राज्य नाट्य स्पर्धेला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : राज्य शासनाच्या एकसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी काल (दि. ३० नोव्हेंबर) रत्नागिरी केंद्रावर सुरू झाली.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १५ नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरुवात झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक फेरीदेखील १५ नोव्हेंबरपासून सुरू झाली. त्या दिवसापासून २९ नोव्हेंबरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धेतील १५ नाट्यप्रयोग मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सादर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धा रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात कालपासून सुरू झाली. नटराज पूजनाने स्पर्धेचा प्रारंभ झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पर्धेला आणि कलाकारांना दिलेल्या शुभेच्छा संदेशाची चित्रफीत प्रारंभी दाखविण्यात आली. नाट्यसंस्थांच्या पारितोषिकांच्या तसेच मानधनात वाढ करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी केंद्रावरील स्पर्धेचे उद्घाटन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, कोकणाला कलांची मोठी परंपरा आहे. स्पर्धेच्या निमित्ताने कोकणात नवनवीन कलाकार घडावेत आणि कोकणाची नाट्य परंपरा आणखी वृद्धिंगत व्हावी. याच स्पर्धेतून उद्याचे व्यावसायिक कलाकार घडणार आहेत. त्यांना शुभेच्छा. अभिनेता दिग्दर्शक असित रेडीज म्हणाले की, नाट्य कला जगविण्यासाठी स्थानिक पाठबळही महत्त्वाचे आहे. अत्यल्प दरात स्पर्धेची तिकिटे उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेऊन अधिकाधिक रसिकांनी स्पर्धेतील नाटके पाहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.

उद्घाटन समारंभाला अपर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे, स्पर्धेचे परीक्षक ईश्वर जगताप, सतीश शेंडे, मानसी राणे, रत्नागिरीतील ज्येष्ठ नाट्यकर्मी राजकिरण दळी, सतीश दळी उपस्थित होते.

रत्नागिरी केंद्रावरील स्पर्धा १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. रत्नागिरी केंद्रावर ११ नाटके सादर केली जाणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर देवगड येथील यूथ फोरमचे निर्वासित हे नाटक सादर करण्यात आले. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वप्नील जाधव यांचे होते.

असे होते पहिल्या दिवशीचे नाटक

निर्वासित

कोकणातील चाकरमानी मुंबईत गेल्यानंतर १० बाय १० च्या खोलीत संसार कसा थाटतो, त्यानंतर त्याला काय काय संघर्ष करावा लागतो, त्याला कोणकोणत्या अडचणी येतात, याची सांगड उत्कृष्ट अभिनयातून घालत देवगड (सिंधुदुर्ग) येथील युथ फोरमने सादर केलेल्या निर्वासित या नाटकाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रसिकांची मने जिंकली. लेखन आणि दिग्दर्शन स्वप्नील जाधव यांचे होते.

कथा भावनिक तसेच दमदार अभिनय असल्यामुळे रसिकांच्या डोळ्यांत टचकन पाणी आणण्यात कलाकार यशस्वी झाले.

राजापूर तालु्क्यातील एका गावातील एक व्यक्ती मुंबईला जाते. मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून त्याला नोकरी लागते. महापालिकेकडून त्याला १० बाय १० चे कर्मचारी वसाहतीतील घर राहायला मिळते. तेथे त्याची पत्नी आणि दोन मुलांसह त्याचा संसार थाटला जातो. संसाराचा गाडा ओढताना त्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुले मोठी होतात. मुलगा नोकरी करतो, तर मुलगी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीच्या शोधात असते. वाढत असताना मुलांचे विचार वेगळे आणि वडिलांचे विचार वेगळे. ते जुळत नसल्याने अनेकवेळा वादाचे प्रसंग ओढवतात. मुलगा मयूरचे एका मुलीशी प्रेम जमते. त्याला डोंबिवलीला एक जागा घ्यायची असते. त्यासाठी त्यासाठी दोन लाख रुपयांची गरज असते. पण गावाकडच्या घराच्या वीजपुरवठ्यासाठी लाच म्हणून दोन लाख रुपये मोजणाऱ्या वडिलांकडून त्याला पैसे मिळत नाहीत. पण भावी सासऱ्याकडून त्याला दोन लाख रुपये मिळतात. पण त्या जागेबाबत मुलाची फसवणूक होते. परिणामी लग्न होणार नसल्याचे सांगायला सासरा वडिलांकडे येतो आणि दोन लाख रुपये दिल्याचेही सांगतो. वडील दोन लाखाचा चेक त्यांना परत करतात. नोकरीची मुदत संपल्याने वडील आणि आई गावाकडे जायची तयारी करतात. मुलांनी तेथेच राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. मुंबईत येणारे चाकरमानी एक प्रकारे निर्वासितच असतात, असा काहीसा बोध नाटकातून दिला जातो.

नाटकात मुंबईतील कामगार वसाहतीतील खोलीची सजावट चांगली करण्यात आली होती. ती अगदी मुंबईतील खोली वाटत होती. नेपथ्य उत्कृष्ट होते. रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत या बाबीही चांगल्या होत्या. या नाटकात कांबळे नावाच्या पात्राने रसिकांना थोडे हसवण्याचा प्रयत्न करत रंगत आणली. मयूर आणि दर्शना या दोन मुलांनी दमदार अभिनय केला. आई आणइ बाबांचाही अभिनय चांगला झाला, परंतू काहीवेळा आवाज ऐकू येत नव्हता. तेवढीच एक कमतरता या नाटकात जाणवली.

निर्वासित नाटकातील एक दृश्य
निर्वासित नाटकातील एक दृश्य

आजचे नाटक

आज, १ डिसेंबर रोजी जानशी (ता. राजापूर) येथील श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळ फेकबुक फ्रेंड्स हे नाटक सादर करणार आहे. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद पंगेरकर यांचे आहे. आजकाल सोशल मीडियामुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातूनच श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारख्या गंभीर घटना घडत आहेत. सोशल मीडियाचा हाच दु्ष्परिणाम दाखविण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply