केंद्र सरकारने महाराष्ट्रातील “उस्मानाबाद”चे “धाराशिव” असे नामांतर करण्यास मान्यता दिली आणि पुन्हा एकदा धाराशिव हे नाव चर्चेत आले. मुळात धाराशिवचा उस्मानाबादपर्यंतचा प्रवास कसा आणि कधी झाला, याची माहिती मनोरंजक आहे.
……………………..
खरे म्हणजे सुमारे २८-२९ वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम “उस्मानाबाद”चे “धाराशिव” असे नामांतर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर २५ मे १९९५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा केली. परंतु त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल झाली आणि नामांतराला स्थगिती मिळाली. त्यानंतर २००० साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी धाराशिव हे नामांतर करण्याचा निर्णय रद्द केला आणि न्यायालयाला तसे कळवून ती याचिका काढून टाकण्यात आली. आता २८ वर्षांनंतर नामांतराचा हा मुद्दा मार्गी लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवला आणि केंद्र सरकारने त्याला अनुमती दिली.
यानिमित्ताने धाराशिव या नावाबद्दल पुन्हा कुतूहल जागृत झाले आणि म्हणून या नावाचा धांडोळा घेण्याचा थोडासा प्रयत्न केला. मुळात आत्ताच्या उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिवच होते. ते मधल्या काळात उस्मानाबाद केले गेले होते. ते नेमके कधी झाले, याबद्दल मात्र काही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मुळात धाराशिव नावाचा संदर्भ आधी समजून घेऊ आणि मग त्याचे उस्मानाबाद कसे आणि कधी झाले ते पाहू.
स्कंद पुराणातील कथेनुसार ‘ धारासुर’ नावाच्या राक्षसाने शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचे वरदान मिळवले. त्यानंतर हा राक्षस उन्मत्त झाला आणि त्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा सरस्वतीदेवीने धारासुराचा वध केला. तेव्हा या देवीचे नाव धारासुरमर्दिनी झाले आणि या गावाचे नाव धाराशिव असे रूढ झाले.
आता या धाराशिवचे उस्मानाबाद कसे आणि कधी झाले याबद्दल मतप्रवाह आहेत. हैदराबादचा निजाम सातवा मीर उस्मान अली खान याच्या नावावरून १९०० साली या गावाचे नाव उस्मानाबाद झाले, असे सांगितले जाते, तर १९०४ साली तिसरा खलिफा हजरत उस्मान राझी अल्लाह याच्या नावावरून नामांतर झाल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो.
धाराशिवचे उस्मानाबाद होण्यामागे एक प्रेमकहाणी आहे, असेही काही ठिकाणी सांगितले आहे. ईस्ट इंडिया कंपनीने १९४७ साली भारतातून आपला गाशा गुंडाळला, परंतु त्यानंतरसुद्धा काही वर्षे जिल्ह्यात महसुली कामासाठी युरोपियन कलेक्टर आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी डीसीपी ही पदे ब्रिटिशांकडून भरली जात होती. याच पद्धतीने किल्ले नळदुर्ग येथे मेडॉल्फ ऊर्फ रॉबर्ट टेलर याची कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. रॉबर्ट किल्ले नळदुर्ग येथे वास्तव्यास होता आणि त्यावेळीच आताचे उस्मानाबाद हे बेंबळी तालुक्यातील ‘धाराशिव कसबा’ म्हणून परिचित होते. या रॉबर्टचे एका आदिवासी मोलकरणीच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध जुळले. त्यावेळी रॉबर्ट ४० वर्षांचा आणि त्याची प्रेयसी केवळ १४ वर्षांची होती. त्याकाळी या भागात कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त होते आणि त्यातच त्याच्या या प्रेयसीला कुष्ठरोगाची लागण झाली. त्याकाळी या रोगावर इलाज नव्हता. त्यामुळे रॉबर्ट व्यथित झाला. त्याकाळी बेंबळे तालुक्यातील धाराशिव कसब्याच्या दक्षिणेला माळी आणि खरोसेकर यांच्या शेतात एक निसर्गदत्त पाण्याचा झरा होता. या पाण्याने वर्षभर अंघोळ केली तर कुष्ठरोग बरा होतो, अशी माहिती रॉबर्टला मिळाली. आपल्या प्रेयसीला तेथे अंघोळ करता यावी म्हणून त्याने या झऱ्याच्या बाजूला कुष्ठरोग वसाहतीची स्थापना केली. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रॉबर्टला किल्ले नळदुर्ग ते धाराशिव असे घोड्यावरून १६० किमी अंतर कापून यावे लागत असे. त्यामुळे त्याने सातवा निजाम मीर उस्मान अली याला पत्र लिहून त्याच्या नावावर शहर वसवत असल्याचे कळविले. तेव्हा धाराशिव कसब्याचे नामकरण उस्मानाबाद करण्यात आले. त्यावेळी किल्ले नळदुर्गला असलेले जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद येथे हलविण्यात आले. पुढे इजिप्तला बदली झालेला रॉबर्ट पुन्हा नळदुर्ग येथे येऊन वास्तव्य करून राहिला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याची समाधी नळदुर्ग किल्ल्यात आहे. परंतु या संपूर्ण कथेबाबत तसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत.
अशा या धाराशिव या नावाबाबत वेगवेगळ्या कथा वाचायला मिळतात. धाराशिव नामांतर विषयावरून या ऐतिहासिक नावाचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न. अर्थात ही सगळी माहिती जशी उपलब्ध झाली तशी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही अप्रस्तुत आढळल्यास वाचकांनी अवश्य अवगत करावे.
- निबंध कानिटकर, संगमेश्वर
(संपर्क – ९४२२३७६३२७)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

