वडापाव म्हणजे सर्वमान्य खाणे झाले आहे. पण वडापाव खाताना वडा पावात घालून एकत्र खातात, हेसुद्धा माहीत नसलेली मुले आपल्याच महाराष्ट्रात राहतात. कर्णेश्वर (ता. संगमेश्वर) येथे आलेल्या अशा मुलांच्या सहलीच्या निमित्ताने ….
……………………..
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील साधना विद्यालय नेलगुंडा येथील सुमारे २० विद्यार्थी कर्णेश्वर (कसबा, संगमेश्वर, ता. संगमेश्वर) येथे आले होते. वास्तविक सध्या सहलींचा हंगाम असल्याने त्यात काय विशेष, असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे. पण वडापाव कसा खातात, हेसुद्धा माहीत नसलेले हे विद्यार्थी विशेषच होते. म्हणून हा लेखप्रपंच.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्प संचालित शाळेतील ही मुले. महाराष्ट्रातीलच एका अगदी टोकाच्या जिल्ह्यातील अर्थात गडचिरोली जिल्ह्यातील. आपल्याकडे सरकारी खात्यात ‘तुला गडचिरोलीला पाठवीन’, अशी धमकीवजा म्हण आहे. त्याची गंभीरता सांगणारी एकूण कहाणी या मुलांना भेटताना, त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या दादाकडून म्हणजे त्यांच्या शाळेतील शिक्षक यतीश जाधव (मूळचे पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी) यांच्याकडून त्यांचे एकेक किस्से आणि परिस्थिती ऐकताना अनुभवास येत होती.
गडचिरोली जिल्हा म्हणजे आदिवासीबहुल भाग एवढीच काय ती आपली ओळख, तीसुद्धा वर्तमानपत्रातून वाचून किंवा न्यूज चॅनलवरच्या बातम्यात पाहून… त्या भागाची अवस्था प्रत्यक्षात याहून कितीतरी गंभीर आहे, हे त्या विद्यार्थ्यांना पाहून जाणवले. यातील अनेक विद्यार्थ्यांनी रेल्वे कधी पाहिलीच नव्हती. वडा-पाव खाताना वडा पावात घालून एकत्र खातात, हेच या मुलांना माहीत नव्हते. साहजिकच वडापाव हा खाद्यपदार्थच त्यांना नवखा आणि अनोखा होता. फ्राय केलेले मासे समोर आले, तर वरचे पिठाचे आवरण काढून आत हा मासाच आहे, हे त्यांना सांगावे लागत होते. केसांची आणि नखांची काळजी घेता येत नाही, म्हणून आठवीपर्यंतच्या मुलींचे केस मुलांसारखेच कापण्यात येतात. नखे काढायलाही शाळेत शिकवले जाते. आपल्यासारख्या जगाला कदाचित सामान्य वाटणाऱ्या या गोष्टीसुद्धा ज्यांना माहीत नाहीत, अशा परिस्थितीत राहणाऱ्या या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम लोकबिरादरी करीत आहे. विकासातील ‘व’सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. आम्ही मात्र इकडे संपन्न आणि समृद्ध महाराष्ट्राच्या गप्पा मारतोय! त्या मुलांशी बोलताना ही भयाण विषमता चटकन नजरेत येते.
शालेय पोषण आहारातील गैरव्यवहाराबद्दल अनेक ठिकाणी बोलले जाते, पण या आदिवासी बांधवांना तो शालेय पोषण आहारसुद्धा अशक्यप्राय आहे. कारण या शाळेला शासकीय अनुदान नाही. डॉ आमटे यांच्या सहकार्यानेच चालवल्या जाणाऱ्या या शाळेत १५० आदिवासी विद्यार्थी शिकतात आणि त्याच्या शेजारच्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र ५ विद्यार्थीही नाहीत, अशी अवस्था आहे. ही तफावत आहे ती केवळ लोकबिरादरी या संस्थेच्या कर्तृत्वामुळे… लोकबिरारदरीने या मुलांचे पालकत्व खऱ्या अर्थाने स्वीकारले आहे.
पण शेवटी त्यांच्याही काही मर्यादा असतीलच ना? रोज पहाटे ४ वाजता उठून गावात मोहाची फुले गोळा करायला जाणाऱ्या या मुलांना (त्या मोहाच्या फुलांची पुढे दारू बनवली जाते) रोजचे आवश्यक पोषक अन्न मिळावे, ही जबाबदारी काय केवळ लोकबिरादरीचीच आहे? शासकीय पातळीवर अनेक ठिकाणी अनाठायी खर्च होणारा पैसा अशा मुलांच्या तोंडी लागला, तर त्याचा जास्त उपयोग नाही का? पण समाजाचे हे भान आणि वास्तव राज्यकर्त्यांपर्यंत जेव्हा पोहोचेल, तेव्हा खरे सुराज्य आले म्हणायचे. नाहीतर तोपर्यंत गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मी स्वीकारले, यातच पुरुषार्थ मानून गोडवे गायले जायचे.
या सगळ्यात दिसलेल्या आशेच्या किरणाचे नाव आहे ते म्हणजे प्रदीप पाटील. संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी आहेत ते. माझे मित्र श्रीनिवास पेंडसे यांनी या मुलांविषयी त्यांना माहिती दिल्यावर ते आवर्जून कसबा येथे आले. या मुलांची भेट घेतली. त्या शिक्षकांकडून सगळी परिस्थिती आस्थेने जाणून घेतली. त्या प्रवाहात असणाऱ्या एका शासकीय अधिकाऱ्याने हे समजून घेणे हेही विशेष महत्त्वाचे आहे. हे सगळे करताना श्री. पाटील यांच्याकडे पाहून जाणवत होती ती त्यांच्यातील संवेदनशीलता… खरेच असे अधिकारी समाजातील सज्जन शक्ती वाढवतात आणि समाजाचे संतुलन राखण्यास मोलाची मदत करतात.
अर्थात आपल्याकडे याबद्दल कितीही संवेदनशीलता असली तरी आपल्या काही करण्यावर मर्यादा आहेत. पण यानिमित्ताने जाणवली ती गडचिरोली ते रत्नागिरी या महाराष्ट्रातीलच दोन जिल्ह्यांची विषमता…. आपल्याकडे सर्व सोयी असूनसुद्धा एकट्या संगमेश्वर तालुक्यात अनेक शाळांमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी नाहीत, अशी स्थिती तर काहीही उपलब्धता नसताना भामरागडसारख्या ठिकाणी १५० विद्यार्थी शिक्षण घेतात, हे वास्तव एका वेगळ्या महाराष्ट्राचे चित्र प्रतिबिंबित करते.
अग्रेसर महाराष्ट्राचे हे चित्र बघून व्यथित व्हायला होते. कुठेतरी कालवाकालव होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालातसुद्धा माझ्या राज्याची हीसुद्धा एक बाजू आहे, हे पाहून क्षणभर मन विषण्ण होते. यानिमित्ताने सुजाण आणि समृद्ध नागरिकांनी या मुलांना जेथे जमेल, जशी जमेल तशी मदत केली तर त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल व्हायला नक्की मदत होईल. गडचिरोली ते रत्नागिरी ही दरी सांधण्यासाठी ही आपली एक पायरीसुद्धा मोठे काम करून जाईल.
- निबंध कानिटकर, संगमेश्वर
(संपर्क : ९४२२३७६३२७)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

