दापोलीत सायकल फेरीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

दापोली : वृद्ध व्यक्तींची ज्येष्ठता आणि प्रदीर्घ अनुभव उपयुक्त गुण मानला जातो. त्यांच्या सन्मानासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्टतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली. दापोलीतील गणेश दातार वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेण्यात आली. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

आझाद मैदानातून सुरू झालेली सायकल फेरी केळसकर नाका- बुरोंडी नाका- फॅमिली माळ- गणेश दातार वृद्धाश्रम- नटराज नाका येथून परत आझाद मैदानावर पाच किलोमीटर मार्गावर झालेल्या या फेरीमध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. दातार वृद्धाश्रमात व्यवस्थापक रवींद्र इंगळे यांनी तेथील कार्याबद्दल माहिती सांगितली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे राजाराम मढव, सुरेश गुरव, प्रेमानंद महांकाळ आणि सहकारी उपस्थित होते. त्यांनी आजी-आजोबा-नातवंडे नात्याबद्दल माहिती दिली. नुकतेच विभाग स्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले विद्यार्थी यश शिर्के, स्नेहा भाटकर, संचिता भाटकर, सर्वेश बागकर, साईप्रसाद वराडकर, श्री खानविलकर, हर्ष लिंगावळे यांचा गौरव करण्यात आला.

या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सुनील रिसबूड, सर्वेश बागकर, संदीप भाटकर, विनय गोलांबडे, सुधीर चव्हाण, फर्न समाली रिसॉर्टचे दिनेश कुमार यादव इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. स्नेहसंध्या प्रतिष्ठानच्या शुभांगी गांधी, नीलांबरी अधिकारी, स्मिता सुर्वे, रेखा बागुल आणि सहकारी यांचेही सहकार्य लाभले.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्य सायकलविषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply