पाय पसरविण्यासाठी अंथरूण मोठे करा विचारसरणीवरील भाष्य

एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा – रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (२ डिसेंबर २०२२) : कळा या लागल्या जीवा
सादरकर्ते : श्री भैरीदेव देवस्थान समिती, जांभारी, ता. रत्नागिरी

कौटुंबिक नातेसंबंधांवरील नाजूक प्रश्नावर नाटकातून भाष्य करण्यात आले आहे.

भारताने जागतिक अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे मध्यमवर्गीय माणसाच्या हातात पैसा खुळखुळू लागला. कोणत्याही गोष्टीसाठ सहज कर्ज उपलब्ध होऊ लागले. विदेशी कंपन्या जशा भारतात आल्या, तशी काही प्रमाणात विदेशी संस्कृतीही आली. सहज मिळणारे कर्ज घेणे आणि मग त्याचे हप्ते फेडताना ओढाताण हणे हे चित्र गल्लोगल्ली दिसू लागले. कारण अंथरूण पाहून पाय पसरावेत, ही विचारसरणी जाऊन पाय पसरविण्यासाठी अंथरूण मोठे करा, ही विचारसरणी वाढू लागली. म्हणून माणसाच्या गरजा वाढल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणूस काहीही तडजोड करू लागला.

चाहूल नाटकाचा हा विषय आहे. ते नाटक पाहून अशीच तडजोड आपल्या जीवनात करावी, असे ठरवणारा नायक अविनाश आपल्या बायकोला, गौरीला घेऊन ते नाटक बघायला जातो. ते नाटक गौरीला आवडत नाही. त्यानंतर नवरा-बायकोमधील वाद, संवाद, चर्चा आणि त्यानुसार घडणारे प्रसंग म्हणजे कळा या लागल्या जीवा.

अविनाश आणि गौरी या दोनच पात्रांवर या नाटकाचा डोलारा उभा आहे.

श्रेयनामावली
लेखक – किरण पोत्रेकर
दिग्दर्शक – प्रशांत पावरी
नेपथ्य – श्रुती गिरम, भालचंद्र मेस्त्री
प्रकाशयोजना – प्रकाश पवार
पार्श्वसंगीत – अरविंद साळवी
रंगभूषा – भालचंद्र मेस्त्री

विशेष सहकार्य
सुधीर महादेव वासावे (अध्यक्ष) आणि पदाधिकारी, श्री भैरीदेव देवस्थान समिती, जांभारी
ग्रामस्थ मंडळ, जांभारी
नारायण पटेकर, नंदकुमार हरवंदे, राम सारंग, सचिन पावरी, मनोज पटेकर, मुकेश पटेकर

पात्रपरिचय
वॉचमन आणि निपाणीकर – द्वारकानाथ पावरी
अविनाश – प्रशांत पावरी
गौरी – सुषमा जाधव

असे होते कालचे नाटक

काल, १ डिसेंबर रोजी जानशी (ता. राजापूर) येथील श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळ फेकबुक फ्रेंड्स हे नाटक सादर केले. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद पंगेरकर यांचे होते. सोशल मीडियामुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातूनच श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारख्या गंभीर घटना घडत आहेत. सोशल मीडियाचा हाच दु्ष्परिणाम दाखविण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे.

फेसबुकवर केलेली मैत्री किती महागात पडू शकते, या ज्वलंत विषयावर जानशी (ता. राजापूर) येथील नाट्यमंडळने ही कलाकृती सादर केली. या नाटकात कलाकारांनी अभिनय बऱ्यापैकी केला परंतु, त्याला साऊंड सिस्टीमची साथ मिळाली नाही. तसेच नाटकामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. विषय चांगला असतानाही प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात नाटकाला यश आले नाही.

