रत्नागिरी : देशातील वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेचे मानक असलेल्या सर्वोच्च संस्था नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर यांच्या वतीने रत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटल, लोटलीकर हॉस्पिटलला सर्वोच्च गुणवत्तेसाठी दिले जाणारे एनएबीएच मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजवर एनएबीएच मानांकन प्राप्त झालेल्या काही मोजक्याच रुग्णालयांच्या रांगेत आता श्री रामनाथ हॉस्पिटलचा समावेश झाला आहे.

अद्ययावत उपचारांची सुविधा हा एनएबीएच मानांकनासाठीचा अत्यंत महत्त्वाचा निकष आहे. हे मानांकन प्राप्त करताना टप्प्याटप्प्याने होणाऱ्या दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पाहणीला हॉस्पिटल सामोरे गेले. अखेरच्या ऑडिटला सामोरे गेल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये हॉस्पिटलला पूर्ण एनमएबीएच मानांकन प्राप्त झाले. हे मानांकन मिळवण्यासाठी त्यांचे काही निकष पाळावे लागतात. यामध्ये रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवासुविधा अद्ययावत आहेत का, डॉक्टरांसह सर्व कर्मचारीवर्ग प्रशिक्षित आहेत का, याची पाहणी केली जाते. त्याचप्रमाणे रुग्णालयातील रेकॉर्ड, रुग्ण आणि नातेवाईकांचे समुपदेशन, रुग्णाची काळजी, जंतुसंसर्गाचे शून्य प्रमाण इत्यादी निकषांकडे काटेकोरपणे पाहिले जाते. एनएबीएच मानांकन प्राप्त झाल्यांनतर या मुद्द्यांच्या अंमलबजावणीचा आढावा क्यूसीए या सर्वोच्च संस्थेद्वारे दर तीन महिन्यांनी घेतला जातो.
सध्या रुग्णालयात सर्व आजार, हृदयविकार, मूत्ररोग, किडनीचे आजार याबाबत उपचार केले जातात. कोकण कार्डियाक सेंटरद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, व्हॉल्व्ह बदलणे तसेच ममता गॅस्ट्रोएनट्रोलॉजी इन्स्टिट्यूटद्वारे (एमआयजी) पोटविकारांवर पूर्ण उपचार करण्याचे नवे दालन रुग्णालयाने चालू केले आहे. तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि डायलेसिस करण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे.
रुग्णाच्या सेवेला प्राधान्य देउन अचूक निदान आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या सहकार्याने कमी दरात रुग्णांवर उपचार केले जातात.
अशा अद्ययावत रुग्णालयाला एनएबीएच मानांकन मिळाल्याने ती रुग्णालयाच्या विश्वासार्ह सेवेला मिळालेली पोचपावती असून रुग्णांना अग्रस्थानी ठेवून दिल्या जाणाऱ्या किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण सेवेमुळे हॉस्पिटलने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून रत्नागिरी तसेच कोकणातील रुग्णांना सेवा देणाऱ्या हॉस्पिटलच्या रुग्णसेवेच्या दर्जावर शिक्कामोर्तब झाले असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध आहे, असे हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय लोटलीकर यांनी सांगितले.
डॉ. ममता लोटलीकर-आमोणकर यांनी ममता गॅस्ट्रोएनट्रोलॉजी इन्स्टिट्यूटविषयी दिलेली माहिती सोबतच्या व्हिडीओमध्ये —

