कुडाळ : पिंगुळी (ता. कुडाळ) येथील गुढीपूर येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयाचे संस्थापक लोककलाकार पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या संकल्पनेतून प्रथमच ठाकर आदिवासी लोककला चित्रकथी या चित्रशैलीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट दाखविणारे चित्र तयार करण्यात आले आहे.
घड्याळाच्या आकारामध्ये असलेल्या या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते शिवराज्याभिषेक या विषयावर एकूण १२ वेगवेगळी चित्रे तयार करण्यात आली आहेत.
ठाकर आदिवासी चित्रकथी ही लोककला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये गुप्तहेरी करण्यासाठी वापरली जात असे. त्यांनाच मानाचा मुजरा करण्यासाठी श्री. गंगावणे यांनी हे चित्र साकारले आहे.
या चित्राचे प्रदर्शन दिल्लीतील आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनात होणार आहे, असे यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी सांगितले. सध्या हे चित्र पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला आंगण कला दालनात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. हे चित्र तयार करण्यासाठी एकनाथ गंगावणे, चेतन गंगावणे, अक्षय मेस्त्री, प्रवीण गंगावणे यांचे सहकार्य त्यांना लाभले.
(निकेत पावसकर)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