सुरुवातीला एका व्यक्‍तीच्या घरात ‘एक अज्ञात तरुणी शिरते. तिच्यापाठोपाठ पोलीसही असतात. मात्र ती तरुणी त्या व्यक्‍तीच्या घरात लपून बसते. पोलिस घराची झडती घेतात. परंतु, त्यावेळी ती तिथे त्यांना सापडत नाही. त्यामुळे पोलीस त्या व्यक्‍तीला दटावतात, प्रसंगी मारहाणही करतात. असे असतानाही ती व्यक्‍ती काहीच बोलत नाही. ती तरुणी येथे आलीच नसल्याचे ती व्यक्ती पोलिसांना वारंवार सांगते. पोलीस गेल्यानंतर ती तरुणी त्या व्यक्तीसमोर येते आणि आपण मुकी असल्याचे सांगते. त्यानंतर ती व्यक्‍ती आणि त्या तरुणीमध्ये संवाद सुरू होतो. मुकी असल्यामुळे ती हातवारे करूनच संवाद साधते. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा पोलीस येतात. तेव्हासुद्धा ती तरुणी कपाटात जाऊन लपते. यावेळी पोलीस पुन्हा एकदा घराची झडती घेतात. त्या व्यक्‍तीला मारहाण करत त्या तरुणीबद्दल विचारणा करतात. परंतु, ती व्यक्‍ती त्या तरुणीच्या प्रेमात पडलेली असल्याने ती व्यक्‍ती पुन्हा एकदा खोटेच सांगते. पोलीस निघून जातात.

त्यानंतर त्या घरात एक तरुण प्रवेश करतो. यावेळी ती तरुणी त्याला जाऊन मिठी मारते आणि त्याच्याशी बोलून संवाद साधते. ती तरुणी मुकी नसल्याचे यावेळी समजते. तिला बोलता येत होते. यावेळी तो तरुण तिच्याकडे दिलेल्या बॅगेची चौकशी करतो. फेसबुकवर झालेल्या ओळखीतून तो तरुण तिला भेटायला आलेला असतो. तिने त्याला प्रत्यक्षात कधीच पाहिलेले नसते. पण तरीही त्याची मैत्री असते. यादरम्याने त्यांचे प्रेम फुलते आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या जातात. त्यावेळी ठरल्यानुसार ती तरुणी घरातून लग्नासाठी पळून जाते. ती दोघे रेल्वेस्थानकावर भेटतात. त्यावेळी तो तरुण तिच्याकडे एक बॅग देतो. तो पळून जातो आणि तरुणीही पळून जाते. पण पोलीस तिचा पाठलाग करतात. याच दरम्यान ती तरुणी त्या व्यक्तीच्या घरात शिरलेली असते. हा सारा उलगडा त्या दोघांच्या संवादातून होतो. त्यातून आणखी एक भयानक सत्य समोर येते ते म्हणजे त्या बॅगेत अमली पदार्थ असतात. यावेळी ती तरुणी चांगलीच भांबावून जाते. कारण तिचा वापर अमली पदार्थ वाहून नेण्यासाठी झाल्याचे तिला कळते. शेवटी त्या तरुणाला पोलीस पकडतात आणि अनवधानाने या प्रकरणात मदत केल्यामुळे त्या तरुणीला माफीचा साक्षीदार करून सोडून देतात. या साऱ्या प्रकरणात तिला अऩाहूतपणे आश्रय देणारी ती व्यक्ती मात्र वेडी होऊन जाते.

नाटकाच्या सुरुवातीलाच प्रकाशयोजना आणि साऊंड सिस्टीम अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. पात्रेही अनेकवेळा तीच तीच वाक्‍ये उच्चारत होती. त्यामुळे प्रयोग अनावश्यकच लांबला. कलाकारांनी अभिनय मात्र बऱयापैकी केला. परंतु प्रेक्षकांना गुंतवून ठेवता आले नाही. नाटकाच्या दोन तासांपैकी जवळजवळ दीड तास पोलीस चौकशी याच एका विषयाकरिता वाया गेला आहे. नाटक पुढे सरकता सरकता सरकेना. जो संदेश द्यायचा आहे, त्याला खूपच कमी वेळ देण्यात आला. लेखक आणि दिग्दर्शकानेही त्यावर लक्ष द्यायला हवे होते. एका चांगल्या विषयाचा विचका झाल्याचे जाणवले.

श्रेयनामावली

लेखक – प्रसाद पंगेरकर
दिग्दर्शक – ऋतुजा मेस्त्री
नेपथ्य – संजय धनावडे, आशीष धनावडे, मंदार जोशी
प्रकाशयोजना – अथर्व धनावडे, दत्तेश्वर कुवेसकर
पार्श्वसंगीत – सुनील धनावडे, मिहिर पंगेरकर
रंग आणि वेशभूषा – राजन धनावडे

पात्रपरिचय
ऋतुजा जोशी – चांदणी
प्रशांत मेस्त्री – समीर
राजेंद्र तांबे – इन्स्पेक्टर
स्वरा मेस्त्री – हवालदार
प्रणय ठुकरूल – हवालदार
प्रसाद पंगेरकर – शांताराम

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply