Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

‘कीर्तनसंध्या’तर्फे झोपाळ्यावरची गीता, राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि अनिकेत कोनकर यांचा गौरव

Advertisements

रत्नागिरीतील कीर्तनसंध्या व्यासपीठावर पत्रकार दिनी कार्यक्रम

रत्नागिरी : येथील कीर्तनसंध्या महोत्सवात कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित झोंपाळ्यावरची गीता, या गीतेचे पुनर्प्रकाशन करण्यासाठी प्रयत्न करणारे अनिकेत कोनकर आणि पुस्तकाचे इंग्रजी रूपांतर करणारे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा गौरव झाला. दोघांनाही हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या हस्ते शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

परिवारातर्फे बारावा कीर्तनसंध्या महोत्सव रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू आहे. या महोत्सवात पत्रकार दिनाचे औचित्य साधून ६ जानेवारी २०२३ रोजीच्या कीर्तनात या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभात या साऱ्याचे औचित्य विशद करण्यात आले.

सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी १९१ वर्षांपूर्वी म्हणजे सहा जानेवारी १८३२ या दिवशी दर्पण नावाचे द्विभाषिक वृत्तपत्र सुरू केले होते. त्याची आठवण म्हणून मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कीर्तनसंध्या परिवारसुद्धा पत्रकारांचा गौरव करून बाळशास्त्रींच्या स्मृतींना अभिवादन करतो. या वर्षी दोन पिढ्यांमधल्या दोघा पत्रकारांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे हे दोघे पत्रकार झोपाळ्यावरची गीता या एका पुस्तकाने एकमेकांशी वैचारिक नात्याने बांधले गेलेले आहेत. आजचे वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी रद्दी होते, असे म्हटले जाते. तरीही पत्रकारितेला कितीतरी महत्त्व असते, ते त्यातल्या वैचारिकतेमुळे. दैनंदिन पत्रकारिता करताना त्यापलीकडे जाऊन शाश्वत टिकेल, असे लेखन करणे जरुरीचे असते. ते पत्रकारांचे खरे काम असते. कीर्तनसंध्याच्या व्यासपीठावर सन्मानित करण्यात आलेले राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि अनिकेत कोनकर हे दोघे दोन पिढ्यांचे प्रतिनिधी असलेले पत्रकार असेच शाश्वत लेखन केले पाहिजे, अशी दृष्टी असणारे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणारे आहेत. विशेष म्हणजे दोन्ही पत्रकार विज्ञानाशी संबंधित पदव्या घेतल्यानंतर पूर्णवेळ पत्रकारितेकडे वळले आहेत.


झोपाळ्यावरची गीता नावाचे, गीतेचा मराठीत अनुवाद करणारे श्लोकस्वरूपी पुस्तक १९१७ साली अनंततनय यांनी लिहिले. त्याचे पुनर्प्रकाशन सात वर्षांपूर्वी रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने केले. या पुस्तकाचे इंग्रजी रूपांतर याच प्रकाशनातर्फे नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे इंग्रजी रूपांतर रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले आहे. त्याच निमित्ताने त्यांचा सन्मान करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले हे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे जन्मगाव असले, तरी त्यांचा जन्म मंडणगड तालुक्यात पंदेरी येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर, तर आई विद्यार्थीप्रिय प्राथमिक शिक्षिका होती. मसुरकर यांचे प्राथमिक शिक्षण मंडणगड तालुक्‍यात, तर उच्च माध्यमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. बारावीनंतर रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मोटार मेकॅनिक या विषयात ते जिल्ह्यात पहिले आले आणि नंतर ते पुण्याला गेले. पुणे विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या मोटारसायकल दुरुस्ती अभ्यासक्रमाचे ते काही काळ अध्यापक होते. या काळात त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारिता पदविका आणि यथावकाश इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात एमए पदवी मिळविली. पुण्यातच ‘दैनिक संध्या’ या वृत्तपत्रापासून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रांत काम करत त्यांनी ‘मोटार जगत’ हे मोटारवाहनविषयक मराठीतून माहिती देणारे पहिले मासिक रत्नागिरीतून सुरू केले. अलीकडेच ‘कोंकणी माणूस’ हे नवीन साप्ताहिक त्यांनी सुरू केले आहे. ‘तरुण भारत’मध्ये ‘जागतिक घडामोडी’ हा स्तंभ त्यांनी दहा वर्षे लिहिला. याबरोबरच ‘कोकण मीडिया’ साप्ताहिक आणि ‘सारस्वत मित्र’ मासिकासाठी ते नियमित लेखन करतात. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पत्रकारिता आणि इतिहास विषयांचे अध्यापनही त्यांनी केलं. सुमारे ३५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत असलेले श्री. मसुरकर यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये साडेतीन हजार पृष्ठे भरतील एवढे लेखन केले आहे. त्यांनी चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे मराठी आणि इंग्रजी चरित्र लिहिले. कीर यांनी इंग्रजीत लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या चरित्राचे मराठीत भाषांतर केले. ‘झोंपाळ्यावरची गीता’ या ओवीबद्ध पुस्तकाचे त्यांनी इंग्रजीमध्ये पद्यरूप भाषांतर केले. तेच आता पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले आहे.

