रत्नागिरीत शनिवार-रविवारी शासकीय ग्रंथोत्सव

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालयांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे येत्या शनिवार आणि रविवारी (दि. ३ आणि ४ डिसेंबर) रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात हा ग्रंथोत्सव होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश जोशी उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवितील. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथोत्सवात विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद आणि काव्यसंमेलन होणार आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी निघेले. अनेक मान्यवर व्यक्ती, शालेय विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रंथप्रेमी ग्रंथदिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी अडीच वाजता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” उपक्रमांतर्गत इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. रमेश कांबळे यांचे “स्वातंत्र्य लढ्यातील कोकण” या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी साडेतीन वाजता “स्मरण शतायूंचे” या विषयावर परिसंवाद होणार असून मराठी साहित्यात मोलाचे योगदान असलेले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, गंगाधर गाडगीळ, वसंत बापट, कवी शंकर रमाणी, कवयित्री शांताबाई शेळके या थोर साहित्यिकांवर चर्चा होईल. राजेंद्रप्रसाद मसुरकर, अरविंद कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, मदन हजेरी आणि शिवराज गोपाळे हे या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत.

रविवारी सकाळी ११ वाजता “स्पर्धा परीक्षा एक सुवर्ण संधी” या विषयावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये कीर्तिकिरण पुजार राकेश गिड्डे, अंकिता लाड, श्रद्धा चव्हाण, प्रतीक आढाव मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी अडीच वाजता “ग्रंथालये : वाचक व बदलती वाचन माध्यमे” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये डॉ. रामदास लिहीतकर, अॅड. दीपक पटवर्धन, प्रा. संतोष चतुर्भुज आणि मनोज मुळ्ये सहभागी होणार आहेत. या दोन्ही सत्रांमध्ये रत्नागिरी शहर व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केले आहे. सायंकाळी ४ वाजता निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन आणि समारोप होईल. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष श्रीमती नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होईल.

रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सवात ग्रंथप्रदर्शन आणि ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये शासकीय ग्रंथागार, साहित्य अकादमी, दिल्ली व मुंबई, नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली व मुंबई, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, कोल्हापूर शाखा आणि पुण्यातील प्रकाशक आणि विक्रेते यांची ग्रंथदालने लावण्यात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी, वाचक, अभ्यासक, संशोधक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply