गीता जयंतीदिनी ‘झोंपाळ्यावरची गीता’च्या इंग्रजी अनुवादाचे रत्नागिरीत प्रकाशन; कोकण मीडियाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही होणार

रत्नागिरी : येत्या शनिवारी, तीन डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीत The Geeta in Leisure या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन होणार आहे. १९१७ साली कवी अनंततनय यांनी लिहिलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. तसेच, साप्ताहिक कोकण मीडियाने २०२२च्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर घेतलेल्या लेख आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही या वेळी होणार आहे. ज्येष्ठ प्रवचनकार आणि व्याख्याते धनंजय चितळे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘नित्यनूतन गीता’ या विषयावर त्यांचे व्याख्यानही या कार्यक्रमात होणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ आदी माहिती शेवटी दिली आहे.

राजेंद्रप्रसाद मसुरकर

गीतेतलं तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या मराठी भाषेत सांगणारी ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही रचना कवी दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय यांनी इसवी सन १९१७मध्ये केली होती. झोपाळ्यावर बसायच्या लहान वयात मुलींनी गीता म्हटली तर त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि त्या मुली त्यांच्या पुढच्या पिढीवर ते संस्कार करू शकतील, अशा विचाराने त्यांनी त्या वेळी ही रचना केली. मराठी भाषेचे सौंदर्य वेगळ्या पद्धतीने यातून प्रतीत झाले आहे.

अनिकेत कोनकर यांना त्यांचे आजोबा कै. बा. के. करंबेळकर गुरुजी यांच्या संग्रहात २०१०मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही दुर्मीळ पुस्तिका सापडली. त्यातली लेखकाच्या नावासह काही पाने गहाळ झालेली होती. वृत्तपत्रात लेख, स्वतंत्र वेबसाइटनिर्मिती आदी माध्यमांतून लोकांना आवाहन करून ती गहाळ पाने शोधण्यात त्यांना यश आले. त्यामुळे अनंततनय यांनी ती रचना केल्याचे समजले. (दिवंगत) बालसाहित्यकार सरिता पदकी यांनी त्यांच्या संग्रहातून ती पाने उपलब्ध करून दिली. एक ऑगस्ट २०१५ रोजी रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) ‘झोंपाळ्यावरची गीता’ पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आली.

त्यापुढचा टप्पा म्हणून २०२०-२१ मध्ये झोपाळ्यावरच्या गीतेचा इंग्रजी अनुवाद करण्यात आला. मराठीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले रत्नागिरीतले व्यासंगी पत्रकार, लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना झोपाळ्यावरची गीता वाचल्यानंतर तिचा इंग्रजीत अनुवाद करावा, असे प्रकर्षाने वाटले. २०२० साली गीताजयंतीचा मुहूर्त साधून झोंपाळ्यावरच्या गीतेचे काही श्लोक आणि त्यांचा इंग्रजी अनुवाद दररोज कोकण मीडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. गीतेचे आध्यात्मिक महत्त्व अद्वितीय आहे; मात्र हा केवळ आध्यात्मिक उपक्रम म्हणून नव्हे, तर भाषा अभ्यासाचा उपक्रम म्हणूनही राबवण्यात आला. अधिकाधिक व्यक्तींपर्यंत हा ठेवा पोहोचवण्यासाठी मूळ (मराठी) झोंपाळ्यावरच्या गीतेसह तिचा श्री. मसुरकर यांनी केलेला इंग्रजी अनुवाद आता पुस्तकरूपाने प्रकाशित केला जात आहे. (या पुस्तकाच्या पूर्वनोंदणीसाठी 9850880119 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आपला नाव-पत्ता कळवावा.)

धनंजय चितळे

ज्येष्ठ प्रवचनकार आणि व्याख्याते धनंजय चितळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘नित्यनूतन गीता’ या विषयावर त्यांचे व्याख्यानही या वेळी होणार आहे.

साप्ताहिक कोकण मीडियाने ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर २०२२चा दिवाळी अंक प्रसिद्ध केला होता. त्यासाठी अशोक प्रभू स्मृती लेख स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमही या वेळी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांची नावे पुढे दिली आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ‘साप्ताहिक कोकण मीडिया’चे संपादक प्रमोद कोनकर यांनी केले आहे.

कार्यक्रम स्थळ : जोगळेकर संकुल हॉल, दामले विद्यालयाजवळ, मारुती मंदिर (नाचणे रोड), रत्नागिरी

दिवस आणि वेळ : तीन डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता

चित्रकला स्पर्धा निकाल

प्रथम – श्वेता संदीप केळकर, कुवारबाव, रत्नागिरी

द्वितीय – सुजल मंगेश निवाते, मु. पो. आंबये, ता. खेड, जि. रत्नागिरी

तृतीय – प्रदीपकुमार विष्णू देडगे, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

लेख स्पर्धा निकाल

प्रथम – लेखाचे शीर्षक : दुद्दुऽम्ऽ नाम्ऽनाम्… एक स्मरणरंजन!

लेखक : श्रीनिवास सरपोतदार, रत्नागिरी

द्वितीय – लेखाचे शीर्षक : केळशीचा रथोत्सव आणि पलित्यांचा नाच

लेखक : धीरज वाटेकर, चिपळूण, जि. रत्नागिरी

तृतीय – लेखाचे शीर्षक : देवरूख निगुडवाडीतील ‘आराधने’ची आगळीवेगळी परंपरा

लेखक : शांताराम बारका गोरुले, निगुडवाडी, देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

उत्तेजनार्थ क्रमांक एक – लेखाचे शीर्षक : गोळपच्या हरिहरेश्वर मंदिरातला वैशिष्ट्यपूर्ण कार्तिकोत्सव

लेखक : अविनाश काळे, गोळप, ता. जि. रत्नागिरी

उत्तेजनार्थ क्रमांक दोन – लेखाचे शीर्षक : वालावलपुरी उभा मुरारी, वैकुंठीचा राया…

लेखक : आशीष पणशीकर, वालावल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

उत्तेजनार्थ क्रमांक तीन – लेखाचे शीर्षक : वाटूळचा शिमगोत्सव

लेखक : विराज विलास चव्हाण, वाटूळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, सर्वांशी संपर्क साधला जाणार आहे.

विजेत्यांची चित्रे पाहण्यासाठी, तसेच अंकाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पाहा सोबतचा स्लाइडशो आणि व्हिडिओ…

अंक घरपोच मागवण्यासाठी संपर्क :
मोबाइल :
9422382621, 9850880119

(फक्त) व्हॉट्सअ‍ॅप : 9168912621

(व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर आपलं नाव, संपूर्ण पत्ता आणि प्रतींची संख्या कळवावी.)

ई-बुक खरेदीसाठी लिंक :

गुगल प्ले बुक्स – https://play.google.com/store/books/details?id=LzaVEAAAQBAJ

मॅग्झटर – https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1099536

बुकगंगा – https://www.bookganga.com/R/8LC78

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply