रत्नागिरी : सागरी सीमा मंचाच्या कोकण प्रांत कार्यालयाचे उद्घाटन रत्नागिरीत झाडगाव येथील रा. स्व. संघाच्या माधवराव मुळ्ये भवनात झाले.
भारताच्या सीमारेषांवर जवान २४ तास डोळ्यांत तेल घालून पहारा देत असतात. परंतु समुद्रकिनाऱ्यांवर आपल्या देशवासीयांनीच सुरक्षेसाठी बारीक लक्ष ठेवून राहिले पाहिजे. यापूर्वी समुद्रमार्गे आक्रमणे झाली. त्यामुळे कोकण समुद्र किनारपट्टीवर आपण साऱ्या देशभक्तांनी सज्ज राहिले पाहिजे. त्याकरिता सागरी सीमा मंचाच्या या कोकण प्रांताच्या कार्यालयाचा उपयोग होणार आहे. सागरी सीमा मंचाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन करताना खूप आनंद होतो, असे प्रतिपादन सीमा जागरण मंचाचे अखिल भारतीय संयोजक ए. गोपाल कृष्णन यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी सागरी सीमा मंचाचे प्रांत संयोजक संतोष पावरी, सहसंयोजक संतोष सुर्वे, सागरी सीमा मंचाचे प्रांत संघटन मंत्री अनिकेत कोंडाजी, रत्नागिरी विभाग संयोजक मयूरेश पाटणकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत, महिला संघटक तनया शिवलकर आदी उपस्थित होते.
श्री. पावरी म्हणाले, सागरी सीमा मंच कोकणच्या सर्व सागरी किनारपट्टीवर कार्यरत आहे. सेवा, संपर्क, प्रचार, युवा, जागरण, महिला सक्षमीकरण या सर्वांना स्पर्श करीत सागरपूजन, मत्स्य जयंती, आरमार विजय दिवस, पर्यावरण संरक्षण असे अनेक कार्यक्रम देशभक्ती जागृत करण्याचे काम मंच करत आहे. आता कार्यालय सुरू झाल्यामुळे कार्याला गती मिळणार आहे. या माध्यमातून सागर किनारपट्टीवर संपर्क ठेवण्यात येईल.
कार्यालय उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ए. गोपाल कृष्णन यांनी अभ्यास गट बैठक घेतली. यामध्ये किनारपट्टी या अनुषंगाने काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी सागरी सुरक्षा व समस्यांवर विविधांगांनी चर्चा झाली. समुद्रातील वारा, वादळामुळे जहाजे, बार्ज किनारपट्टीवर येऊन अडकतात. त्यावेळी तत्काळ ही जहाजे सोडवण्याची यंत्रणा नाही. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव दखल घेऊन उपाययोजना केली पाहिजे. त्यासाठी सागरी सीमा मंचाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जागरूक राहावे, अशी सूचना या वेळी करण्यात आली.
कार्यक्रमाला मरीनर दिलीप भाटकर, भारत सरकारच्या डीजी शिपिंगचे आशीष वानखेडे, अॅड. विलास पाटणे, सहाय्यक प्रादेशिक बंदर अधिकारी सुधीर जंगम, बंदर अधिकारी शंकर महानवर, मत्स्य महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉ. सुहास वासावे, भारतीय तटरक्षक दल डीआयजी कमांडिंग ऑफिसर शत्रुजित सिंग, सागरी पोलीस अधिकारी दीपक जाधव, गुहागर तालुका खारवी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष मारुती होडेकर, गुहागरच्या माजी पंचायत समिती सभापती सौ. दीप्ती असगोलकर, मच्छीमार शासकीय योजना अभ्यासक व संयोजक रविकिरण तोरस्कर, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते. साईजित शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले.


