या रागाचा किनारा दृष्टिक्षेपात आलेला नाही. म्हणूनच हा राग आपल्या आजूबाजूला आनंदाची पखरण करत चकवा देत असतो.
अशा या यमन रागाच्या विविध भावरंगांच्या अनुभुतीसाठी कलांगण संगमेश्वर संस्थेने यमनरंग या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये अभिजित भट, निहाल गद्रे, चैतन्य पटवर्धन, राहुल कुळकर्णी, आदित्य खरे आणि हेरंब जोगळेकर यांचे सादरीकरण असून दीप्ती कानविंदे निवेदन करतील. ध्वनीसंयोजनाची जबाबदारी उदयराज सावंत सांभाळणार आहेत.
येत्या १५ ऑक्टोबर रोजी गोळवली (ता. संगमेश्वर) येथील प. पू. गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्पात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. सर्वांना विनामूल्य प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कलांगण संगमेश्वरतर्फे निबंध कानिटकर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