झोंपाळ्यावरची गीता या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात अनिकेत कोनकर या तरुण पत्रकाराचा महत्त्वाचा वाटा आहे. अनिकेतचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण रत्नागिरीत झाले, तर दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातून त्याने बीएससी अॅग्रिकल्चर पदवी संपादन केली. त्यानंतर पुण्याच्या ॲग्रोवन या कृषीविषयक दैनिकात सुरुवातीची तीन वर्षे, तर त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या पुणे आवृत्तीच्या प्रारंभीच्या काळातील सात वर्षे अशी दहा वर्षांची पत्रकारिता अनिकेतने पुण्यात केली. आता वेब जर्नालिझममध्ये स्थिरावलेल्या अनिकेतला राज्य शासनाचा ऑनलाइन पत्रकारितेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. पुण्यातल्या वास्तव्याच्या काळात झोंपाळ्यावरची गीता या मराठी वाङ्मयातला उत्तम ठेवा असलेल्या आणि दुर्मिळ झालेल्या पुस्तकाचा अनिकेतने शोध घेतला आणि ते प्रकाशित करण्याकरिता संकलित करण्याचे महत्त्वाचे काम केले. भगवद्गीतेला भारतीय परंपरेत खूप महत्त्व आहे, पण गीता वगैरे सारे काही निवृत्तीनंतर वाचायचे असते, तेव्हाच त्याचा अभ्यास करायचा असतो, अशी एक धारणा असते. त्या पार्श्वभूमीवर एखादा तरुण पत्रकार शंभर वर्षांपूर्वीच्या गीतेच्या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन व्हावे, यासाठी धडपड करतो हेच त्याचे वेगळेपण आहे. झोंपाळ्यावरच्या गीतेचे मराठीतील पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर ते इंग्रजीत येण्यासाठी राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी त्याला साथ दिली आणि नुकत्याच झालेल्या गीता जयंतीच्या मुहूर्तावर (३ डिसेंबर २०२२) या मराठी-इंग्रजी द्वैभाषिक पुस्तकाचे प्रकाशन झाले.

बाळशास्त्री जांभेकर यांच्या आठवणीसाठी पत्रकार दिन साजरा करत असतानाच बाळशास्त्रींच्याच द्वैभाषिक दर्पण वृत्तपत्राची आठवण व्हावी, अशा तऱ्हेची द्वैभाषिक झोंपाळ्यावरची गीता प्रकाशित झाली आहे.

दोन पिढ्यांमधले पत्रकार गीतेसारख्या महत्त्वाच्या विषयावर एकत्र येतात आणि शाश्वत काहीतरी निर्माण करतात, हे लक्षात घेऊनच या दोघांचा सत्कार करण्यात आल्याची भूमिका कीर्तनसंध्या परिवारातर्फे व्यक्त करण्यात आली.

………….

पुस्तक मुंबई, पुण्यातही उपलब्ध

✓ आयडियल बुक कंपनी, दादर

✓ अक्षरधारा, पुणे

✓ रसिक साहित्य, पुणे

छापील पुस्तक घरपोच मागवण्यासाठी संपर्क : 9850880119 (फक्त व्हॉट्सअ‍ॅप)

मोबाइल : 9423292162

ई-बुक लिंक : bit.ly/TheGeetaInLeisure

मूल्य : 200 रुपये + पोस्टेज

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version