कोल्हापूर : अवघ्या मानव जातीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले पंचमहाभूतांवरील अतिरेकी आक्रमण हा अत्यंत चिंतेचा विषय असून यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेचे आहे. त्यासाठी विविध विद्यापीठे, शिक्षण संस्थांमधून पंचमहाभूत सजगतेसंदर्भातील पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू व्हावेत अशी अपेक्षा भाजपा खासदार आणि आयसीसीआर प्रमुख सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
सिद्धगिरी मठ सुरू असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात आज पृथ्वी तत्त्वावर झालेल्या परिसंवादात त्यांनी भाग घेतला. सर्व परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या लोकोत्सवाच्या उपक्रमाचे जिल्हा, तालुक्यासह सर्वत्र अनुकरण व्हावे. लोकोत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विचारवंत, प्रयोगशील कार्यकर्ते, संतगण यांचे व्यापक प्रमाणात विचारमंथन झाले आहे. त्या सर्वांचे एकत्रीकरण करून आणि इतर साहित्य संकलन करून भविष्यात विविध शिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम सुरू करावेत. ती काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतीय परंपरा आणि भारतीय विचारधारा मुळापासूनच निसर्गाशी समरस होणारी आणि निसर्गाशी एकरूप होऊन कार्यरत करणारी अशीच आहे . पंच परमेश्वर, पंचकन्या पूजनासह पंचमहाभूत स्मरण हे त्यांचेच प्रतीक आहे. कल्चर आणि अॅग्रिकल्चर हे एकत्रित असावेत, यासाठी ग्लोबल ते लोकल पातळीवर आयसीसीआर कार्यरत आहे. याच पद्धथीने हा विचार आगामी काळात व्यापक प्रमाणात सर्वत्र जाण्यासाठी एक वेगळी पाऊलवाट सिद्धगिरी कणेरी मठातून सुरू झाली आहे. भविष्यात त्याचा महामार्ग बनेल. त्यासाठी विविध संस्था स्तरावर सहकार्य राहील, असे अभिवचनही श्री. सहस्रबुद्धे यांनी दिले.
सिद्धगिरी मठाचे विश्वस्त उदय सामंत यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

