तळेरे (ता. कणकवली) : जागतिक हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तळेरे (ता. कणकवली) येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. स्पर्धा तीन गटांत होणार आहे.
दरवर्षी २३ जानेवारी रोजी जागतिक हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त दरवर्षी जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही स्पर्धा पहिली ते चौखी, पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन गटांत होणार आहे. यासाठी प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांच्या दोन कविता निवडण्यात आल्या आहेत. मुलांनी पुन्हा एकदा लेखनाकडे गांभीर्याने पाहावे, हस्ताक्षर सुधारावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धकांनी आपले साहित्य ए-4 आकाराच्या कागदावर लिहून त्यामागे स्पर्धकाचे पूर्ण नाव, पत्ता, शाळेचे पूर्ण नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक लिहून ३० जानेवारीपर्यंत निकेत पावसकर, अक्षरोत्सव, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे किंवा श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन, प्रज्ञांगण, महालक्ष्मी प्लाझा, खमंग हॉटेलजवळ, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे आणून द्यावेत किंवा पोस्टाने पाठवावेत. स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या तिन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील परीक्षकांच्या पसंतीनुसार निवडक कवितांच्या हस्तलिखिताचे प्रदर्शन बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळी करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती आणि स्पर्धेच्या कवितांसाठी निकेत पावसकर (9403120156), श्रावणी मदभावे (7719858387) किंवा सतीश मदभावे (9405928865) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मराठी भाषा पंधरवड्यात कवी प्रदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यांची निष्ठा ही कविता मागच्यावेळी नववीच्या अभ्यासक्रमात होती. ते १९९० नंतर काव्य लेखन करणारे महत्त्वाचे कवी असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.